मुफ्ती : मुफ्ती म्हणजे इस्लामच्या धार्मिक कायद्यातील तज्ञ. विवादाच्या बाबतीत न्यायाधीश अथवा खाजगी व्यक्तीही त्याचे मार्गदर्शन स्वीकारतात. त्याने प्रकट केलेल्या धर्मविषयक कायदेशीर मताला ‘फतवा’ म्हणतात. विवाह, वारसा हक्क आणि घटस्फोट यांसारख्या गोष्टीतच हे फतवे प्रमाणभूत मानले जातात. असे अनेक फतवे संगृहीत करून ठेवण्यात आलेले असून त्यांचे हनफी इ चार इस्लामी संप्रदायांनुसार विभिन्न गट पडलेले दिसतात. अर्थातच हे फतवे ⇨ हदीसांइतके प्रमाणभूत कधीच मानले जात नाहीत आणि त्यांचे क्षेत्रही अधिकाऱ्याच्या बाबतीत वैयक्तिक जीवनापुरतेच मर्यादित असलेले दिसते. आजही विभन्न धर्मकेंद्रातून असे फतवे जारी केले जातात. 

करंदीकर, म. अ.