मुहंमद पैगंबर : (? ५७१ ?–८ जून ६३२). इस्लामचे संस्थापक मुहंमद यांचा जन्म मक्का येथील कुरैश ह्या अरब टोळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. (२० एप्रिल ५७१ व ११ नोव्हेंबर ५६९ असे असे दोन पक्ष त्याच्या जन्मतारखेबाबत आहेत). त्याकाळी मक्का हे व्यापाराचे केंद्र म्हणून भरभराटीला आले होते. बायझंटीन साम्राज्य तसेच ससानिद (इराणी) साम्राज्य ह्यांच्याशी चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार मक्केद्वारा चालत असे. अनेक देशातून माल मक्केत येत असे आणि तेथून ह्या साम्राज्यातील प्रदेशांकडे रवाना होत असे. हा व्यापार इतका वाढला होता, की मक्केतील स्त्रियाही त्याच्यात सहभागी होत असत. जो व्यापार करीत नाही तो कंगाल राहतो अशी मक्केत म्हण पडली होती. ह्या व्यापाराची मक्तेदारी कुरैश टोळीकडे होती.

इतर अरब टोळ्यांना खूष राखण्यासाठी व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी कुरैश टोळीने मक्केतील ⇨ काबा या उपासनामंदिराला सर्व अरबांचे धार्मिक केंद्र हे स्वरूप दिले होते. भिन्न अरब टोळ्या ज्या ज्या देवतांची उपासना करीत त्या सर्वांना काबामध्ये स्थान देण्यात आले होते. ह्या मंदिरात देवदेवतांच्या तीनशेहून अधिक मूर्ती तसेच अनेक चित्रविचित्र आकारांच्या शिला ठेवलेल्या होत्या. काबा येथे दरवर्षी  भरणाऱ्या यात्रेमुळे ते सबंध अरबस्तानचे एक सांस्कृतिक केंद्रही बनले होते. कुरैश टोळीतील सहा प्रमुख कुटुंबांचे काबावर नियंत्रण होते आणि ही सुद्धा उत्पन्नाची एक मोठी बाब होती. व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून मक्केमध्ये संपन्नता नांदत होती आणि संपत्तीबरोबरच येणारे सामाजिक दुराचरण आणि अनैतिकता ह्यांचीही तेथे कमतरता नव्हती.

अशा धनसंपन्न, शिरजोर पण ह्याबरोबरच अनेक टोळ्या आणि धर्मपंथ ह्यांच्या सांस्कृतिक प्रभावाचे मिश्रण जेथे झाले होते, अशा शहरात इस्लामच्या प्रेषितांचा जन्म झाला. त्यांचे वडील अब्दुल्लाह ह्यांचे मुहंमदाच्या जन्माआधीच निधन झाले होते आणि मुहंमद सहा वर्षांचे असतांना त्यांची आईही त्यांना सोडून गेली. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब हे त्यांचे पालक झाले. पण तेही दोन वर्षांनी मृत्यु पावले आणि अबू तालिब ह्या त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या पालनपोषणासाठी त्यांना जवळ केले. अबू तालीब हे व्यापारी होते. मुहंमद त्यांच्या अपत्यांबरोबर वाढले. पण जरा मोठे झाल्यावर अबू तालीब ह्यांच्याबरोबर व्यापाराच्या निमित्ताने ते अनेकदा सिरिया येथे गेले. पौगंड वयातही त्यांची ऋजुता, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा ह्यासाठी ते प्रसिद्ध झाले. मक्केमध्ये ‘अमीन’-म्हणजे इमानी-ही पदवी त्यांनी प्राप्त करून घेतली होती. जेव्हा अबू तालिब ह्यांच्या व्यापाराला उतरती कळा लागली तेव्हा मक्केमधील खदीजा ह्या एका श्रीमंत विधवेने त्यांना आपले मुनीम ही जागा देऊ केली. ती त्यांनी स्वीकारली. त्यांची सचोटी, एकनिष्ठपणा आणि नेकी ह्यांची खदीजावर अतिशय छाप पडली. मुहंमदांनी आपल्या दक्ष आणि कुशल व्यवहाराने खदीजाला खूप फायदाही मिळवून दिला. आपण विवाह करावा अशी खदीजाने मुहंमदांना सूचना केली आणि ती त्यांनी मान्य केली. ह्यावेळी मुहंमदाचे वय पंचवीस होते, तर खदीजा चाळिशीच्या जवळ आली होती. ह्या लग्नामुळे मक्केच्या वरिष्ठ वर्गात मुहंमदांना प्रतिष्ठित स्थान प्राप्त झाले.

ह्या सुमाराला मुहंमदांची एकांतवासाविषयीची आवड वाढत चालली होती. ते अधिकाधिक अंतर्मुख बनून स्वतःच्या विचारात मग्न राहत. त्यांची धर्मपरायणता प्रसिद्ध होती. त्यांच्या सत्चशील मनोवृत्तीमुळे मक्केमध्ये प्रचलित असलेल्या सामाजिक दुराचरणाने ते अत्यंत व्यथित असत. संपत्तीच्या पाठोपाठ एका क्रूर प्रकारच्या गुलामगिरीच्या चालीने मक्केत प्रवेश केला. ख्यालीखुशाली फोफावली होती आणि नीतिमत्ता खालावली होती. प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण घेतला, की मद्यपान, जुगार आणि स्त्रैणपणा हे दुर्गुण त्याच्या ठिकाणी असणारच असा समज पसरला होता. ह्या वातावरणाचा उबग येऊन मुहंमद सांसारिक व्यवहारापासून अधिकाधिक निवृत्त होऊ लागले. आपला बराच काळ मक्केपासून तीन मैल दूर असलेल्या हिरा डोंगरावरील गुहेत एकांतवासात ते घालवू लागले. ह्या काळात सामाजिक संपर्क शक्य तितका टाळून ते उपवास आणि रात्रंदिवस ईश्वराची प्रार्थना करीत कालक्रमणा करीत. अशी एखाद्या यतीसारखी प्रखर साधना करीत त्यांनी बरीच वर्षे घालविल्यानंतर वयाचे चाळिसावे वर्षे गाठीत असताना रमजान महिन्यातील एका दिवशी हिराच्या गुहेत त्यांना उच्च आणि खणखणीत ध्वनी ऐकू आला. ‘‘विश्वाचा निर्माता असलेल्या ईश्वराच्या नावाचे पठण कर’’ अशी आज्ञा ह्या ध्वनीने त्यांना केली. त्यांना लाभलेला हा पहिला ईश्वरी संदेश, पहिली ‘श्रुती’ अथवा पहिले प्रकटीकरण (रेव्हेलेशन) होते. हा पवित्र कुराणाचा प्रारंभ होय. ह्या अनुभवाने मुहंमद भयचकित तर झालेच पण शिवाय अतीव आदरयुक्त भीतीने ते हादरल्यासारखे झाले. त्यांनी हा असाधारण स्वरूपाचा अनुभव आपली पत्नी खदीजा हिला कथन केला. ह्यानंतर लवकरच त्यांना आकाशात एक आकृती दिसली. ‘हे मुहंमद तू ईश्वराचा प्रेषित आहेस आणि मी गाब्रिएल आहे’ असे ती घोषित करीत होती. हे समजल्यावर खदीजाने आपले चुलते वरख बिन नव्‌फल ह्यांचा सल्ला घेतला. सेमिटिक धर्मपंथांविषयीच्या सखोल व्यासंगाबद्दल वरख हे प्रसिद्ध होते. मुहंमदांना येणारे अनुभव सत्य आहेत आणि ⇨ मोझेसप्रमाणे मुहंमदही आपल्या जमातीचे प्रेषित म्हणून ओळखले जातील असे त्यांनी खदीजाला आश्वासन दिले. ह्यामुळे मुहंमद आणि खदीजा ह्यांना धीर आला. मुहंमदांना लाभणारे प्रकटीकरण चालू राहिले पण पुढील काही वर्षे आपल्याला मिळालेला संदेश थोडे जवळचे नातेवाईक आणि मित्र ह्यांच्यापुरताच त्यांनी मर्यादित ठेवला. पण त्यानंतर हा संदेश त्यांनी सर्व लोकांत पसरवावा, असा त्यांना आदेश झाला.


कुराणाच्या प्रारंभीच्या प्रकटनात ज्या तत्त्वांवर भर होता ती म्हणजे, आत्यंतिक एकेश्वरवादाचा स्वीकार, सार्वत्रिक बंधुभाव, मूर्तिपूजेचा निषेध आणि श्रीमंतीत अंतर्भूत असलेल्या दुराचरणाचा त्याग करण्याचा उपदेश. मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे, मृत्यूनंतरही आत्म्याचे जीवन चालू असते, ईश्वरी न्यायाच्या दिवशी-कियामत-व्यक्तीचे प्रत्येक कृत्य आणि करणी तोलली जाईल आणि तिला योग्य ते पारितोषिक किंवा शासन देण्यात येईल अशी ती शिकवण होती. आपल्या जमातीत काही विशिष्ट सद्‌गुण दृढमूल करण्यावर मुहंमदांचे प्रयत्न मुख्यत्वे केंद्रित होते. जीवनातील शुचित, हेतूंची शुद्धता, जे दीन-दुःखी असतील त्यांच्याविषयीची करुणा आणि सहानुभूती, माता-पित्यांवरील निष्ठा, विधवा आणि अनाथ मुले यांचा सांभाळ करण्याची वृत्ती, इतरांशी होणाऱ्या सर्व व्यवहारांत प्रमाणिकपणा व नेकी यांचे पालन आणि भ्रूणहत्येसारख्या दृष्ट चालीरीतींपासूनची निवृत्ती ह्या नीतिमूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न हा मुहंमदांच्या प्रेषितकार्याचा महत्त्वाचा भाग होता. मक्केच्या श्रीमंत आणि उमराव वर्गाची सत्ता आणि संपत्ती ह्यांच्या मुळावरच केलेला हा आघात होता. काबाच्या मंदिराच्या रूपाने सर्व अरब टोळ्यांच्या धर्मपंथाचे केंद्रीकरण झाल्याने मक्केच्या प्रतिष्ठित वर्गाच्या हातात जी धार्मिक सत्ता आली होती, तिलाही एकेश्वरवादामुळे धोका निर्माण झाला होता. तेव्हा मुहंमदांच्या संदेशामुळे मक्केमध्ये कोलाहल निर्माण झाला आणि त्याला चहुकडून तीव्र विरोध झाला. परंतु कनिष्ठ वर्गातील एका लहान गटाने ह्या संदेशाचा स्वीकार केला. ⇨ अबू बकर यांसारख्या वरिष्ठ वर्गातील काही स्वतंत्रप्रज्ञ व्यक्तिंनीही त्याला मान्यता दिली. तथापि मक्केच्या बहुसंख्य रहिवाशांनी त्याचा अव्हेर केला आणि मुहंमद त्यांच्या उपहासाचे धनी झाले. त्यांचे चुलते अबू लहब तसेच काही दूरचे चुलत-बंधू हे त्यांचे सर्वात प्रखर टीकाकार आणि विरोधक होते. जेव्हा मुहंमदांच्या उपदेशाला काही यश मिळू लागले आणि अनेक गुलाम तसेच खालच्या थरातील माणसे त्यांच्या अनुयायांत दाखल झाली तेव्हा त्यांचा छळ होऊ लागला. एका बाजूने ह्या अनुयायांना निष्ठुरपणे त्रास देण्यात येऊ लागला आणि दुसऱ्या बाजूने मुहंमदांच्या चुलत्यांना त्यांनी आपल्या पुतण्याला आवरावे म्हणून गळ घालण्यात येऊ लागली. आपल्या संदेशाचा प्रसार करण्याचे कार्य मुहंमदांनी थांबवावे ह्यासाठी त्यांना मक्केचे नेतृत्व व संपत्ती देऊ करण्यात आली. पण ह्या प्रलोभनांना मुहंमदांचे उत्तर एवढेच होते, की ‘‘माझ्या उजव्या हातात कुणी सूर्य आणून ठेवला व डाव्या हातात चंद्र आणून ठेवला तरी मी माझे कार्य थांबविणार नाही’. त्यांना जर सत्ता आणि संपत्ती ह्यांची अभिलाषा असती. तर ह्या गोष्टी त्यांना सहज साध्य होत्या पण आपल्या प्रेषितकार्यावर त्यांची प्रामाणिक श्रद्धा होती आणि त्यासाठी त्यांनी वाढत्या छळाला आमंत्रण दिले. त्यांना ठार मारण्याचे कृत्य करायला त्यांचे विरोधक धजावले नाहीत कारण त्यामुळे अरब टोळ्यांच्या रूढ नीतीप्रमाणे मुहंमदांचे कुटुंब आणि त्यांचा घात करणाऱ्यांची कुटुंबे ह्यांच्यात कायमचे हाडवैर निर्माण झाले असते. मुहंमदांच्या चुलत्यांनी ते आपल्या पुतण्याला देत असलेले संरक्षण काढून घ्यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आणि ती त्यांनी नाकारल्यांनतर मक्केच्या प्रमुख कुटुंबांनी एकत्र येऊन त्यांचे चुलते अबू तालिम यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. ह्या सामाजिक बहिष्कारामुळे मुहंमदांना अनेक यातना सहन करायला लागल्या. मुहंमदांनी आपल्या बहुतेक सर्व अनुयायांना त्यांची छळापासून सुटका करण्यासाठी ॲबिसिनियाला पाठवून दिले. ह्याच सुमारास खदीजा आणि अबू तालिब ह्यांच्या मृत्यूचे दुःसह धक्केही मुहंमदांना सहन करावे लागले.

धार्मिक यात्रांच्या प्रसंगी अनेक टोळ्यांमध्ये प्रेषित आपल्या संदेशाचा प्रसार करीत. मक्केच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरावरील ताईफ ह्या रम्य स्थानीही ह्या उद्देशाने ते गेले होते पण लोकांनी त्यांच्यावर दगडांचा मारा केला आणि रक्तबंबाळ अवस्थेत ते परतले. अबू तालिब ह्यांच्या निधनानंतर आपला हात धरणारा कुणी नाही अशी कुरैश टोळीची भावना होऊन त्यांनी मुहंमदाचा अधिकच छळ सुरू केला होता. ह्याच वेळी मदीनेहून मक्केला यात्रेसाठी एक प्रतिनिधिमंडळ आले होते. अल्-अव्‌स (अल्-अन्सार) व खझ्रज ह्या मदीनेच्या दोन टोळ्यांमध्ये वितुष्ट होते व महंमदांच्या शिकवणीमुळे परस्परांत शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा त्यांच्यात निर्माण झाली होती. त्यांनी मुहंमदांना मदीनेला पाचारण केले. मदीनेच्या तीन टोळ्या अरब टोळ्यांच्या आश्रित म्हणून राहत होत्या. त्यांचा आपल्याला उत्साहपूर्वक पाठींबा मिळेल अशी मुहंमदांची कल्पना होती कारण मोझेस ह्या ज्यू प्रेषिताच्या संदेशाचाच आपण पुनरुद्धार करीत आहोत अशी मुहंमदांची धारणा होती. आपला संदेश म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेल्या धार्मिक श्रद्धेचा पुनरुच्चार आहे, असाच त्यांचा दावा होता.

मदीनेने दिलेल्या आमंत्रणामुळे मुहंमदाचा मक्केमध्ये होणारा छळ अधिकच वाढला. आपल्या सर्व अनुयायांनी मदीनेला स्थलांतर करावे असा प्रेषितांनी त्यांना सल्ला दिला. अबू बकर आणि अली ह्यांसारख्या थोड्याशा, अगदी निकटच्या अनुयायांसोबत मुहंमद मक्केत राहिले. मक्केतील प्रमुख कुटुंबांनी त्यांचा वध करण्याचा कट रचला. वधाच्या कृत्यात प्रत्येक कुटुंबातील एक एक व्यक्ती सहभागी होणार होती. मुहंमदांच्या एकट्या कुटुंबाला ह्या सर्व कुटुंबाशी मुकाबला करणे जड जाईल अशी ह्या योजनेमागची कल्पना होती. पण प्रेषितांना ह्या कटाचा सुगावा लागला आणि आपल्या हत्येसाठी मुक्रर केलेल्या दिवसाच्या आदल्या दिवशीच अबू बकर ह्यांच्या सोबत गुप्तपणे त्यांनी मदीनेला प्रस्थान केले. ही महत्त्वाची घटना ख्रिस्ताब्द ६२२ साली घडली. हिजरी ह्या इस्लामी कालगणनेचा प्रारंभ ह्या घटनेपासून होतो.

प्रेषितांचे मदीनेला आगमन झाल्यानंतर त्यांच्या जीवनाच्या तसेच इस्लामच्या विकासाच्या एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. मदीनेचे रहिवासी आणि मक्केहून आलेले स्थलांतरित यांच्यात प्रेषितांनी भ्रातृभाव निर्माण केला. मदीनेच्या टोळ्यांमध्येही शांतता प्रस्थापित केली. मदीना हे मक्का व बायझंटीन साम्राज्याचा भाग असलेला सिरिया यांच्यामधील व्यापाराच्या मार्गावर होते. प्रेषितांच्या मदीनेतील वास्तव्यामुळे आपल्या व्यापाराला सततचा धोका निर्माण झाला आहे अशी मक्केच्या लोकांना भिती वाटू लागली. मदीनेतील तसेच मदीनेच्या उत्तरेला असलेल्या खैबर येथील ज्यू टोळ्यांचे हितसंबंधही ह्या व्यापारात गुंतलेले होते. मक्केचा हल्ला ओढवून घेण्याची कोणतीही कारवाई करणे हे प्रेषितांना परवडण्यासारखे नव्हते. पण मक्केच्या रहिवाशांना प्रेषित आपल्या कारवानांवर हल्ला करतील अशी भीती होती. त्यामुळे ते सैन्य घेऊन मदीनेवर चालून आले. आपल्या सु. ३०० अनुयायांसह बद्र ह्या मक्का-मदीना मार्गातील एका तळावर मुहंमद त्यांना तोंड देण्यासाठी ठाण देऊन राहिले. त्यांच्या सैन्याशी तुलना करता मक्केचे सैन्य तिपटीहून जास्त होते. बद्र येथे झालेली लढाई निर्णायक नव्हती पण तीत मक्केच्या सैन्याचा पराभव झाला. मक्केच्या प्रमुख कुटुंबांतील काहीजण लढाईत कामी आल्यावर मक्केच्या सैन्याने रणांगण सोडले. तथापि आपण लवकरच परतू आणि झाल्या प्रकाराचा वचपा काढू अशी धमकी मक्केकर देत राहिले. एका वर्षानंतर उहुद येथे त्यांनी परत प्रेषितांबरोबर सामना दिला. ह्यावेळीही शत्रुसैन्य मुस्लिमांहून तिपटीहून अधिक होते. मुहंमद ह्या लढाईत जखमी झाले. लढाई निकाली झाली नाही पण एकंदरीत मक्केकरांची तीत सरशी होती. प्रेषित आणि मक्केकर ह्यांच्यात झालेला तिसरा सामना ‘खंदकाची लढाई’ म्हणून ओळखण्यात येतो. कारण मुस्लिम सैन्याने खंदक खणून आपला बचाव केला होता. हा सामना सुद्धा निकाली न ठरता रेंगाळत राहिला व अखेरीस मक्केकर घरी परतले. ह्या लढाईच्या वेळी मदीना आणि खैबर येथील ज्यू टोळ्यांनी मक्केकरांशी गुप्तपणे संगनमत केले होते, असे मुस्लिमांना आढळून आले. आपल्या आश्रितांनी अशी दगलबाजी करावी ह्याची मदीनेच्या लोकांना चीड आली. त्यातील दोन ज्यू टोळ्यांनी शरणागती स्वीकारली. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल पण त्यांना कोणतीही इजा करण्यात येणार नाही ह्या अटीवर त्यांना खैबर येथे जाऊ देण्यात आले पण बानू कुरैझ ह्या टोळीने प्रेषितांनी सुचविलेल्या अटींवर शरण येण्याचे नाकारले. त्याच्या आश्रयदात्या अरब टोळीचा एखादा प्रमुख सांगेल त्या अटी आपण स्विकारू अशी भूमिका त्यांनी स्विकारली. ह्याचा परिणाम म्हणून त्या टोळीतील सर्व पुरूषांची कत्तल करण्यात आली आणि स्त्रिया आणि मुले ह्यांना गुलाम म्हणून विकण्यात आले. नंतर खैबरचाही पाडाव करण्यात आला. ह्यानंतर मक्केकरांनी मदीनेवर हल्ले करण्याचे सोडून दिले. प्रेषितांचे मदीनेतील स्थान भक्कम आहे आणि मक्केहून मदीनेचे पारडे जड झाले आहे हे स्पष्ट झाले होते. मदीनेला आल्यावर मुसलमान जमातीची धार्मिक आणि सामाजिक घडी व्यवस्थितपणे बसविण्यात प्रेषित व्यग्र होते आणि ह्या प्रयत्नात त्यांना यशही आले होते.


खदीजाच्या मृत्युच्या वेळी प्रेषितांचे वय चोपन्न वर्षांचे झाले होते. ह्या विवाहापासून त्यांना झालेल्या अपत्यांतील तीन कन्या वाचल्या होत्या पण कुणी मुलगा वाचला नाही. खदीजा हयात असतांना त्यांनी दुसरा विवाह केला नाही पण मदीनेला आल्यावर राजकीय कारणांसाठी त्यांना विवाह करावे लागले. शिवाय ते मुस्लिमांचे प्रमुख होते आणि त्याकाळी अरब टोळ्यांच्या प्रमुखांनी अनेक बायका करण्याचा प्रघातही होता. प्रेषितांच्या प्रमुख अनुयायांना तसेच टोळ्यांच्या पुढाऱ्यांना प्रेषितांशी शरीरसंबंधातून जोडले गेलेले नाते जुळविण्याची तीव्र इच्छा असणे स्वाभाविक होते. कारण त्यायोगे त्यांची प्रतिष्ठा व सत्ता वाढणार होती. मदीनेच्या वास्तव्यात प्रेषितांनी नऊ विवाह केले. प्रेषितांनंतर इस्लामचे प्रमुख झालेले इस्लामचे पहिले खलिफा अबू बकर यांची कन्या आयेशा वगळली, तर त्यांनी हे सर्व विवाह विधवांशी लावले होते. त्या कोणत्यातरी वैवाहिक संबंधातून त्यांना पुत्रलाभ होईल आणि तो त्यांच्यानंतर इस्लामचा प्रमुख होईल अशी सुप्त आशाही ह्या विवाहांमागे असणे संभवनीय आहे.

हिजरी सनाच्या आठव्या वर्षी मक्का प्रेषितांच्या वाढत्या सामाजिक व राजकीय सामर्थ्याला शरण आली. त्यांचे जन्मग्राम असलेल्या ज्या नगराने पंधरा वर्षे त्यांचा निष्ठुरपणे छळ केला होता त्याने स्वीकारलेली शरणागती ही प्रेषितांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची घटना होती. मक्का शरण आल्यावर तेथील रहिवाशांवर रक्तरंजित सूड उगवावा अशी त्यांच्या अनेक अनुयायांनी उत्कट इच्छा होती पण प्रेषितांनी त्यांना मना केले आणि विजयाचा दिवस हा करूणेचा दिवस म्हणून जाहीर केला. पूर्वी आपला छळ केलेल्यांना त्यांनी क्षमा तर केलीच पण लढाईत जिंकलेल्या संपत्तींच्या वाटपात त्यांना खास हिस्साही बहाल केला. ह्यामुळे त्यांचे जुने अनुयायी नाराजही झाले. ह्या त्यांच्या वर्तनामुळे त्यांचे प्रमुख वैरी अबू सूफ्यान (अबू हंझल) ह्यांच्या तोंडून ‘तुमच्या मुक्ततेसाठी माझ्या आईवडिलांनाही खंडणी म्हणून देणे योग्य होईल. युद्ध आणि शांतता ह्या दोन काळी तुम्ही महान औदार्य दाखविले आहे,’ असे उद्‌गार निघाले.

मक्केला, काबामधून देवदेवतांच्या मूर्ती आणि इतर पवित्र मानण्यात आलेले शिलाखंड काढून टाकून प्रेषितांनी आपली अखेरची यात्रा पार पाडली. भिन्न अरब टोळ्या भिन्न मूर्तीची व शिलाखंडांची उपासना करीत. त्यांचे मंदिरातून झालेले उच्चाटन म्हणजे ह्या भिन्न टोळ्यांमधील भेदभावाचे निराकरण होते. एकमेव असलेल्या ईश्वराच्या कल्पनेद्वारा सर्व अरब एकत्र झाले होते. ह्या यात्रेच्या शेवटी प्रेषितांनी केलेल्या प्रवचनात माणसांमधील बंधुभाव आणि समता ह्या तत्त्वांवर त्यांनी भर दिला होता कोणत्याही जमातीचे किंवा वंशाचे इतराहून श्रेष्ठत्व त्यांनी नाकारले. उच्चतेचा एकच निकष आहे आणि तो म्हणजे सच्छील आणि सदाचरण असे त्यांनी प्रतिपादन केले.

मक्केमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर प्रेषितांनी बायझंटिनवर दोन स्वाऱ्या आयोजित केल्या. अरबांमधील अंतर्गत संघर्षाचा व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला होता. ह्याचा परिणाम म्हणून बायझंटिनकडून हल्ला होईल ह्या भीतीने प्रतिबंधक उपाय म्हणून ह्या मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. पुढे प्रषितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी ससानिद साम्राज्य व बायझंटिनचा मोठा भाग आपल्या अंमलाखाली आणला.

ह्यानंतर एका वर्गाने हिजरी सन ११ मध्ये थोड्या आजारानंतर मदीना येथे प्रेषित मृत्यू पावले (खिस्ताब्द ६३२). मरणाच्या आदल्या दिवशी आजारी असतानाही प्रार्थनेसाठी जमलेल्या समुदायात ते सामील झाले आणि त्यांनी प्रार्थनेचे नेतृत्व केले. नंतर केलेल्या प्रवचनात त्यांनी जमलेल्या लोकांना उद्देशून असे म्हटले, ‘तुम्हापैकी कुणालाही जर मी दुखविले असेल, तर हा पहा येथे एक चाबूक आहे आणि ही माझी पाठ आहे, तुम्ही पुढे या आणि आपला हिशोब चुकता करा’.

‘माझे दारिद्र्य हा माझा अभिमान आहे.’ असे त्यांनी एके प्रसंगी उद्‌गार काढले होते. सबंध अरबस्तानावर सत्ता प्रस्थापित केल्यावरही त्यांची राहणी नेहमी होती तशी साधीच राहिली. ईश्वर आणि त्याच्याकडून मिळणारे संदेश यांवर त्यांची अत्युत्कट श्रद्धा होती. आणि प्रेषित म्हणून जगलेल्या त्यांच्या २३ वर्षांच्या जीवनात त्यांना कुराण खंडशः प्रगट होत गेले. आपल्या धर्मसंहितेला त्यांनी ‘इस्लाम’ हे नाव दिले आणि इस्लामचा एकमेव अर्थ सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ ईश्वराला -अल्लाला-शरण जाणे असा आहे. पण ‘इस्लाम’ची ज्या धातूपासून व्युत्पत्ती साधण्यात येते त्याचा अर्थ ‘शांतता’ (पाळणे) असा आहे आणि इस्लामच्या ह्या अंगाचा पुढे ⇨ सूफी पंथीयांनी विकास केला. बहुदेवतावादी पंथांशी संबंधीत असलेल्या अनेक प्रथा प्रेषितांनी बाजूला सारल्या. जुगार किंवा मद्यपान ह्यांसारख्या हानिकारक कृत्यांवर त्यांनी बंदी घातली. अरब टोळ्यांमध्ये चालत आलेले पूर्वापार वितुष्ट, त्यातून उद्‌भवणारी सूडपरंपरा आणि युद्धे ह्यांचा, इस्लामच्या नवीन सर्वसमावेशक भ्रातृसंघात सर्वांना विलीन करून, त्यांनी अंत केला. स्त्रीधनाचा आणि वारशाचा हक्क स्त्रियांना देऊन त्यांनी त्यांची प्रतिष्ठा वाढविली. अरबांमध्ये पूर्वी प्रचलीत असलेल्या अनियंत्रीत बहुपत्नीकत्वाच्या चालीवर त्यांनी मर्यादा घातली. एक पती व एक पत्नी हा आदर्श वैवाहिक संबंध आहे, असाच कुराणाचा अभिप्राय असे एकंदरीत व्यंजित होते. गुलामगिरीच्या प्रथेला माणुसकीशी अधिक सुसंगत ठरेल असे स्वरूप देण्यात आले आणि गुलामांना मुक्त करण्याचे अनेक मार्ग सुचविण्यात आले. ‘गुलामांच्या मुक्तिहून अल्लाला अधिक प्रिय असे काही नाही आणि घटस्फोटाहून अधिक अप्रिय असे काही नाही, असे प्रेषितांचे एक वचन आहे. मालमत्ता आणि व्यापार ह्याविषयीच्या कायद्यात ऋजू आणि सचोटीच्या व्यवहारांवर भर देण्यात आला. गरिबांची पिळवणूक करणाऱ्या व्याजबट्ट्याच्या धंद्यावर बंदी घालण्यात आली.

इस्लामी श्रद्धेचा गाभा दोन वाक्यांत मांडता येईल : ‘अल्लाशिवाय अन्य ईश्वर नाही आणि मुहंमद अल्लाचा प्रेषित आहे.’ प्रत्येक मुसलमानाने पाळावीच अशी जी चार कर्तव्ये आहेत, ती म्हणजे प्रतिदिनी पाचदा प्रार्थना (नमाज) करणे रमजानच्या महिन्यात उपवास करणे गरिबांना मदत करणे (जकात) आणि मक्केची यात्रा करणे ही चारही कर्तव्ये कुराणात दिग्दर्शित करण्यात आली आहेत आणि प्रेषितांनी त्यांचे विवरण केले आहे.

  प्रेषितांच्या जीवनाचे समालोचन केले असता त्याची तीन वैशिष्ट्ये उठून दिसतात. एक, त्यांची ईश्वरावरील गाढ श्रद्धा. ते ईश्वराशी तन्मय झाले होते आणि ईश्वराने आदेश केलेल्या कार्याला त्यांनी इतर सर्व गोष्टींच्या तुलनेने प्राधान्य दिले. ह्या कार्यापुढे त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा लढाऊ बाणा. सत्याचे संरक्षण व प्रसार करण्यात आणि सत्याला किंवा सुसंवादाला विरोधी जे असेल त्याच्याशी झगडण्यात ते सदैव क्रियाशीलपणे गुंतलेले असत. ह्या लढाऊ कृतिशीलतेचा बाह्य अविष्कार म्हणजे प्रत्यक्ष युद्ध. प्रेषित ह्या युद्धांना ‘अल्प पवित्र युद्धे’ -अल् जिहाद-उल् अश्गर-असे संबोधीत आणि त्याचा आंतरिक आविष्कार म्हणजे ईश्वर आणि त्याची इच्छा यांच्या विरोधी जाणाऱ्या स्वतःच्या ज्या हीन, अमंगळ प्रवृत्ती असतील त्यांच्याशी झगडणे, ह्याला प्रेषित ‘महान पवित्र युद्ध’ -अल् जिहाद-उल् अकबर-असे म्हणतात. त्यांचे तिसरे महान वैशिष्ट्य म्हणजे त्यांची माहात्म्यता, महान औदार्य. त्यांच्या सबंध जीवनात त्यांच्याशी संबंध आलेल्या सर्व व्यक्तींना त्यांनी ज्या दयाळूपणे आणि क्षमाशीलतेने वागविले, त्यात हे वैशिष्ट्य प्रकट झाले आहे.

पहा : इस्लाम धर्म कुराण.

संदर्भ : 1. Glubb, J. B. The Life and Times of Mahammad, New York, 1970.

             2. Ibn-Ishaq Trans. Guilaume, Alfred. The Life of Mahammad, London, 1955.

             3. Margoliouth, D. S. Mohammad and The Rise of Islam, New York, 1906.

             4. Muir, Sir William, Life of Mahomet, 4. Vols., London, 1858.

             5. Watt, W. Montgomery, Muhammad : Prophet and Statesman, Oxford, 1961.              ६. प्रधान एम्‌. व्ही. मुहंमद पैगंबर, मुंबई, १९२९.

             ७. साने गुरूजी, इस्लामी संस्कृती, खंड पहिला : मुहंमद पैगंबर चरित्र, पुणे, १९६४.

लोखंडवाला, शमून(इं.) रेगे, मे. पुं. (म.)