सिनौसीबार, फ्रांस्वा : (३० जुलै १९४७ – ). मानवी वैद्यक विषयातील फ्रेंच महिला शास्त्रज्ञ. एड्स (उपार्जित रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य लक्षणसमूह) या रोगाला कारणीभूत होणाऱ्या व्हायरसाचा शोध लावल्याबद्दल सिनौसी-बार यांना ल्यूक माँताग्नेर व हॅराल्ड झुर हाउसेन यांच्या समवेत २००८ सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयांचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

सिनौसी-बार यांचा जन्म फ्रांन्समधील पॅरिस येथे झाला. १९६६ मध्ये पॅरिस विद्यापीठात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पाश्चर इन्स्टिट्यूट (मारले-ला-कोक्ता) येथे संशोधन कार्यास सुरुवात केली. त्यांनी पॅरिस विद्यापीठाची पीएच्.डी. (१९७४) आणि डॉक्टरेट नंतरची उच्च पदवी (१९८२) संपादन केली. सुरुवातीपासूनच त्यांचे संशोधन कार्य विशिष्ट गटाच्या व्हायरसांवर म्हणजे रिट्रोव्हायरसांवर केंद्रित झाले होते. त्यांनी १९८३ मध्ये एड्स या रोगाला कारणीभूत होणाऱ्या एचआयव्ही-१ या व्हायरसाचा (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) शोध माँताग्नेर यांच्या समवेत लावला. या शोधामुळे एड्स रोगाला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या निदान चाचण्या शोधण्याची शक्यता निर्माण झाली. जगातील एकूण लोकसंख्येच्या सु. एक टक्का एवढी लोकसंख्या या व्हायरसामुळे होणाऱ्या विकाराने ग्रस्त आहे.

सिनौसी-बार व माँताग्नेर यांनी प्राथमिक अवस्थेतील एड्स रुग्णाच्या सुजलेल्या लसीका ग्रंथीमधून लसीका कोशिका वेगळ्या करुन त्यांचे संवर्धन केले. या प्रयोगात त्यांना रिव्हर्स ट्रान्सकिप्टेज या एंझाइमाची कृती माहीत झाली. हे एंझाइम (जैव रासायनिक विक्रियेत भाग न घेता ती जलद घडविणारा प्रथिनयुक्त पदार्थ) व्हायरसाच्या गाभ्यात आरएनएच्या दोन रेणूंबरोबर असल्यामुळे ही रिट्रोव्हायरस निर्मितीची थेट ओळख खूण ठरली. सिनौसी-बार व माँताग्नेर यांनी संसर्गित लसीका कोशिकांमध्ये रिट्रोव्हायरल कणांचे मुकुलन (कलिकेसारख्या निर्माण झालेल्या वाढी) होऊन बाहेर पडलेले व्हायरस निरोगी लसीका कोशिकांना संसर्ग करुन नष्ट करतात, हे शोधून काढले. संक्रमणानंतर एचआयव्ही प्रतिपिंड आढळू लागतात. लसीका टी-कोशिका रोगप्रतिकारक्षमता प्रणालीसाठी आवश्यक असतात. प्रचंड प्रमाणात रिट्रोव्हायरसांची होणारी निर्मिती आणि लसीका कोशिकांचा होणारा ऱ्हास यांवरुन एचआयव्ही कशा प्रकारे रोगप्रतिकारक्षमता प्रणालीचा ऱ्हास करतो हे समजू शकले.

यापूर्वी ज्ञात असलेल्या मानवी अर्बुदी रिट्रोव्हायरसांपेक्षा हा वेगळा व नवीन (एचआयव्ही) असल्याचे आढळून आले. हा व्हायरस अनियंत्रित कोशिका वाढीला प्रेरित करीत नाही.

एड्सचे व्हायरस हे रिट्रोव्हायरस वर्गातील आरएनएयुक्त व्हायरस असून या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाभ्यामध्ये आरएनएच्या दोन रेणूंबरोबरच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एंझाइम असते. आरएनएमध्ये आतापर्यंत नऊ जीन ओळखता आले आहेत व त्यांपैकी तीन व्हायरसाच्या वाढीचे नियंत्रण करतात असे आढळून आले आहे. संक्रमणक्रियेच्या वेळी रक्तात प्रवेश केलेले व्हायरस आपल्या सक्रिय रुपात (व्हायरिऑन) महाभक्षिकोशिका व लसीका कोशिका यांवर आक्रमण करुन प्रथम त्यांमध्ये आपल्या गाभ्यातील प्रथिने, एंझाइमे आणि आरएनए रेणूचे दोन पेड सोडतात. या आरएनएपासून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजाच्या मदतीने दुपेडी डीएनए तयार होतो, यालाच प्रोव्हायरस म्हणतात. हा डीएनए कोशिकेच्या केंद्रकाकडे जाऊन आत प्रवेश करताच कोशिकेचा डीएनए यात आपला अंतर्भाव करुन घेतो. यामुळे एकात्म झालेला व्हायरस काही काळ सुप्तावस्थेत राहतो. त्यानंतर मात्र कोशिकेच्या केंद्रकातील आरएनएमध्ये व्हायरसाच्या जीनाचे प्रतिलेखन (जननिक माहितीचे स्थानांतर) होऊ लागते. या बदललेल्या प्रतिलेखित आरएनएपासून संदेशवाहक आरएनए केंद्रकाबाहेर पडतात व रिबोसोम या कोशिकांकडे तेथे स्थानांतरणाने जी नवीन प्रथिने निर्माण होतात ती व्हायरस प्रथिनांसाठी असतात. आरएनएच्या आणखी काही रेणूंच्या साहाय्याने या प्रथिनांपासून व्हायरिऑन तयार होऊन ते कोशिकेच्या पटलाशी पोहोचतात. पटलाचे व्हायरिऑनासह मुकुलन होऊन व्हायरस कोशिकेबाहेर पडतात व दुसऱ्या कोशिकांत शिरतात. या सर्व प्रकियेमुळे अनेक लसीका कोशिका, महाभक्षिकोशिका व एककेंद्रकी कोशिका यांची यंत्रणा व्हायरसाच्या गुणनासाठीच राबविली जाते. प्रतिरक्षात्मक कार्य करणाऱ्या कोशिकांची विशेषतः टी-कोशिकांची संख्या हळूहळू कमी होऊ लागते. संक्रामणानंतर रक्तरसात एचआयव्ही प्रतिपिंड आढळू लागतात व ते मुख्यतः एलायसा नावाच्या परीक्षेने ओळखता येतात, हे सिनौसी-बार यांनी शोधून काढले.

सिनौसी-बार आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रसंघटनेची एड्स-एचआयव्ही संघटना यांसारख्या संस्थांच्या सल्लागार सदस्या आहेत. आफ्रिका व आशिया खंडांमधील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. त्यांनी २५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग घेऊन अनेक तरुण संशोधकांना मार्गदर्शन केले. सुमारे २०० शोध प्रबंधांच्या त्या सहलेखिका आहेत. त्यांनी पाश्चर इन्स्टिट्यूट, नॅशनल एजन्सी फॉर एड्स रिसर्च इ. वैज्ञानिक संस्थांना मदत केली आहे. सध्या त्या पाश्चर इन्स्टिट्यूटमधील रेग्युलेशन ऑफ रिट्रोव्हायरल इन्फेक्शन युनिटच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

पहा : रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य विकार लसीका ग्रंथि.

वाघ, नितिन भ.