टाळेबंदी : कामगारांनी आपल्या अटी मान्य कराव्यात म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी मालकाने कारखान्यास टाळे ठोकणे. संप हे जसे कामगारांचे शस्त्र आहे, तसेच टाळेबंदी हे मालकांचे. पूर्वीच्या काळी टाळेबंदी वारंवार होत असे. आपल्या कारखान्यातील कामगारांनी कामगार संघटनांचे सदस्य होऊ नये, असा मालकांचा कटाक्ष असे. ही अट मान्य करून ते कामगारांविरुद्ध टाळेबंदी वापरून तसे लेखी कळविण्याची सक्ती कामगारांवर करीत असत. एखाद्या मालकाचे अनेक कारखाने असल्यास, त्यांपैकी एखाद्या कारखान्यातील यशस्वी संप मोडून काढण्यासाठी अन्य कारखान्यांची टाळेबंदी करण्याचे धोरणही मालक काही वेळा अवलंबीत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून टाळेबंदीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते.

संपावर जसे कायद्याचे काही निर्बध आहेत, तसेच टाळेबंदीवरही आहेत परंतु मनात येईल त्या पद्धतीने कारखान्याचा कारभार मालक अनेकदा चालवितात. ती पद्धत पसंत नसेल, तर तिला विरोध करावा लागतो. तो विरोध संपाच्या रूपाने प्रगट होतो. त्यामुळे टाळेबंदीपेक्षा संपच अधिक वेळा घडून येतात. दोहोंचा परिणाम कारखाना बंद पडण्यातच होतो, म्हणून औद्योगिक सांख्यिकीमध्ये संप व टाळेबंदी यांसंबंधीची आकडेवारी वेगवेगळी न देता एकत्रच दिलेली असते.

धोंगडे, ए. रा.