मेहता, गगनविहारी लल्लुभाई : (१५ एप्रिल १९००–२८ एप्रिल १९७४). सुविख्यात भारतीय अर्थतज्ञ, राजनीतिज्ञ व पत्रकार. जन्म अहमदाबाद येथे नागर ब्राह्मण कुटुंबात. वडील लल्लुभाई आघाडीचे व्यापारी आणि वित्तप्रबंधक. आईचे नाव सत्यवतीबेन. गगनविहारींचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. मुंबईच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण (१९१७). एल्फिन्स्टनमहाविद्यालयातून इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवी संपादन दिली (१९२१). उच्च शिक्षणार्थ त्यांना ‘लंडन अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थे’त पाठविण्यात आले तथापि प्रकृति-अस्वास्थ्या मुळे त्यांना पदवी न घेताच मायदेशात परतावे लागले. १९२४ मध्ये त्यांचा रमणभाई नीलकंठ यांच्या सौदामिनी या कन्येशी विवाह झाला. पुढे १९२८ मध्ये ‘बर्ट्रंड रसेलचे सामाजिक तत्त्वज्ञान’ या विषयावर त्यांनी लिहिलेल्या एका प्रबंधामुळे त्यांना एम्.ए ची पदवी देण्यात आली. लंडनमधील वास्तव्यात गगनविहारींचा हॉबहाउस (१७८६–१८६९), हॅरल्ड लास्की (१८९३–१९५०) यांसारख्या थोर विचारवंत लेखकांशी परिचय झाला. याच सुमारास गगनविहारींनी धार्मिक व अभिजात संस्कृत वाङ्मय आणि गांधीवादी तसेच आधुनिक तत्त्वाज्ञाने यांचाही अभ्यास केला. त्यांच्या ज्ञानसंपन्न, उदारमतवादी अशा व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत वरील सर्व गोष्टींचा प्रभाव आहे.
गगनविहारी १९२३ मध्ये बाँबे क्रॉनिकल या राष्ट्रीय विचारसरणीच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक झाले. भारतीय ब्रिटिश कारभारावर त्यांनी आपल्या लेखणीने टीकास्त्र सोडले. १९२६ मध्ये त्यांनी कलकत्ता येथे ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ची व्यवस्थापकीय धुरा सांभाळावयास घेतली ही कंपनी स्थापण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा सहभाग होता. गगनविहारींनी हे पद २२ वर्षे सांभाळले व भारतीय जहाज उद्योगाला विनाशातून तारले. स्वदेशी माल परकीय जहाजांतून न पाठविता कंपनीच्या जहाजांतून पाठविण्याबाबत त्यांनी परिश्रमपूर्वक आपल्या देशी बांधवांना प्रवृत्त केले.
सिंदिया कंपनीमध्ये असतानाच गगनविहारींनी भारतीय आर्थिक समस्यांच्या निरसनासाठी व्यापार, कामगार, भांडवल, रोजगार, जकात इत्यादींविषयी देशात व परदेशांत भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत सक्रिय भाग घेतला. अध्यक्ष-इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, कलकत्ता १९३९–४० फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, नवी दिल्ली १९४२–४३ भारतीय मालक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटना परिषदेत, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळात प्रतिनिधी म्हणून सहभाग, बर्लिन १९३७ भारतीय प्रतिनिधीमंडळाचे उपनेते-आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद, न्यूयॉर्क १९४४ भारतीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य-आंतरराष्ट्रीय व्यापार व रोजगार परिषद, जिनीव्हा, १९४७ आणि आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळ, मोंत्र-स्वित्झर्लंड १९४७ अशी त्यांनी निरनिराळी पदे भूषविली. गगनविहारी भारतीय जकात मंडळाचे अध्यक्ष, १९४७–५० भारतीय संविधान समितीचे सदस्य १९४७ भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य १९५०–५२ होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत भारतीय राजदूत (१९५२–५८) या नात्याने त्यांनी भारत व अमेरिका या दोन्ही देशांमध्ये अधिकाधिक आर्थिक सहकार्य निर्मिण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थान शिपयार्ड लि. व राष्ट्रीय जहाज मंडळ १९५९–६३, या दोहोंचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिजे. १९६५ मध्ये एअर इंडिया व भारतीय हवाई मार्ग निगम या दोन्ही हवाई संस्थांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर या दोन्ही संस्थांना आर्थिक दृष्ट्या स्थिरपद करण्यात गगनविहारींचा सिंहाचा वाटा होता. यांशिवाय त्यांनी भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक निगम (१९५८–७१), भारतीय विनियोग केंद्र, भांडवल निर्गम नियंत्रण सल्लागार समिती इ. संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही वेळोवेळी काम पाहिले.
आपल्या कार्यव्यग्र जीवनामध्ये गगनविहारींचा विविध देशी व परदेशी विद्वत्संस्थांशी संबंध आला आणि त्यांनीही त्यांचा यथोचित सन्मान केला. औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषदेचे नियामक मंडळ, नवी दिल्ली भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर नफील्ड प्रतिष्ठान सल्लागार समिती इ. संस्थांचे ते सदस्य होते. १९६५ मध्ये मुंबईच्या भारतीय तंत्रविद्या संस्थेचे (आय्. आय्. टी.) ते अध्यक्ष झाले याच काळात इंडो-अमेरिकन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९५८ मध्ये त्यांना लंडन अर्थशास्त्र संस्थेचे सन्माननीय अधिछात्र म्हणून गौरविण्यात आले, तर रोलिन्स कॉलेज, विंटर पार्क-फ्लॉरिडा, सिंप्सन कॉलेज, इंडियानोला, आयोवा व कॉलेज एज्युकेशन, प्रॉव्हिडन्स-ऱ्होड आयलंड या तीन अमेरिकन शिक्षणसंस्थांनी त्यांना सन्माननीय कायद्याची पदवी देऊन गौरविले.
गगनविहारी पुरोगामी-सामाजिक दृष्टिकोनाचे समर्थक होते. स्वतःच्या मुलीस त्यांनी आंतरजातीय विवाहास परवानगी दिली. अस्पृश्यांच्या समस्या सोडविण्याच्या कामी त्यांनी रस घेतला. १९५९ मध्ये त्यांना पद्म भूषण हा किताब लाभला.
आयुष्यभर कार्यरत राहूनही फुरसतीच्या वेळात गगनविहारींनी इंग्रजी व गुजराती भाषांतून लेखन केले. आकाश ना पुष्पो हा त्यांचा पहिला गुजराती भाषेतील ग्रंथ (१९३२), पुढच्याच वर्षी द कॉन्शन्स ऑफ ए नेशन ऑर स्टडीज इन गांधीझम हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. फ्रॉम राँग अँगल्स (१९३५), पर्व्हर्सिटीज (१९४२), अंडरस्टॅंडिंग इंडिया (१९५९) हे त्यांचे इतर महत्त्वाचे ग्रंथ.
मुंबई महानगराच्या विकासार्थ गगनविहारींनी बहुमोल सेवा केली. सामाजिक सेवा संघ (सोशल सर्व्हिस लीग), ग्राहक मार्गदर्शक संस्था (कंझ्यू मर गायडन्स सोसायटी) यांसारख्या संघटनांच्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःस वाहून घेतले. गगनविहारींचे मुंबई येथे निधन झाले.
गद्रे, वि. रा. दळवी, र. कों.