मेंद्री :(तिपन, तिपिन लॅ. ॲलोफायलस कोबे कुल–सॅपिडेसी). हा लहान वृक्ष भारतात कारवार, कोकण, महाबळेश्वर, आसाम येथे आढळतो. याची एकांतरित (एकाआड एक) व लोंबती, त्रिदली पाने फांद्यांच्या टोकांस येतात दले लवदार फुले लहान, पांढरी, मंजऱ्यांवर मे–ऑगस्टमध्ये येतात. फळे पिकल्यावर लाल, गोल, गुळगुळीत व वाटाण्याएवढी असून खाद्य आहेत. फुलांची रचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ सॅपिंडेसी अथवा अरिष्ट कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मेंद्रीच्या प्रजातीत (ॲलोफायलसमध्ये) एकूण १९० जाती असून त्यांपैकी भारतात सु. ८ आहेत.

तिपनी :ॲ. सेरॅटस ही जाती कंबोडिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, मलाया येथे आणि आसाम, पूर्व व पश्चिम भारतात सापडते. हा लहान वृक्ष किंवा आधारावर चढणारे झुडूप असून पाने त्रिदली व फुले लहान व पांढरी असतात. याचे मूळ अतिसारावर उपयुक्त आहे. फळे खाद्य असतात. ॲ. झेलॅनिकस या हिमालयी जातीची फळेही खाद्य आहेत.

जमदाडे, ज. वि.