मृत्युंजयस्वामी : (१५७५–१६५०). मराठी संतकवी. पूर्वाश्रमीचे मुस्लिम. शहा मुंतोजी ब्रह्मणी किंवा मुंतोजी बामणी, शहा मुतबाजी कादरी इ. अनेक नावांनीही प्रसिद्ध. बीदरच्या बहमनी राज्यातील राजघराण्यात त्यांचा जन्म झाला होता. आनंद संप्रदायातील सहजानंद हे त्यांचे गुरू. सहजानंदांनीच त्यांना मृत्युंजय हे नाव दिले होते. ज्ञानसागरानंद हे त्यांचे सांप्रदायिक नाव. आनंद संप्रदायाची दीक्षा घेण्याआधी ते सूफी संप्रदायातील कादरी शाखेचे अनुयायी असावेत, असा एक तर्क आहे. तसेच ‘ज्ञानसागर अय्या’ ह्या नावानेही ते ओळखले जात असल्यामुळे लिंगायत संप्रदायाशीही त्यांचा संबंध काही अभ्यासक जोडतात. मृत्युंजयस्वामींच्या ग्रंथांवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधूचा परिणाम स्पष्टपणे दिसत असल्यामुळे ते मुकुंदराजांच्या परंपरेतील होत, असे मानले जाते.

 

त्यांच्या नावावर मोडणारे ग्रंथ असे : सिद्धसंकेतप्रबंध, अनुभवसार किंवा अमृतसार, अद्वैतप्रकाश, स्वरूपसमाधान, प्रकाशदीप, जीवौद्धरण, पंचीकरण, गुरुलीला, पदे, अभंग इत्यादी. अमृतानुभव नावाचा एक ग्रंथही त्यांच्या नावावर आहे. पंचीकरण हा ग्रंथ त्यांनी दख्खनी हिंदीत लिहिलेला असून त्यात त्यांनी  

शाह मुतबजी ब्रह्मणी । जिनमे नही मनामनी 

पंचीकरणका खोज किये । हिंदू-मुसलमान येक कर दिये ।। 

असे उद्‌गार काढले आहेत. वेदान्त तत्त्वज्ञानांचे विवरण ही त्यांच्या ग्रंथरचनेमागील प्रमुख प्रेरणा होय. 

नारायणपूर येथे असलेली त्यांची समाधी ‘मूर्तजा कादरी का दर्गा’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

ग्रामोपाध्ये, गं. ब.