मेस, सैनिकी : सामान्यतः मेस या इंग्रजी शब्दाचा अर्थ अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन जेवण घेणे असा आहे तथापि सैनिकी मेस ही सेना अधिकाऱ्यांची, त्यांच्या पलटणीच्या इतिहासाशी निगडित अशी संस्था आहे. पलटणींच्या विशिष्ट परंपरा, त्यांच्या अस्मिता व स्वयंभाव यांचे ती एक प्रतीक असते. मेस संस्थेमुळे अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक व सामूहिक वर्तन-वर्तणुकीची जडण-घडण व जोपासना केली जाते अधिकाऱ्यांमध्ये पलटणीचा आत्मभाव (ए स्पिरीट द कोअर) निर्माण केला जातो. एकंदरीत अधिकाऱ्यांना, पलटण व सेनादलाचा क्षात्र तसेच ऐतिहासिक वारसा व परंपरा यांना साजेल अशा दृष्टीने चारित्र्य संपन्न करणे, हाच या मेसचा स्थायीभाव व कार्य असते. वरील स्पष्टीकरण लक्षात घेता, सैनिकी मेस व इतर मेस (खानावळी, क्लब वगैरे) यांतील भेदाभेद कळून येतो.

भारतेतर मेसची पार्श्वभूमी : मेस व अधिकारी यांचे नाते सैनिकी वृत्तीच्या समाप्तीपर्यंत अतूट असते. प्राचीन ग्रीसच्या स्पार्टा राज्यात प्रत्येक पुरुष व्यक्तीला स्वतःचे सर्व आयुष्य व श्रम युद्धकलेत आणि युद्ध करण्यात व्यतीत करावे लागे. युद्धकला वगळता इतर मानव्य विद्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाई. स्पार्टात सर्व मुलांना त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षापासूनच कुटुंबातून तोडून बालक क्षात्र संघात दाखल करण्यात येई. वयाच्या वीस वर्षापर्यत या संघात युद्धकलेचे शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक स्पार्टन प्रौढ क्षात्रसंघात म्हणजे मेसमध्ये प्रवेश करी. स्पार्टा राज्याच्या नियमाप्रमाणे २१ ते ६० या आयुष्यकाळात प्रत्येक पुरुषाला जी सैनिकी सेवा करावीच लागे, ती सैनिकी मेसचा सदस्य या नात्यानेच. तसेच त्याला मेसची वर्गणी देणे वा अन्नपुरवठा करणेही आवश्यक असे. एखाद्याने जर रणभीरुता दाखविली, अथवा क्षत्रियाला अनुचित असे वर्तन केले, तर त्याला मेसमधून हाकलून देण्यात येई. किंबहुना त्याला समाजातून बहिष्कृत केले जाई. विवाह झाल्यानंतर सुद्धा स्पार्टन पुरुषाला कुटुंबात राहाण्या-जेवण्याची मनाई करण्यात येई. स्पार्टाच्या राजांनादेखील हा दंडक लागू असे.

तुर्क-अफगाण किंवा मोगल यांच्या छावण्या म्हणजे प्रतिनगरेच असत. ज्याला जमेल त्याने आपला कौटुंबिक लवा जमा जवळ बाळगावा अशी ती व्यवस्था असे त्यामुळे मेसची आवश्यकता त्यांना भासत नसे.

इंग्लंडमध्ये १७३० सालच्या सुमारास मेस अस्तित्वात आली असावी. द न्यू आर्ट ऑफ वॉर (नवीन युद्धकला १७४०) या ग्रंथाचा कर्ता स्ट्रॅडलिंग हा पुढीलप्रमाणे माहिती देतो. तत्का लीन कनिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यांचा पगार अत्यल्प होता. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सार्वजनिक निवासात (इन) एका टेबलाभोवती बसून जेवण खाण्याचा खर्च झेपत नसे तेव्हा सर्व श्रेणींच्या अधिकाऱ्यांनी वेतनाच्या प्रमाणात भोजन वगैरेवरील खर्च वाटून करण्याचे ठरविले यामुळे सहजीवन व वरिष्ठांचे मार्गदर्शन या र्गोष्टी कनिष्ठ अधिकाऱ्यांना मिळून मेस अस्तित्वात आली.

भारतीय मेसची पाश्वभूमी व स्वरूप : ऐतिहासिक दृष्ट्या सैनिकी मेसच्याउगमाबद्दल निश्चित ज्ञान उपलब्ध नाही. ब्रिटिश राजवट वगळता भारताच्या सैनिकी इतिहासात मेससारखी एखादीसंस्था असल्याचे आढळत नाही. गुरुकुलात, शिष्यांना क्षात्रकलेबरोबरच इतर विद्या शिकविल्या जात. तेथील सहशिक्षण व सहजीवनाचे उद्दिष्ट राजकुलीनेतरांना शिष्ट नागरिक किंवा राजपुत्रांना राज्यकारभारक्षम करणे असे होते [→ अर्थशास्त्र, कौटिलीय]. प्राचीन वैदिक-संस्कृत वाङ्‌मयात (उपनिषदे, कुमारसंभव इ.) वरील म्हणण्याला दुजोरा मिळतो.

“सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै.’’ या उक्तीवरून गुरुकुलाचे स्वरूप स्पष्ट होते. गुरुकुलातील वास्तव्यानंतर शिष्य आपापल्या वर्णाला उचित असे काम करण्यास जात.

रामायणात केवळ शिबिरांचे उल्लेख आहेत तर महाभारतातील युद्धवर्णनात दुर्योधन स्वतः संग्रामाच्या पूर्वतयारीच्या संदर्भात शिबिर व रसदपुरवठ्याबद्दल बोलतो. कौटिलीयअर्थशास्त्र, हर्षचरित वा तत्सम ग्रंथांतही सैनिकी शिबिरांचे ढोबळमानाने उल्लेख आढळतात.

शिवाजीपासून ते पहिल्या बाजीरावाच्या अंतापर्यंत मराठी सैन्य शिबिरे वगैरे सुखसोयींवर अवलंबून नव्हते. पुढे मात्र मराठी सैन्याचे स्वरूप मोगली सैन्याप्रमाणे होऊन बाजारबुणगे, स्त्रिया वगैरे सैन्याबरोबर राहू लागले. उदा., १७६१ च्या पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या छावण्या तथापि तत्कालीन भारतीय राजांच्या सेनेत ब्रिटिशांप्रमाणे सैनिकी मेस नव्हत्या. आजच्या भारतीय सैनिकी मेसची परंपरा ब्रिटिशांच्या आगमनापासून सुरू होते. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (१८५७ पर्यंत) हिंदुस्थानात मेस नसाव्यात. ज्या ज्या गावी ब्रिटिश सैन्याची छावणी असे, तेथील बंगल्यातून चार-पाच अधिकारी राहण्याखाण्यासाठी एकत्र येत असत. अशा निवासांना ‘चमेरी’ (Chummery) म्हणत. इंग्लंडमध्ये खाजगी कुटुंबावर अधिकारी वगैरेंच्या निवासाची जबाबदारी टाकण्यात येई, यूरोपीय खंडातही अशीच व्यवस्था असावी. कोरेगावच्या लढाईत (जानेवारी १८१८) भाग घेतलेला इंग्रज अधिकारी कॅप्टन स्टाँटन याच्या एका नुकसानीच्या अहवालावरून असे दिसते, की त्या काळी अधिकारी मोहिमेवर असताना आपला नोकरवर्ग बरोबर घेई, परंतु मेस नसत, त्या काळी उच्च अधिकारी फक्त ब्रिटिशच असल्यामुळे हिंदुस्थानी कनिष्ठ अधिकारीवर्गही आपली वेगळी व्यवस्था करीत असावेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वरील परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. १८५७ सालच्या प्रक्षोभानंतर, हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांनी पक्क्या छावण्या प्रस्थापित केल्या. ब्रिटिश पलटणींनी तसेच ब्रिटिश नागरिकांनी सामाजिक वेगळेपणा राखण्यासाठी मेस व क्लब यांचा आश्रय घेतला. व्हिक्टोरिया राणीच्या युगातील ब्रिटिश समाज इंग्लिश संकल्पना व वांशिक आणि सांस्कृतिक भेदाने भारावलेला होता. इंग्लिश उच्चवर्णीयांच्या विद्यालयात विद्यापीठीय शिक्षण घेतलेले प्रशासक व लष्करी अधिकारी येऊ लागले. हिंदुस्थानात इंग्लिश समाजाची व राष्ट्राची एक प्रतिकृती उभारण्याचा अट्टाहास सुरू झाला. हिंदी लोकांना सुसंस्कृत करण्याच्या तथाकथित ध्येयपूर्तीसाठी ते कटिबद्ध झाले. बहुतेक अधिकारी बरीच वर्षे अविवाहित राहत व त्याकरिता मेसची आवश्यकता पडली आणि ती पूर्ण करण्यात आली. या मेसमध्ये विद्यालीयन आचार-विचार वा खेळ यांचीच परंपरा पुढे चालविली गेली. हिंदी वस्तीपासून अलग व एकत्र राहण्यामुळे हिंदी लोकांपासून इंग्लिश अधिकाऱ्यांना स्वसंरक्षण करणे शक्य झाले. पहिल्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत हिंदी राजपत्रित सैनिकी अधिकारी नव्हते त्यानंतर हिंदी अधिकारी मेसमध्ये ब्रिटिशांच्या बरोबर राहू लागले तथापि मेसमध्येही त्यांना वेगळेपणाने वागविले जाई. मेसमध्ये ब्रिटिश वातावरण असल्यामुळे हिंदी अधिकाऱ्यांवर त्याचा परिणाम होणे क्रमप्राप्तच होते. १९३९ सालापर्यंत अशीच परिस्थिती होती त्याकाळच्या मेसमधील आयुष्यक्रमाविषयी हिंदी अधिकाऱ्यांची पुस्तके नसल्यामुळे त्यांच्या भावना कळत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मेसच्या परंपरेत भारतीय आचारविचारांचा आविष्कार होऊ लागला. उदा., राष्ट्रपतीच्या (जे संरक्षणसेनांचे उच्चतम सेनापती आहेत) ‘आरोग्य’ चिंतनाप्रित्यर्थ मदिरेऐवजी जलपान करणे वगैरे. स्वतंत्र भारताच्या सेनेत ‘मेस’ या संस्थेची आवश्यकता नाही, असाही एक विचारप्रवाह आहे परंतु तरुण आणि अननुभवी अधिकाऱ्यांच्या प्रबोधनासाठी मेसची नितांत आवश्यकता आहे, असे बऱ्याच जणांना वाटते.


रेजिमेंट व कोअरच्या केंद्रीय मेस या प्रायः संबंधित शहरांतच आहेत उदा., मराठा रेजिमेंटची मेस बेळगावाला, महार रेजिमेंटची सागरला, तोफखान्याची देवळालीला, कोअर ऑफ सिग्नलची महूला, रणगाडा दलाची अहमदनगरला. पलटणींच्या मेस मात्र पलटणीच्या मुक्कामी असतात.

मेसच्या आचार पद्धतीमुळे प्रत्येक अधिकाऱ्यात रेजिमेंट किंवा पलटणीबद्दल जाज्वल्य निष्ठा निर्माण होते व सहकार प्रवृत्ती वाढते. भोजनाच्या टेबलावर तसेच मेसमध्ये व इतर प्रमुख ठिकाणी स्मृतिचिन्हे, ढाली, प्याले, रणसन्मान, शत्रूकडील जिंकलेल्या ध्वजपताका, शस्त्रास्त्रे वगैरे अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून क्षात्रपरंपरा जोपासली जाते. मेसमध्ये पलटण अथवा रेजिमेंट ‘अतिथी रात्री’ साजऱ्या केल्या जातात. नवागतांचे स्वागत वा पलटणीला सोडून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना निरोप देऊन पलटणीच्या आत्मीयतेची आठवणही करण्यात येते. अशा प्रसंगी पलटणीचा वाद्यवृंद पलटणीची गीते वाजवितो, तर भोजनोत्तर राष्ट्रपतींचे आरोग्यचिंतन केल्यानंतर अधिकारी रंगेल खेळ खेळतात. रणगाडे अस्तित्वात येण्यापूर्वी प्रत्येक रिसाला पलटणीत घोडेस्वार अधिकारी टेबलावर अश्वारोहण करीत असत. स्त्रियांना त्यांच्या राखीव दालनाशिवाय किंवा बहिर्दालनाखेरीज इतर ठिकाणी मज्जाव असतो परंतु गणतंत्रदिनानिमित्त त्यांना मेसमधील भोजनाचे निमंत्रण देण्यात येते. मेसमध्ये स्त्रीविषयक वा वादग्रस्त गोष्टी करणे अशिष्ट आणि सैनिकी अधिकाऱ्यांच्या परंपरेला बट्टा लावणारे वर्तन समजण्यात येते. धूम्रपान तसेच मद्यपानाविषयीही काही नियम व संकेत पाळण्यात येतात.

आरोग्यचिंतनसमयी मद्यपान करण्याचे मूळ देवासाठी वा मृताकरिता करण्यात येणाऱ्या प्राचीन धार्मिक विधीत आढळते. ग्रीक व रोमन सैनिक, देवतेवर मद्याभिषेक तसेच सामान्य भोजन-प्रसंगी देवता व मृतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मद्यपान करीत. यावरून आपल्याकडील तिलांजली विधी आठवतो. सतराव्या शतकात लंडन येथील मिड्‌ल टेंपलचे सदस्य ‘टोस्ट’ (मद्य) पीत व इंग्लंडच्या राजाच्या सेवेत प्राण देण्याची प्रतिज्ञा करीत. काही युद्धनौकांवर मात्र टोस्ट बसूनच पिण्यात येते तर काही ब्रिटिश मेसमध्ये, त्यांची स्वामीनिष्ठा संशयातीत असल्यामुळे टोस्ट न पिण्याची मुभा त्यांना इंग्लंडच्या राजाने दिलेली आढळते. काही मेसमध्ये एक पाय टेबलावर व दुसरा खुर्चीवर ठेवून टोस्ट घेतात. बहिर्दालनातील दिवे जेवणापूर्वी मालविणे, नंग्या तलवारी घेऊन जेवण घेणे, अशा सकृतदर्शनी चमत्कारिक पण ऐतिहासिक परंपरा लाभल्यामुळे ते आचार आजही आढळतात.

मेस संस्थेत सामान्य जीवनक्रमापेक्षा आगळे जीवन असते. हे जीवन समान मूल्ये मानणाऱ्या अधिकाऱ्यांत बंधुभावतुल्य संबंध घट्ट करते. यासाठी मेससंस्था जिवंत ठेवणे कदाचित अनिवार्य ठरेल.

मेस ही एक संस्था असल्यामुळे समित्या तसेच पदाधिकाऱ्यांकडून तिचा कारभार चालविण्यात येतो. मेसचा खर्च बहुतांशी वर्गणी गोळा करून, तर काही अंशी संरक्षणखात्याच्या अनुदानातून केला जातो.

संदर्भ : 1. Batnett, Correlli, Britain and her Army : 1509-1970.

             2. Edwards, J. P. Military Customs, Aldershot. 1954.

             3. Hutehins, F. G. Illusion of Permancnce, Princeton, 1967.

             4. Mason, Philip, A Matter of Honour, London, 1976.

             5. Toynbee, Arnold J. War and Civillization, New York, 1950.

दीक्षित, हे. वि.