मेंडेल, ग्रेगोर योहान : (२२ जुलै १८२२–६ जानेवारी १८८४). ऑस्ट्रियन नैसर्गिक विज्ञानवेत्ते व सेंट ऑगस्टीन पंथातील ॲबट (मठ प्रमुख). सजीवांच्या ⇨ आनुवंशिकतेची वैज्ञानिक उपपत्ती मांडून त्यांनी आधुनिक आनुवंशिकतेच्या शास्त्राचा [→ आनुवंशिकी] पाया घालण्याचे महत्कार्य केले.
मेंडेल यांचा जन्म हाइनझेनडॉर्फ (त्या वेळी ऑस्ट्रियन सायलीशियातील) येथे झाला. ऑल्मीट्झ (आता चेकोस्लोव्हाकियातील ऑलॉमोत्स) येथील तत्त्वज्ञानाच्या संस्थेत दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर १८४३ मध्ये ते मोरेव्हियातील ब्रुनो (आता चेकोस्लोव्हाकियातील बॅर्ना) येथील सेंट ऑगस्टीन पंथाच्या मठात दाखल झाले. तेथे धर्मशास्त्रावरील शिक्षण घेण्याबरोबरच त्यांनी कृषी, फलसंवर्धन व द्राक्ष वेलीची लागवड या विषयांचा अभ्यास केला. १८४७ मध्ये त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली व काही काळ त्यांनी जुन्या बॅर्ना मठात व्हिकार म्हणून काम केले. इनायमो येथील माध्यमिक शाळेत त्यांनी १८४९ पासून काही काळ ग्रीक भाषा व गणित या विषयांचे बदली शिक्षक म्हणून अध्यापन केले. पुढे १८५० साली ते रीतसर शिक्षक होण्याच्या प्रमाणपत्र परीक्षेला बसले पण तीत ते अनुत्तीर्ण झाले. नंतर १८५१–५३ या काळात मठप्रमुखांनी मेंडेल यांना व्हिएन्ना विद्यापीठात, भौतिकी, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांच्या अध्ययनासाठी पाठविले. १८५४ मध्ये ते बॅर्ना येथे परते व तेथील तांत्रिक विद्यालयात त्यांनी नैसर्गिकविज्ञानाचे १८६८ पर्यंत अध्यापन केले तथापि शिक्षकी पेशाचा परवाना मिळविण्याच्या परीक्षेत त्यांना अखेरपर्यंत यश लाभले नाही. १८६८ मध्ये त्यांची बॅर्ना मठाच्या ॲबट पदावर नेमणूक झाली.
मेंडेल ह्यांच्या वेळी आणि तत्पूर्वीही वनस्पती व प्राणी ह्यांच्या जातींत कृत्रिम संकरणाने इच्छित संकर मिळविण्यात यश आले होते. शार्ल नॉदीन ह्यांनीही निरनिराळ्या लक्षणांचे अनुहरण (लक्षणे एका पिढीतून पुढील पिढ्यांत उतरण्याच्या प्रक्रिया वंशगती) कशाप्रकारे होते हे जाणून घेण्याकरिता संशोधन केले पण याबाबतीत अनुहरणाचा आधार काय आहे, त्याचे आचरण काही विशिष्ट नियमांद्वारे होते काय यांबाबत निश्चित माहिती कोणालाच नव्हती. मेंडेल ह्यांनी ज्या वेळी आनुवंशिकतेवर १८५६ साली आले काम सुरू केले, त्या वेळी अनुहरणाचे पिढ्यान्-पिढ्या आचरण कसे होते, हे समजण्यासाठी काय करावयास पाहिजे याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होती. अनुहरणाचा प्रश्न मूलतः संख्येचा आहे हे त्यांना समजले होते म्हणून त्यांनी प्रत्येक पिढीत वाटाण्याच्या झाडांची संख्या मोठी असण्याची दक्षता घेतली (१८५६–६३ या काळात त्यांनी वाटाण्याच्या एकूण २८,००० झाडांचा संशोधनाकरिता उपयोग केला असावा, असा अंदाज करण्यात आलेला आहे). एकाच वेळी एकाच लक्षणाचे अनुहरण काही पिढ्यांपर्यंत कसे होते हे पाहिल्यावरच दोन किंवा तीन लक्षणांच्या अनुहरणाचा प्रश्न त्यांनी हाताळला. ह्या कामाकरिता वाटाण्यासारख्या योग्य वनस्पतीची त्यांनी निवड केली. ह्या कारणांमुळे त्यांना अनुहरणावरील संशोधनात जे पूर्वीच्यांना मिळाले नाही ते यश मिळाले. १८६२ मध्ये बॅर्ना येथे त्यांच्या सहकार्याने शास्त्रीय विचारांची देवघेव करण्यासाठी नॅचरल सायन्स सोसायटी स्थापन केली व तेथील कार्यक्रमांत मेंडेल क्रियाशील भाग घेत असत. मठातील ग्रंथालयात त्यांनी कृषी, उद्यानविद्या, वनस्पतिविज्ञान इ. शाखांमध्ये नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांची सतत भर घालून आपल्या प्रयोगाची पद्धती, दिशा व साध्य ही निश्चित केली होती. चार्ल्स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय नॅचरल सिलेक्शन (१८५९) या ग्रंथाचे त्यांनी परिशीलन केले होते. तथापि मेंडेल यांचे प्रयोग तत्पूर्वी बरीच वर्षे सुरू होते. त्यांनी आपल्या संशोधनपर निबंधाचे वाचन नॅचरल सायन्स सोसायटीपुढे ८ फेब्रुवारी १८६५ रोजी केले व त्या वेळी ‘वनस्पती संकर’ हेच आपले संशोधन क्षेत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते इतकेच नव्हे तर संकरानंतर मिळालेल्या भिन्न संकरजांची संख्या व भिन्न पिढ्यांतील वैकल्पिक लक्षणांच्या अनुहरणातील सांख्यिकीय निश्चिती इ. बाबींवरचे त्यांचे कार्य तसे पहिलेच आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली होती व ती पुढे सत्यच ठरली. त्यांनी केलेले संकरप्रयोग व त्यांपासून पितरांतील वैकल्पिक (पिवळा विरुद्ध हिरवा, खुजा विरुद्ध उंच) शारीरिक लक्षणे पुढच्या पिढीत कशी उतरतात यासंबंधीचे (अनुहरण नियमांचे) त्यांचे संशोधन तेथील नॅचरल सायन्स सोसायटीतर्फे १८६६ मध्ये प्रसिद्ध झाले आणि ते यूरोपातील व अमेरिकेतील १३४ वैज्ञानिक संस्थांना पाठविण्यातही आले परंतु १९०० साली (त्यांच्या मृत्यूनंतर १६ वर्षेपर्यंत) हॉलंडमधील ह्यूगो द व्हॅ्रीस, जर्मनीतील के.ई. कॉरेन्स व ऑस्ट्रियातील ई. चेर्माक यांनी ते प्रकाशात आणेपर्यंत त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. ह्याला काही कारणे आहेत. मेंडेल हे मूलतः शास्त्रज्ञ नव्हते. त्या वेळचे जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाने प्रभावित झाले होते. जीवविज्ञानाचे क्रमविकासाच्या सिद्धांताद्वारे परमसीमा गाठली व आता आपले काम विशिष्ट जात दुसऱ्या जातीपासून कशी उद्भवली हे पाहण्याचे फक्त आहे, असे त्यांना वाटत होते. जीवविज्ञानात सांख्यिकीचा उपयोग होण्याची कल्पनाही त्यांना आली नाही. मेंडेल हे त्यांच्या काळाच्या पुढे असणारे अग्रगामी होते. द व्ह्रीस, कॉरेन्स आणि चेर्माक हे वनस्पतिशास्त्रज्ञ अनुहरणावर नंतर स्वतंत्रपणे संशोधन करीत होते व त्यांना मेंडेल यांच्यातप्रमाणे फलिते मिळाली होती. १९०० साली मेंडल यांचा १८६६ साली प्रसिद्ध झालेला शोधनिबंध या तिघांच्या स्वतंत्रपणे अवलोकनात आला व त्याबद्दल त्यांची नोंद प्रसिद्ध झाली. आनुवंशिकतेचे आधारीभूत नियम सिद्ध केल्याचे श्रेय त्यांनी मेंडेल यांना दिले म्हणून मेंडेल यांना आधुनिक आनुवंशिकीचे जनक मानण्यात येते.
मेंडेल यांनी त्यांचे उत्कृष्ट संकर प्रयोग निरनिराळी ७ लक्षणे (उंच वा खुजेपणा, बियांचा रंग व त्यांचा आकार, खोडावरील फुलांचे स्थान वगैरे) दाखविणाऱ्या वाटाण्याच्या प्रकारांवर केले. प्रयोगांतील निष्कर्षाचे स्पष्टीकरण वनस्पती व प्राणी यांमध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीत लक्षणांचे अनुहरण कारकांच्या जोडीतर्फे होते या आधारावर त्यांनी केले. याबाबतीत जे नियम त्यांनी सिद्ध केले त्यांना मेंडेल नियम म्हणतात. जरी आनुवंशिकीत तदनंतर प्रचंड प्रगती झाली, तरी हेच नियम ह्या शास्त्राला पायाभूत ठरलेले आहेत. आनुवंशिकतेचे एकक कारक असून त्यांना स्वतंत्र अस्तित्व असते. दोन कारकांचे मिश्रण होऊन त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा लोप होत नाही. हे मेंडेल यांनी प्रथम सिद्ध केले. ह्याला अनुहरणाचा विविक्त सिद्धांत म्हणतात. आता ह्याच कारकांना ⇨ जीन म्हणून संबोधतात. जोडीतील एक कारक प्रभावी असून दुसरा अप्रभावी (सुप्त) असतो. अनुहरणाच्या प्रक्रियेत हे कारक स्वतंत्र एककप्रमाणे वागतात, ही गोष्ट विशेषतः लक्षणांच्या दोन किंवा तीन जोड्या असलेल्या प्रकारांच्या संकरात पण दिसून येते यामुळेच अशा संकरजांच्या पुढील संततीत भिन्न लक्षणांची नवीन मिश्रणे आढळतात इतकेच नव्हे तर संकरजांच्या संततीतील भिन्न प्रकारांचे प्रमाण (३:१ १:२ : १ ९:३ :३:१) एकेकट्या लक्षणांच्या (किंवा त्यांच्या कारकांच्या) स्वतंत्र अनुहरणाच्या कल्पनेवर सिद्ध करता येते.
मेंडेल ह्यांनी तत्कालीन प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल व्हिल्हेम्स फोन नेअगेली ह्यांच्या सूचनेवरून हिरॅशियम (हॉकवीड) ह्या वनस्पतीवर आनुवंशिकतेसंबंधी प्रयोग केले, तसेच मधमाशीवरही केले पण ह्या दोन्ही बाबतींत त्यांनी प्रस्थापित केलेल्या नियमांचे अनुसरण न होता निराळीच फलिते मिळाली, त्यामुळे ते निराश झाले. हिरॅशियममध्ये ⇨ अनिषेकजनन होते व नर मधमाश्या अनिवेषित (फलन न झालेल्या) अंड्यांपासून विकसित होतात, हे त्यांना माहित नव्हते. पुढे १८६८ मध्ये मठाचे ॲबट झाल्यावर त्यांना प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे संशोधनाला पुरेसा वेळ मिळेनासा झाला व ऑस्ट्रियन सरकारशी मठाच्या कराबाबत त्यांचा वादही उपस्थित झाला. ह्या सर्व कारणांमुळे ते नंतर संशोधन करू शकले नाहीत. ते बॅर्ना येथे मृत्यू पावले.
पहा : आनुवंशिकता आनुवंशिकी गुणसूत्र जीन.
संदर्भ : Stern, C, : Sherwood, E. R., Ed., The Origin of Genetics: A Mendel Source Book, San Francisco, 1967.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“