मेल्‌व्हिल्‌, हर्मन: (१ ऑगस्ट १८१९–२८ सप्टेंबर १८९१). अमेरिकन कादंबरीकार. न्यूयॉर्क येथे जन्मला. वडील इंग्रज तर आई न्यू यॉर्कमधील डच कुटुंबातील. ऑल्बनी अकॅडमी व ऑल्बनी क्लासिकल स्कूल (न्यूयॉर्क) येथे शिक्षण. वडील लहानपणीच दिवाळे काढून निर्वतल्यामुळे शिक्षण थांबले. आई जहांबाज स्वभावाची. तिचे चित्र पिएर या कादंबरीत त्याने रंगविलेले दिसते.

तरुणपणी शेतकामगार, कारकून, शिक्षक असे अनेक व्यवसाय केल्यानंतर १८३९ साली तो जहाजावर खलाशी झाला. ‘दर्यावर्दी जीवन हेच माझे येल कॉलेज आणि हार्व्हर्ड विश्वविद्यालय’ हे मेल्‌व्हिलचे उद्‌गार अक्षरशः खरे आहेत कारण दर्यावर्दी जीवनातील अनुभवांतूनच त्याची लेखनकला जन्मली व विकास पावली.

टायपी (१८४६) व ओमू  (१८४७) या त्याच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांत प्रशान्त महासागरातील मनुष्यभक्षक रानटी जमातींची वस्ती असलेल्या बेटांवरचे त्याचे मनोरंजक अनुभव त्याने सांगितलेले आहेत. मार्डी (१८४९) ही याच छापांची कादंबरी पण रूपकाच्या हव्यासामुळे काहीशी शब्दबंबाळ व क्लिष्ट झाली आहे. रेडर्ब(१८४९). व्हाइट जॅ केट (१८५०) यांत अनुक्रमे व्यापारी व आरमारी जहाज यांवरील खलाशी जीवनाचे जिवंत चित्रण आहे. मोबी डिक (१८५१) ही मेल्‌ व्हिल्‌ची सर्वोत्कृष्ट कादंबरी. ही कादंबरी म्हणजे एक गद्य महाकाव्यच आहे. मोबी डिक या नावाचा एक प्रचंड पांढरा देवमासा व त्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात एक पाय गमावून बसलेला खुनशी, मनस्वी व हेकट स्वभावाचा एहब हा कप्तान यांच्यातील रोमहर्षक व शोकपर्यवसायी संघर्षाची ही अनेकरंगी कथा अर्थगर्भ रूपकाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. पिएर (१८५२) ही आत्मचरित्रपर हळवी कादंबरी मात्र अपेक्षाभंग करते. पिआझ्झा टेल्‌स  (१८५६) हा कथासंग्रह. बॅटल पीसेस ॲन्ड ॲस्पेक्ट्स ऑफ द वॉर (१८६६) हा काव्यसंग्रह आणि क्लॅरल (१८७६) हे दीर्घ कथाकाव्य ही त्याची आणखी इतर पुस्तके. मेल्‌व्हिल्‌ची सुरुवातीची पुस्तके लोकप्रिय झाली, तरी मोबी डिक पासून त्याची लोकप्रियता जी ओसरली, ती १९२० पर्यंत. आज दर्यावर्दी जीवनाचा सच्चा चित्रकार व या जीवनाचे चित्रण करताना मानवी आयुष्याच्या गूढातील भीषणरम्यतेचा मागोवा घेणारा समर्थ कलाकार या दोन्ही नात्याने मेल्‌व्हिल्‌चे यश अबाधित आहे. न्यूयॉर्क येथेच तो निधन पावला. त्याची बिली ही कादंबरी त्याच्या मृत्यूनंतर १९२४ साली प्रसिद्ध झाली.

संदर्भ : 1. Berthoff. W. The Example of Melville, 1962.

             2. Howard, Leon, Herman Melville : A Biography, Berkley, California, 1951.

             3. Newton, Arvin, Melville, American men of LettersSeries, 1950.

             4. Vincent H. P. Ed. The Works of Herman Melville, 14 Vols., Chicago, 1947.

नाईक, म. कृ.