प्रभातकुमार मुखोपाध्यायमुखोपाध्याय, प्रभातकुमार : (३ फेब्रुवारी १८७३–५ एप्रिल १९३२). प्रख्यात बंगाली लघुकथाकार व कादंबरीकार. वर्धमान जिल्ह्यातील धात्रीग्राम या गावी जन्म. पिता जयगोपाल मुखोपाघ्याय. मावसभाऊ राजेंद्रचंद्र बंदोपाध्याय यांच्याकडे जमालपूर या गावी आरंभीचे शिक्षण. १८८८ साली जमालपूर हायस्कूलमधून प्रवेश (एन्ट्रन्स) परीक्षा उत्तीर्ण व १८९५ साली पाटणा महाविद्यालयातून बी. ए. त्यानंतर काही दिवस सिमल येथे कारकुनी आणि १९०१ साली इंग्लंडला प्रयाण. १९०३ साली बॅरिस्टर होऊन स्वदेशी आगमन. आठ वर्षे गया येथे वकिली केल्यानंतर १९१६ साली कलकत्ता विद्यापीठात लॉ कॉलेजचे अध्यापक म्हणून नियुक्ती. अखेरपर्यंत ते ह्याच पदावर होते. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

शिक्षण सुरू असतानाच भारती पत्रकातून त्यांनी लेखनास सुरुवात केली. त्यावेळी सरलादेवी ह्या भारतीच्या संपादिक होत्या. त्यांनी प्रथम कवितालेखन केले पण पुढे रवींद्रनाथांच्या सांगण्यानुसार त्यांनी गद्यलेखन केले. त्यांनी सुरुवातीचे लेखन ‘श्रीराधामणि देवी’ या टोपणनावाने केले.

मानसी ओ मर्मवाणी या मासिकाचे प्रभातकुमारांनी १४ वर्षे संपादन केले. त्यांच्या नावावर एकूण १४ कादंबऱ्या व तितकेच कथासंग्रह आहेत यांपैकी रत्नदीप (१९१५) ही कादंबरी विशेष उल्लेखनीय होय. पहिली संपूर्ण सामाजीक कादंबरी रमासुंदरी (१९०७). बाकीच्या उल्लेखनीय कादंबऱ्या नवीन संन्यासी (१९१२), जीवनेर मूल्य (१९१७), सिंदूर कौटा (१९१९), आरति (१९२४), सत्यबाला (१९२५), सुखेर मीलन (१९२७) इ. होत.

प्रभातकुमार हे रवींद्रांनंतरचे श्रेष्ठ लघुकथाकार म्हणून विशेष लोकप्रिय होते. सरलता व सूक्ष्म विनोदबुद्धी हे त्यांचे साहित्यविशेष होत. नवकथा हा त्यांचा पहिला कथासंग्रह १८९९ साली प्रकाशित झाला. त्यानंतरचे विशेष उल्लेखनीय कथासंग्रह देशी ओ विलाती (१९०९), गल्पांजलि (१९१३), गहनार बाक्स (१९२१), हताश प्रेमिक (१९२४), जामाता बाबाजी (१९३१) इ. होत.

प्रभातकुमारांचे पुढील साहित्य मराठीत अनुवादित-रूपांतरीत झाले आहेः असार संसार-(नवीन संन्यासीचा अनु. वि. सी. गुर्जर, १९१४), दुर्दैवी इंदिरा अथवा आयुष्याचे मोल-(जीवनेर मूल्यचा अनु. -गजरा (राजे) भोसले, १९१९), पौर्णिमेचा चंद्र– (रत्नदीपचे रूपांतर-वि. सी. गुर्जर, १९२०) सुशीला की विमला आणि इतर गोष्टी– (रूपांतर-वामन जनार्दन कुंटे, १९३१), स्वप्नभंग-(अनु. वि. सी. गुर्जर, १९३७), नागमोड– (रूपांतर-वि. सी. गुर्जर, १९४९).

आलासे, वीणा