मुलतानी बोली : मुलतानी ही लहंदा (लहंदी किंवा पश्चिम पंजाबी) भाषेची एक प्रमुख बोली. अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांच्या वायव्य समूहापैकी एक. यातच काश्मीरी व सिंधी यांचाही समावेश होतो आणि त्यांच्यात व लहंदात अनेक साम्यस्थळेही आहेत. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे पंजाबात लहंदा भाषकांची संख्या २०,००० होती पण हा समजुतीचा घोटाळा असावा. कारण अनेक लहंदा भाषकांनी पंजाबी किंवा हिंदी अशी आपली भाषा नोंदल्यामुळे ही संख्या इतकी कमी झाली. पाकिस्तानव्याप्त पंजाबात लहंदा भाषकांची संख्या मोठी असावी. १८९१ च्या जनगणनेप्रमाणे तेव्हाच्या अखंड भारतात लहंदा भाषकांची संख्या ७० लाख होती. त्यांपैकी २० लाख लोक मुलतानी बोली वापरीत. आज मुलतानी भाषकांची वस्ती पाकिस्तानात मुलतान शहर व आसपासचा भाग, सिंधु-चिनाब-सतलज दुआबाचा भाग एवढ्या प्रदेशात आहे. मुलतानी ही शहापूर दुआबात प्रचलित असणारी प्रमाण बोली किंवा थळी बोली यांच्या सारखीच लहंदाची एक बोली होय. दाक्षिणात्य बोली आणि उरलेल्या दोन उत्तरेकडच्या बोली यातील उल्लेखनीय फरक म्हणजे उत्तरेकडील बोलींत व्यंजनान्त नामाच्या सामान्य रूपाला एकवचनात-ए (पु) व-इ (स्त्री) हे विशेष प्रत्यय लागतात, तर दक्षिणेकडील बोलीत हे प्रत्यय लागत नाहीत. मुलतानी बोलीत तसेच लहंदाच्या इतर बोलींतही नमूद करण्यासाखे लिखित वाङ्‌मय निर्माण झालेले नाही.

मुलतानी तसेच लहंदाच्या इतर बोली आणि वायव्य समूहातील इतर इंडो-आर्यन भाषा यांच्यातील समान गोष्टी अशा : (१) प्रथम पुरुषी बहुवचनी (आम्ही) (मुलतानी ‘अस्सा’ काश्मीरी ‘असि’) आणि द्वितीय पुरुषी बहुवचनी (तुम्ही) (मुलतानी ‘तुस्सा’, काश्मीरी ‘त्वहि’,तोहि’) ही सर्वनामांची रूपे इतर इंडो-आर्यन भाषांत आढळणाऱ्या रूपांपेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. (उदा., मराठी ‘आम्ही-तुम्ही’, हिंदी ‘हम-तुम’).

(२) दोन स्वरातील व व्यंजन कायम राहते. उदा., मुलतानी ‘कीता’, पंजाबी ‘कीता’, काश्मीरी ‘कितु’ परंतु हिंदीत ‘किया’ (या सर्वांचा अर्थ ‘केला’ आणि मूळ रूप कृत-).

(३) क्रियापदांना सार्वनामिक प्रत्यय लागलेले आढळतात : उदा., -उम् (माझ्याकडून, म्या), मुलतानीत ‘मारे-उम्’, सिंधी ‘मार्यु-मे’, काश्मीरी ‘मोरू-म्’ (या सर्वांचा अर्थ ‘मी-ने तो मारला’).

(४) उत्तरकालीन मध्य इंडो-आर्यन भाषांत शब्दातील व्यंजनाचे द्वित्व जाऊन मागचा स्वर दीर्घ होतो वायव्य गटातील बोलींत मात्र द्वित्व आणि स्वराचे ऱ्हस्वत्व कायम राहते. उदा., ‘कन्नु’ पासून हिंदी ‘कान’ (कान) किंवा ‘हत्थु’ पासून हिंदी ‘हाथ’ (हात) उलटपक्षी लहंदा ‘कन्न’,‘हत्थ’ सिंधी ‘कनु’,‘हथु’ काश्मीरी ‘कन’,‘अथ’.

(५) वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक शब्दभांडार. उदा., इतर इंडो-आर्यन भाषांत ‘जाणे’ या अर्थी ‘जा’असा धातू वापरतात परंतु वायव्य भाषासमूहात काश्मीरी ‘गछुन’, उत्तर लहंदा ‘गछ्‌ना’, दक्षिण लहंदा ‘वञ्ज्‌णा’ किंवा ‘वञ्‌णा’ अशी रूपे येतात. हे शेवटचे रूप आजच्या काश्मीरीत प्रचलित नसले, तरी पूर्वी सबंध वायव्य प्रदेशात ते प्रचलित असावे. कारण काश्मीरमध्ये आजही हस्तिवञ्ज् ‘हत्ती जाण्याचा मार्ग’ असा शब्द आहे. त्यातील दुसऱ्या घटकाचा एरवी बोध होत नाही. ‘वञ्’ आणि ‘वञ्ज्’ यांमधील विकल्पावरून हे स्पष्ट होते, की वायव्य इंडो-आर्यन भाषांत तिसरे व्यंजन पाचव्या व्यंजनासारखे होऊ पाहते. तुलनेसाठी ‘दण्ड’पासून लहंदा ‘डन्न्’, ‘बळ, जोर’ हा शब्द पहावा.

सिंधीप्रमाणेच मुलतानीतही अंतःस्फुट अशी रोधक व्यंजने आहेत. उदा., बुआ (दार) आणि बाल (मूल) यांतील अंतःस्फुट ब आणि बुआ (आत्या) आणि बाल (चेंडू) यातील नेहमीचा बहिःस्फुट व यांची तुलना करावी.

मुलतानी भाषेतील भविष्यकालदर्शक ‘स्’ हा प्रत्यय लहंदा भाषिक प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेल्या पश्चिम राजस्थानी भाषेशी साम्य दर्शवतो.

पहा : इंडो-आर्यन भाषासमूह लहंदा भाषा.

संदर्भ : 1. Bahri, Hardev, Lahndi Phonology, Allahabad, 1962.

             2. Campbell, G. Specimens of the languages of India, including, those of the aboriginal tribes of Bengal, the Central Provinces, and the Eastern Frontier, Calcutta, 1874.

             3. Grierson, George A. Lingulstic Survey of India, Vol. VIII pt. I. Delhi, 1968.

             4. O’Brien, E. Glossary of the Multani Language or South-Western Panjabi (Revised by    J. Wilson and Hari Kishen Kaul), Lahore, 1917.

             5. Wilson, James, Grammar and Dictionary of Western Panjabi as Spoken in the Shahpur District with Proverbs, Sayings, and Verses, Lahore 1899.

दासगुप्त, प्रबाल (इं.) रानडे, उषा (म.)