मेन्सियस : (इ. स. पू. सु. ३७१–सु. २८९). प्रख्यात चिनी तत्त्वज्ञ, कन्फ्यूशसचा अनुयाई व ताओ मताचा पुरस्कर्ता. मेन्सियस हे मंग-ज (आचार्य मंग) या नावाचे लॅटिनीकरण आहे. मंग-ज याच्या वचनांचा संग्रह हाही मंग-ज याच नावाने प्रसिद्ध असून तो बाराव्या शतकापासून एक अभिजात ग्रंथ म्हणून प्रख्यात आहे.
मेन्सियस वा मंग-ज हा लू ह्या राज्याजवळच्या एका लहान संस्थानचा रहिवासी होता. तो कन्फ्यूशस (खुंग-फू-ज किंवा आचार्य खुंग) याचा अनुयायी असल्यामुळे तत्कालीन इतर विचारप्रणालींबरोबर विवाद करण्याच्या उद्देशाने त्याने आपले गाव सोडले आणि चीनमधल्या इतर राजदरबारी अधिकारपद मिळविण्यासाठी भ्रमण सुरू केले. अधिकारपद मिळविण्यात त्याला यश मिळाले नाही तथापि त्या काळी विचारवंतांचा राजदरबारी मान ठेवला जात असे. त्यामुळे अनेक राजांना उपदेश करण्याची संधी त्याला मिळाली.
मेन्सियसने कन्फ्यूशसच्या विचारांत नवीन तत्त्वांची भर घातली आणि ही तत्वे कन्फ्यूशसपेक्षाही अधिक पद्धतशीरपणे मांडून प्रतिपादन केली. मनुष्यस्वभाव हा जात्याच सत्कृत्य करण्याकडे झुकलेला आहे. हे त्याचे मुख्य तत्त्व होते. एखादे मू ल विहीरीत पडण्याचा धोका आहे हे पाहिल्यावर, प्रत्येक मानव त्याला वाचविण्यासाठी अंतःप्रेरणेने धाव घेतो, यावरून खऱ्या मनु ष्यस्वभावाची परीक्षा होते असे त्याचे म्हणणे होते. तथापि जात्याच असलेला हा मूळ स्वभाव वा वृत्ती बाह्यकारणांमुळे विकृत होते. उदा.. लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीने पर्वतावरची सर्व झाडी नष्ट होते. मनुष्याला सत्कृत्य करण्याची वृत्ती स्वतःच, प्राणायाम आणि मनन-चिंतन करून किंवा योग्य शिक्षण प्राप्त करुन बळकट करता येते, असे त्याने प्रतिपादले.
विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण व राजांना योग्य उपदेश देणे, हे मेन्सियसने आपले मुख्य कर्तव्य मानले. राजाने आपल्या वर्तणुकीचा आदर्श प्रजेसमोर ठेवला पाहिजे, प्रजेचे हीत पाहिले पाहिजे आणि त्यासाठी शेतीचे उत्पादन वाढविले पाहिजे, असा त्याचा उपदेश होता. प्रजेचे हीत जोपासणाऱ्या राजाकडे प्रजाजन आपणाहूनच वळतात आणि त्याचे राज्य बळकट करतात. समृद्ध प्रजेला सत्कृत्य करण्याची वृत्ती उत्तम तऱ्हेने जोपासता येते. असे राज्य आदर्श बनते, हे त्याने सर्व राजदरबारी प्रतिपादले. गुरूनेही आपल्या वर्तणुकीचा आदर्श विद्यार्थी आणि इतरांच्या समोर ठेवला पाहिजे. किंबहुना गुरू (जंग्) हा राजापेक्षाही महत्त्वाचा आहे. कारण त्याच्या शिकवणुकीचा परिणाम शेकडो पिढ्या टिकतो, असे त्याने प्रतिपादिले.
मनुष्यात जात्याच चार ‘अंकुर’ अथवा सद्गुण असतात. त्यांची जोपासना करणे हीच खरी साधना होय. त्यांपैकी पहिला अंकुर म्हणजे ‘रन्’ मनुष्याला अंतःप्रेरणने इतरांविषयी जे प्रेम, जी आस्था व जो जिव्हाळा वाटतो त्याला ‘रन्’ असे त्याने संबोधले. आपल्या निकटच्या लोकांविषयी जे प्रेम वाटते, तेच हळूहळू सर्व मानवजातीविषयी निर्माण झाले पाहिजे म्हणजे समाजाची घडी व्यवस्थित बसते. ‘यी’ (किंवा ‘इ’) हा दुसरा अंकुर. स्वतःच्या वाईट वर्तणुकीबद्दल वाटलेली लज्जा किंवा दुसऱ्याच्या वाईट वर्तणुकीबद्दल वाटलेला तिटकारा यापासून हा अंकुर निर्माण होतो. या अंकूराची जोपासना केल्यामुळे मनुष्याची वर्तणू क आदर्श बनते. मनुष्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती बद्दल आदर वाटतो आणि अशा व्यक्ती ची शिकवणूक आचरणात आणावी असे वाटते. यातून ‘ली’ किंवा योग्य वर्तणूक हा तिसरा अंकुर निर्माण होतो. तसेच योग्य आणि अयोग्य काय आहे या विचाराने ‘जृ’ किंवा सदसद्विवेक बुद्धी चा चौथा अंकुर निर्माण होतो. हे चारही अंकुर बाहेरून स्वतःत रुजवता येत नाहीत त्यांची अंतर्यामीच जोपासना केली पाहीजे, असे त्याचे म्हणणे आहे.
या सर्व अंकुरांची नीट जोपासना करुन राज्यशासन योग्य तऱ्हेने चालविणाऱ्या राजाला विश्वप्रेरणेचे वरदान (थ्यन् मिंग्) मिळते व शासन योग्य न केल्यास हे वरदान काढून घेण्यात येते. याचाच अर्थ प्रजेला आपले शासन अयोग्य प्रकारे केले जात आहे याची खात्री पटल्यास, ती राजवट उलथून टाकण्याचा अधिकार आहे, असे मेन्सियसने मानले. अर्थातच हे विधान नंतरच्या राजांना व सम्राटांना रुचले नाही तथापि चिनी लोकांच्या मनात ते आजतागायत पक्के रुजलेले आहे.
मेन्सियसच्या वचनांचा मंग-ज हा संग्रह असून तो सात भागांत व २६१ प्रकरणांत विभागला आहे. ह्या वचनांचे संकलन व संपादन सर्वप्रथम चाओ-ची (इ. स. १०८–२०१) नावाच्या व्यक्तीने केले. डॉबसन यांनी द वर्क्स ऑफ मेन्सियस (१९६२) आणि जेम्स लेग यांनी इ चायनीज, क्लासिक्स, व्हॉल्यूम II मेन्सियस (तिसरी आवृ. १९६०) ह्या नावांनी इंग्रजीत ही वचने भाषांतरित केली आहेत.
संदर्भ : Fung-Yu-lan, A Short History of Chinese Philosophy, New York, 1948.
देशिंगकर, गि. द.