मुझफरगढ : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५३.००० (१९८१). हे मुलतानच्या नैर्ऋत्येस २५ किमी. वर असून मुलतानडेरा गाझीखान रस्त्यावर आहे. मुलतानचा गव्हर्नर नवाब मुझफरखान याने १७९४ मध्ये येथे एक किल्ला व मशीद बांधून या ठिकाणाची स्थापना केली. व १८५९ मध्ये हे जिल्हाचे मुख्य ठिकाण बनले. १८७३ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. नगरात विविध धान्ये, आंबे, खजूर, इमारती लाकूड, तूप आदींची मोठी बाजरपेठ आहे. कापूस वटणी व दाबणी, सुती वस्त्रोद्योग, लाकूडकटाई कारखाने, ताग व भातसडीच्या गिरण्या, हातमाग कापड, चटया, टोपल्या तयार करणे हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. नगरात एक रुग्णालय व पंजाब विद्यापीठाशी संलग्न असलेली शासकीय महाविद्यालये आहेत.

ओक, द. ह.