मृदु रतिव्रण : हीमोफायलस दुक्रेयी नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे बहुधा संभोगजन्य असलेल्या आणि गुप्तेंद्रियावर व्रण उत्पन्न करणाऱ्या विकृतीला मृदू रतिव्रणम्हणतात. संभोगजन्य असल्यामुळे या विकृतीचा ⇨ गुप्तरोगात समावेश होतो. ⇨ उपदंश या दुसऱ्या एका गुप्तरोगातही व्रण तयार होतो परंतु त्याभोवती कठिनीकरण होत असल्यामुळे तपासणाऱ्याच्या स्पर्शाला काठीण्य जाणवते. तसे या रोगात नसल्यामुळे त्यास मृदू रतिव्रण म्हणतात. १८५० सालापर्यंत उपदंशापेक्षा हा निराळा रोग असल्याची कल्पनाही नव्हती. १८८९ मध्ये आउगूस्तो दुक्रे नावाच्या इटालियन त्वचारोगतज्ञांनी या रोगाचे सूक्ष्मजंतू निराळे असल्याचे दाखविले. हे सूक्ष्मजंतू दुक्रे यांचे स्ट्रेप्टोबॅसिलस या नावानेही ओळखले जातात.

संप्राप्ती : बहुतकरून संभोगजन्य असणारा हा रोग क्वचितच अपघाती संसर्गाने उद्‌भवतो. या रोगाच्या सूक्ष्मजंतूंचे संवर्धन करणे (नियंत्रित कृत्रिम परिसरात वाढ करणे) अवघड आहे. व्रणातील निःस्त्रावाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीतही ते पुष्कळ वेळा सापडत नाहीत.

रोगपरिस्थितिविज्ञान : पश्चिम गोलार्ध, यूरोप व ऑस्ट्रेलिया या भागांत अधूनमधून दिसणारी ही विकृती आफ्रिकेच्या काही भा गांत व आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणावर व प्रदेशनिष्ठ रूपात आढळते. इंग्लंड व वेल्समध्ये १९७५ मध्ये ६५ नवे पुरुष रोगी व ६ स्त्री रोगी आढळल्याची तेथील आरोग्य खात्याची नोंद आहे.

ग्रामीण भागापेक्षा शहरातून विशेषेकरून बंदर असलेल्या शहरांतून त्याचे प्रमाण अधिक आढळते. गलिच्छ वस्तीतील स्वैराचारी रहिवाशांत हा रोग अधिक आढळतो. भारतातील मद्रास येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हिनिरिऑलॉजी या संस्थेत १९७३ मध्ये उपचारार्थ आलेल्या या रोगाच्या रुग्णांचे प्रमाण असे होते : पुरुष ९६१,स्त्रिया व मुले १५,एकूण ९७६एकूण गुप्तरोगांच्या रुग्णांशी प्रमाण १३·३४%,काही देशांत हा रोग नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

लक्षणे : स्त्रियांपेक्षा पुरुषांत या रोगाचे प्रमाण अधिक आहे. स्त्रियांमध्ये तो लक्षणविरहित असण्याची शक्यता अधिक असते. परिपाककाल (रोगसंसर्ग झाल्यापासून ते लक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ) सर्वसाधारणपणे ७ दिवसांचा असतो. ही कालमर्यादा १ ते २१ दिवसांची असू शकते. कधी कधी २४ तासांच्या आतच लक्षणे दिसतात. सुरुवातीस एक लहान पुळी जननेंद्रियावर दिसते. १ ते ३ दिवसांत ती मोठी होऊन तिची पूयिका (पूयुक्त फोड) बनते. ही पूयिका फुटून त्या जागी व्रण तयार होतो. पुरुषांत शिश्नमणिच्छद (शिश्नमण्यावरील मोकळे त्वचा आच्छादन), शिश्नमणी व शिश्नकाय यांमध्ये असणारी खाच, शिश्नमणी आणि शिश्नकाय या क्रमाने व्रण होण्याचे प्रमाण कमी कमी होते. स्त्रियांमध्ये लघुभगोष्ठ [⟶ जनन तंत्र], भगांजली (योनिमार्गात भगाच्या पश्चभागी असलेली त्वचेची घडी), परिगुदद्वार (गुदद्वाराच्या भोवतालचा भाग) व मांड्या व ठिकाणी व्रण आढळतात. क्वचितच गर्भाशयाच्या ग्रीवा (मानेसारख्या) भागावर व्रण आढळतो. स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये एकापेक्षा अधिक व्रणांचे प्रमाण अधिक असते.

व्रण सुरुवातीस अगदी सीमाबद्ध, वेदनामय व स्पर्शासह्य असतो. तो जलद वाढतो व त्याचा व्यास १ ते २ सेंमी. होतो. कडा खरबरीत व आत खचल्यासारख्या असतात. व्रणाचा तळभाग असमान, पूमय कणोतकाचा (सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या अतिलहान वलयांनी युक्त अशा संयोजी पेशीसमूहाचा) बनलेला असून स्पर्शाने त्यातून सहज रक्तस्त्राव होतो.स्त्रियांमध्ये पुष्कळ वेळारोग लक्षणविरहित असतो. त्या मूत्रकृच्छाची (वेदनामय मूत्रोत्सर्गाची) किंवा गुदद्वारात रोग असल्यास मुरड्याची तक्रार करतात. परिगुदद्वार भागातील वेदना अगदी असह्य असू शकातात.

५० ते ७०% रुग्णांमध्ये शरीरभागासंबंधित ⇨ लसीका ग्रंथी, बहुधा एकाच बाजूच्या (उजव्या किंवा डाव्या वंक्षण-जांघेच्या भागातील) वाढतात व स्पर्शासह्य बनतात. ३० ते ५०% रुग्णांमध्ये ग्रंथी मिसळून मोठी गाठ तयार होते. अशी गाठ ५ सेंमी.पेक्षा जास्त वाढल्यास तीमध्ये पू तयार होतो व तो सुईने शोषून न घेतल्यास गाठ फुटून पू वाहू लागतो. गाठ बसल्यानंतर रोग बरा होतो. मात्र कधी कधी त्या जागी व्रण वाढून विनाशी व्रण बनतो. संलग्नता आणि अंतःक्रमणशीलतेमुळे (आत प्रसरण होण्याच्या क्षमतेमुळे) वाढून तो जननेंद्रिये छिन्नविच्छिन्न करतो.

उपद्रव : जननेंद्रिय छिन्नविच्छिन्न होण्याशिवाय व्रणातून रक्तस्त्राव होणे, मूत्रमार्ग निकोचन (मूत्रमार्ग अती अरुंद होणे), मूत्रमार्ग नाडी व्रण (अपसामान्य मूत्रोत्सर्ग होण्याचा मार्ग तयार होणे), निरुद्धमणी (शिश्नमण्यावरील त्वचा वाढून किंवा इतर कारणामुळे ती मागे न सरकणे) हे उपद्रव संभवतात.


निदान : लक्षणांवरून निदान करणे शक्य असते, तरी कारणीभूत सूक्ष्मजंतू सूक्ष्मदर्शकाखाली किंवा प्रयोगशालेय संवर्धनात सापडणे महत्त्वाचे असते. व्रणातील स्त्रावापेक्षा गाठीतील पू तपासणे अधिक उपयुक्त असते कारण त्यात दुय्यम सूक्ष्मजंतुसंसर्ग नसतो. खालील कोष्टकात इतर गुप्तरोगजन्य व्रण आणि मृदू रतिव्रण यांतील फरक दिला आहे.

गुप्तरोगजन्य व्रणांचे विभेदी निदान 

व्रण प्रकार 

वेदना 

आकारमान 

कडा 

कठिनीकरण 

उतार 

व्रणोतक 

वंक्षण गाठ 

निदानात्मक चाचणी 

उपदंश 

क्वचित 

०·५ – २ सेंमी. 

गुळगुळीत 

व उंच  

असते 

२ – ६

आठवडे 

नसते  

अगदी 

क्वचित  

असते 

कृष्णक्षेत्र दीप्ती 

मृदू रतिव्रण

बहुधा असतात

०·५ – ५ सेंमी.

खरबरीत व  

आत वळलेल्या

नसते

६ दिवस –

६ महिने

असते

असते

संवर्धन, सूक्ष्मदर्शकीय तपासणी

वंक्षण कणार्बुद

क्वचित

निरनिराळे

गुळगुळीत व उंच

असते

२ ते ६  

महिने

असते

आभासी 

गाठ

जीवोतक परीक्षा, डोनोव्हॉन सूक्ष्मजंतू सापडणे 

रतिज कणार्बुद

नसतात

०·२ – ते २·५ सेंमी.

गुळगुळीत

नसते

१ ते ५  

दिवस

नसते

असते

संवर्धन, रक्तरस परीक्षेत क्लॅमिडीया सूक्ष्मजंतू सापडणे

जननेंद्रिय परिसर्प

बहुधा असतात

०·२ – २ सेंमी

वेडीवाकडी

नसते

२ ते ६  

आठवडे

नसते

असते

संवर्धन, रक्तरस परीक्षा.

परमा

असतात

निरनिराळे

वेडीवाकडी व  

आत वळलेली

नसते

१ ते २  

आठवडे

नसते

अगदी  

क्वचित

संवर्धन सूक्ष्मदर्शकीय-गोनोकोकाय सूक्ष्मजंतू.

आघातजन्य

बहुधा असतात

निरनिराळे

गुळगुळीत

नसते

जलद 

निरनिराळे

नसते

इतर सर्व परीक्षा ऋणात्मक मिळणे

[कणार्बुद म्हणजे नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे कणोतकाची गाठ जीवोतक परीक्षा म्हणजे जिवंत शरीरातून घेतलेल्या पेशीसमूहाची रोगनिदानाकरिता स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केलेली तपासणी कृष्णक्षेत्र दीप्ती या संज्ञेच्या स्पष्टीकरणासाठी ‘सूक्ष्मदर्शक’ ही नोंद पहावी यांखेरीज ‘उपदंश’, ‘परिसर्प’ व ‘परमा’ या नोंदी पहाव्यात].

उपचार : टेट्रासायक्लीन आणि सल्फॉनामाइडे उपयुक्त आहेत. अलीकडील संशोधनानुसार आग्नेय आशियातील दुक्रे सूक्ष्मजंतू टेट्रासायक्लिनास प्रतिरोधक बनल्याचे आढळले आहे. दक्षिण व्हिएटनाममध्ये कानामायसीन उपयोगी ठरले आहे. स्ट्रेप्टोमायसीन आणि क्लोरँफिनिकॉल ही औषधेही उपयुक्त आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय : संभोगानंतर ताबडतोब जननेंद्रिय साबण व पाण्याने स्वच्छ करणे, योनिमार्ग धुण्याकरिता सौम्य जंतुनाशक वापरणे इ. उपाय उपयुक्त आहेत.

संदर्भ : 1. Datey, K. K. and others, Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1979.

             2. Scott, R. B. and othes, Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.

             3. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.

भालेराव, य.त्र्यं.