बंगाली भाषा : पश्चिम बंगाल, बांगला देश आणि त्यांना लागून असणाऱ्या बिहार, आसाम इत्यादींच्या काही सीमाभागांची बंगाली ही भाषा आहे. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे बंगाली भाषिकांची संख्या ३,३८,८८,९३९ होती. त्यापैकी २,९४,३५,९२८ खुद्द पश्चिम बंगालमध्ये होते. उरलेल्यांपैकी आसाम २०,८९,२५१ बिहार १२,२०,८०० आणि उत्तर प्रदेश १,०४,५२८ हे महत्त्वाचे आकडे आहेत. महाराष्ट्रात बंगाली भाषिक २९,११४ होते. बांगला देश व भारतातील एकूण बंगाली भाषिकांची संख्या अंदाजे बारा कोटी असावी (१९७७). भाषिकांच्या संख्येच्या प्रमाणात बंगाली ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. हिन्दी व तेलुगू यांच्यानंतर तिचा क्रमांक येतो.

बंगाली ही इंडो-आर्यनच्या पूर्वेकडील शाखेची भाषा असून ही शाखा बंगालीव्यतिरिक्त असमिया, मैथिली व ओडिया (उडिया) यांनी बनलेली आहे. या चारही भाषांची मूळ एकच संयुक्त भाषा असून तिचे पुढे विभाजन झाले. सर्वात आधी मैथिली (८ वे शतक), नंतर ओडिया (नववे-दहावे शतक) आणि सर्वात शेवटी असमिया असे हे विभाजन होत गेले.

बंगालीचे स्वतंत्र अस्तित्व पहिल्या सहस्त्रकाच्या शेवटापासूनचे आहे. तिचा इतिहास तीन महत्त्वाच्या टप्प्यात विभागता येतो : (१) प्राचीन बंगाली, इ. स. १००० ते १३००. यांत नेपाळमध्ये मिळालेल्या ‘चर्यापद’ नामक गीतांचा समावेश असलेल्या हस्तलिखितांचा अंतर्भाव होतो. (२) मध्यकालीन बंगाली, इ. स. १३०० ते १७५०. पंधराव्या शतकापासून लिहिले गेलेले साहित्य यात असून याच काळात फार्सी, अरबी, तुर्की व पोर्तुगीज शब्दांचा बंगालीत शिरकाव झाला. (४) अठराव्या शतकाच्या मध्यापासून चालू असलेली अर्वाचीन बंगाली ही गद्य व काव्य या दृष्टीने अत्यंत वैभवसंपन्न असून या काळातच तिच्यावर पाश्चात्त्य साहित्याचा, विशेषतः इंग्रजीचा, प्रभाव पडला.

बंगालीचे पाच भाषिक पोटभाग आहेत. त्यांपैकी उत्तर बंगाली, ईशान्य बंगाली व पूर्व बंगाली हे तीन बांगला देशात असून, पश्चिम व नैर्ॠत्य बंगाली हे दोन भारतात आहेत. या सर्व पोटभागांत अनेक स्थानिक भेद आहेत.

पश्चिम बंगालीचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरचा आहे. प्रमाण बंगाली बोली पश्चिम बंगालीच्या एका मध्य स्थानिक भेदावर आधारलेली असून या क्षेत्रात कलकत्त्याचाही समावेश होतो. मात्र ही प्रमाण बोली पहिल्या महायुद्धापासून साहित्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली. या बोलीला ‘चलितभाषा’ हे नाव असून पूर्वीच्या ग्रांथिक बोलीचे ‘साधुभाषा’ हे आहे.

व्याकरण – ध्वनीविचार : बंगालीची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : आ इ ए ॲ उ ओ ऑ

व्यंजने : (स्फोटक) क ख ग घ ट ठ ड ढ त थ द ध प फ ब भ (अर्धस्फोटक तालव्य) च छ ज झ 

(अनुनासिक) ङ न म (अर्ध स्वर) य (कंपक) र (पार्श्विक) ल (घर्षक) श (महाप्राण) ह

लेखन व उच्चार : इतर भाषांप्रमाणे बंगालीतही लेखन व उच्चार यांच्यातील अंतर वाढलेले आहे, एवढेच नव्हे, तर देवनागरीशी फक्त बाह्य वळणाच्या दृष्टीने विरोध असलेली ही लिपी कशी वाचावी याचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. यां ठिकाणी फक्त महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा ओझरता उल्लेख केलेला आहे.

बंगालीतील अ हे लेखन ऑ हा उच्चार दाखवते. पण अशा अ चा मराठीत ज्या ठिकाणी लोप होतो त्या ठिकाणी बंगालीतही होतो : लेखन कमल, म. कमल्, बं. कॉमॉल – कोमल, कोमल्, कोमॉल्. साहजिकच ऐ व औ यांचे उच्चार ऑइ व ऑउ आहेत. ॲ साठी स्वतंत्र चिन्ह नाही. संदर्भानुसार ए या लेखनाचाच उच्चार ए किंवा ॲ होतो.

व्यंजनांपैकी अर्धस्फोटकापूर्वी येणाऱ्या ञ चा उच्चार फक्त न होतो. ण हा उच्चार फक्त ट वर्ग स्फोटकापूर्वी होतो. इतरत्र न च आहे. य चा उच्चार ज होतो (फक्त विशिष्ट संदर्भात अर्धस्वर य टिकून आहे, तर काही ठिकाणी त्याचा लोप होतो). व ची जागा ब ने घेतलेली आहे. पण संयुक्त व्यंजनात व हा ज्या वर्णानंतर येतो त्या वर्णाचे द्वित्व होते. व चा उच्चार होत नाही : सत्व, बं. शॉत्तो.

बंगालीत फक्त श हाच घर्षक आहे. मात्र संयुक्त व्यंजनात त, थ, न, र, ल यांच्यापूर्वी त्याचा स होतो. श्री, बं. स्त्री, श्लोक, बं. स्लोक, स्नान, बं. स्नान.

काही संयुक्त व्यंजनांचे उच्चार वैशिष्ट्यपूर्ण आहेत : क्ष = ख्य, ज्ञ = ग्य, व्यंजन + व = व्यंजनयुग्म, ष्ण = ष्ट इत्यादी.

रूपविचार : नाम : बंगालीत व्याकरणदृष्ट्या नामांना लिंग नाही. अर्थावरून कित्येकदा नामाचे लिंग ठरवले जाते. पण सर्व नामांना होणारे विभक्तिविकार सारखेच आहेत. मात्र काही नामांची रूपे लिंगानुसार बदलतात : पांठा ‘बकरा’-पांठी ‘बकरी’, हांशा ‘हंस’- हांशी ‘हंसी’, भॅडा ‘मेंढा’-भेडी ‘मेंढी’.

एकंदर सात विभक्ती मानल्या आहेत. नामाचे मूळ रूप हीच प्रथमा. या रूपाला रा-एरा, गुला-गुलो-गुली हे प्रत्यय लागून अनेकवचन बनते. रा किंवा एरा हा प्रत्यय मानववाचक किंवा श्रेष्ठ वर्गदर्शक नामांना लागतो. गुला सर्वसामान्य नामांना लागणारा, गुलो तुच्छता दर्शविणारा आणि गुली लाडिकपणाचा प्रत्यय आहे : देवता ‘देव’-देबतारा, मानुष ‘माणूस’-मानुषेरा, लोक ‘व्यक्ती’- लोकगुलो, छेले ‘मूल, मुलगा’-छेलेगुली, गोरू ‘गाय’-गोरूगुलो.

प्रथमेशिवाय इतर विभक्तीत प्रत्ययापूर्वी दिग, दिगेर, देर नामानंतर येऊन अनेकवचन सिद्ध होते. विभक्तिप्रत्यय पुढीलप्रमाणे आहेत : एकवचन : (प्रथमा) ए, एते शून्य (द्वितीया) के, एरे, ए (तृतीया) ए, ते, एते, दिया, के दिया, द्वारा, एरद्वारा, कतृक (चतुर्थी) द्वितीयेप्रमाणे आणि एरतारे, एरजन्य, एरजन्ये(पंचमी) एरथाकिया, एरथेके, एरहइते, एरहाते, एरचेये, एरकाछथेके (षष्ठी) एर (सप्तमी) ए, एते-अनेकवचन: एकवचनाच्या रूपाला दिग, दिगेर, देर हे अनेकवचन दाखविणारे चिन्ह लावून नंतर एकवचनाचेच प्रत्यय लावणे. अनेकवचनात कित्येकदा या चिन्हांऐवजी सकल किंवा गुला ही चिन्हेही लागतात. मानुष या नामाची रूपे पुढे दिल्याप्रमाणे :

विभक्ती 

एकवचन 

अनेकवचन 

प्रथमा

मानुष, मानुषे, मानुषेते

मानुषेरा, मानुषगुलो, मानुषगुली, मानुषसकल.

द्वितीया

मानुषके, मानुषेरे, मानुषे

मानुषदिगके, मानुषदिगेरे, मानुषदेर, मानुषदिगे, मानुषदिगक, मानुषगुलाके इत्यादी

तृतीया

मानुषे, मानुषेत, मानुषदिया, मानुषकेदिया, मानुषद्वारा, मानुपेरद्वारा, मानुषकर्तृक

मानुषदिगद्वारा, मानुषदिगेरद्वारा, मानुषदिगकर्तृक, मानुषदेरदिया, मानुषदेरद्वारा, मानुषगुलारद्वारा, मानुषसकलेरद्वारा, मानुषगुलाद्वारा, मानुषसकलद्वारा, मानुषगुलाकेदिया, मानुषसकलकेदिया.

चतुर्थी

(द्वितीयेप्रमाणे आणि) 

मानुषेरतारे, मानुषेरजन्य, मानुषेरजन्ये

(द्वितीयेप्रमाणे आणि)  

मानुषदिगेरजन्य, मानुषदेरतारे.

पंचमी

मानुषेरथेके, मानुषेरहइते, मानुषेरहाते, मानुषेरचेये, मानुषेरकाछथेके

मानुषदेरथेके, मानुषदिगहइते, मानुषदेरचेये, मानुषदेरनिकटहइते, मानुषदेरकाछथेके.

षष्ठी

मानुषेर

मानुषदिगेर, मानुषदेर.

सप्तमी

मानुषे, मानुषेते

मानुषदिगते, मानुषदिगेते,मानुषसकलते, मानुषगुलाते.


संबोधन म्हणून प्रथमेचीच रूपे संबोधनदर्शक अव्ययांबरोबर वापरली जातात.

नामाला टा, टी, खान, खानी, खानी, गाछ, गाछी, हे प्रत्यय लावून नामाचे निश्चित रूप तयार होते. आकारान्त रूप मोठेपणा, ओबडधोबडपणा दाखवतात, तर इकरान्त रूपे लहानपणा, नाजूकपणा, सौंदर्य इ. दाखवतात. यातील टा, टी, हे प्रत्यय विशेष वापरले जातात : मानुष ‘माणूस’-मानुषटा ‘(तो विशिष्ट) माणूस’, मानुषटी’ (तो भला) माणूस’, छेलेटी बड भाल’ (तो) मुलगा फार चांगला (आहे).’ पण छेलेटा बड मंद ‘(तो) मुलगा फार वाईट (आहे).’ खान, खाना हे प्रत्यय लांबट चपट्या वस्तूसाठी, तर गाछ, गाछा हे लांब सडसडीत वस्तूसाठी वापरले जातात : बइखाना ‘(ते) पुस्तक’, छडीगाछी ‘(ती) काठी.’

विशेषण : नामाचे वचन किंवा विभक्ती यांचा विशेषणाच्या रूपावर परिणाम होत नाही. म्हणजेच सर्व संदर्भात बंगालीतील विशेषण विकाररहित असते.

सर्वनाम : सर्वनामांची रूप पुढीलप्रमाणे आहेत :

प्रथमपुरुष

विभक्ती 

एकवचन 

अनेकवचन 

प्रथमा

आमि

आमरा, आमरासन, आमरासकले

द्वितीया

आमाके, आमारे, आमाय

आमादिगके, आमादिके, आमादेर, आमादेरके.

तृतीया 

आमाद्वारा, आमारद्वारा, आमादिया, आमादिये, आमाकेदिया, आमाकेदिये, आमाकर्तृक

आमादिगद्वारा, आमादिगकर्तृक, आमादिगेरद्वारा, आमादिगेरदिया, आमादेरद्वारा, आमादेरदिया.

चतुर्थी

(द्वितीयेप्रमाणे)

(द्वितीयेप्रमाणे)

पंचमी 

आमाहइते, आमाहते, आमाथेके, आमारकाछथेके, आमारनिकटहइते

आमादिगहइते, आमादिगेरनिकटहइते, आमादेरथेके, आमादेरहते, आमादेरकाछथेके.

षष्ठी

आमार

आमादिगेर, आमादेर.

सप्तमी

आमाय, आमाते

आमादिगेते, आमादिकते.

द्वितीयपुरुष (सामान्य)

विभक्ती 

ए. व. 

अ. व. 

प्रथमा 

षष्ठी

तुमि 

तोमार

तोमरासब, तोमरासकल. 

तोमादिगेर, तोमादेर.

(इतर विभक्तीरूपे प्रथमपुरुषाप्रमाणे. फक्त आमा – ऐवजी तोमा -)

द्वितीयपुरुष (कनिष्ठ)

विभक्ती 

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी

तुह 

तोर

तोरा, तोरासब, तोरासकल. 

तो दिगेर, तोदेर.

(इतर विभक्तिरूपे प्रथमपुरुषाप्रमाणे. फक्त आमा – ऐवजी एकवचनी तो -, अनेकवचनी तो दिग-, तोदेर -)

द्वितीयपुरुष (आदरवाचक)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

आपनि 

आपनार 

आपनारा. 

आपनादिगेर, आपनादेर.  

(इतर विभक्तीरूपे प्रथमपुरुषाप्रमाणे. फक्त आमा – ऐवजी एकवचनी आपना – आणि अनेकवचनी आपनादिग -, आपनादेर -)

तृतीयपुरुष (सामान्य)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

ते 

ताहार, तार 

ताहारा, तारा. 

ताहादिगेर, तादेर.  

(इतर विभक्तीरूपे प्रथमपुरुषाप्रमाणे. फक्त आमा – ऐवजी एकवचनी ताहा -, ता – आणि अनेकवचनी ताहादिग – , तादेर – )

तृतीयपुरुष (आदरवाचक)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

तिनि 

ताहार, तार  

ताहारा, तारा. 

ताहादिगेर, तादेर.  

(इतर विभक्तीरूपे प्रथमपुरुषाप्रमाणे. फक्त आमा – ऐवजी ताहा -, ता – आणि अनेकवचनी ताहादिग – , तादेर – )

दर्शक सर्वनाम (जवळचे – सामान्य)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

ए, एइ 

इहार, एर  

इहारा, एरा. 

इहादिगेर, एदेर.  

(इतर विभक्तींसाठी प्रत्ययपूर्वरूपे एकवचनी इहा -, ए – आणि अनेकवचनी इहादिग – , एदेर – )

दर्शक सर्वनाम (जवळचे – आदरवाचक)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

इनि 

ईहार, एंर  

ईहारा, एंरा, एनारा. 

इहादिगेर, एंदेर, एनादेर.  

(इतर विभक्तींसाठी प्रत्ययपूर्वरूपे एकवचनी ईहा -, एं – आणि अनेकवचनी ईहादिग – , एंदेर -, एनादेर – )

दर्शक सर्वनाम (दूरचे – सामान्य)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

ओ, ओई, ऐ 

उहार, ओर  

उहारा, ओरा. 

उहादिगेर, ओदेर.  

(इतर विभक्तींसाठी प्रत्ययपूर्वरूपे एकवचनी उहा -, ओ – आणि अनेकवचनी उहादिग – , ओदेर – )

दर्शक सर्वनाम (दूरचे – आदरवाचक)

वि.

ए. व.  

अ. व.  

प्रथमा 

षष्ठी 

उनि 

उहार, ओर  

ऊहारा, ओरा, ओनारा. 

ऊहादिगेर, ओदेर, ओनादेर.  

(इतर विभक्तींसाठी प्रत्ययपूर्वरूपे एकवचनी ऊहा -, ओ – आणि अनेकवचनी ऊहादिग – , ओदेर -, ओनादेर – )


संबंधदर्शक सर्वनाम : जे ‘जो, जी, जे’ हे आहे. ते से या सर्वनामाप्रमाणे चालते. फक्त स किंवा त च्या जागी सर्वत्र ज येतो.

प्रश्नवाचक सर्वनाम : के हे असून तेही से प्रमाणे चालते. याचे आदरवाचक रूप किनि हे असून ते क्वचितच वापरले जाते. प्रश्‍नवाचक विशेषण कोन हे आहे.

अनिश्चित सर्वनाम : केह, केउ, ‘कोणी, कोणीतरी’ हे आहे. त्याची रूपे एकवचनी प्र. केह, केउ, ष. काहारो, कारो, कारू, कारूर आणि अनेकवचनी प्र. काहाराओ, काराओ, ष. काहादिगेरो, कादेरो ही आहेत. इतर विभक्तींसाठी प्रत्ययपूर्वरूपे काहा -, का-असून ती ओकारान्त आहेत.

स्ववाचक सर्वनाम : अपनि हे असून ते द्वितीयपुरुषाच्या आदरवाचक रूपासारखे चालते. मात्र एकवचनी षष्ठीची आपन, आपनआपन ‘आपापला’, आपनकार ही रूपेही आहेत. ‘एकमेक’ या अर्थी प्र. आपसे, ष. आपसेर ही रूपे आहेत.

सर्वनामापासून विशिष्ट प्रत्यय लावून स्थलकालवाचक अव्यये, परिमाणवाचक व सादृशवाचक विशेषणे मिळतात. उदा., से किंवा ता पासून तखन, सेइक्षण, तबे ‘त्याक्षणी, त्यावेळी, तेव्हा’, सेथा, तथा, सेखाने ‘त्याजागी, तिथे’, तत ‘तितका, तेवढा’, तेमन, तेमत, सेइमत ‘तसा, त्यासारखा’ अशी रूपे मिळतात.

क्रियापद : धातूला कालवाचक चिन्ह लावून नंतर पुरुषवाचक प्रत्यय लावले, की क्रियापद सिद्ध होते. क्रियापदात वचनभेद नाही. एकवचन व अनेकवचन यांचे रूप एकच असते. बंगालीत वर्तमान, भूत, रीतिभूत व भविष्य हे चार शुद्ध काळ आहेत. चालू वर्तमान, चालू भूत, चालू संकेत, चालू भविष्य हे आणि पूर्ण वर्तमान, पूर्ण भूत, पूर्ण संकेत व पूर्ण भविष्य हे एकंदर आठ काळ मिश्र आहेत. हे सर्व काळ विध्यर्थाचे असून आज्ञार्थाचे सरळ व भविष्यकालीन असे दोन प्रकार आहेत. प्रत्येक काळात क्रियापदाची एकंदर सहा रूपे होतात. प्रथमपुरुषाचे एक द्वितीयपुरुषात सामान्य, कनिष्ठ व आदरवाचक अशी तीन तृतीयपुरुषात सामान्य व आदरवाचक अशी दोन. पण द्वितीय व तृतीयपुरुष आदरवाचक रूपे सारखी असल्यामुळे दृश्य रूपे पाचच आहेत.

मिश्र काळासाठी आछ- ‘अस-’, थाक- ‘रहा-, अस’, ह- ‘हो-, अस-’ आणि रह- ‘रहा-, अस-’ या धातूंची रूपे मूळ क्रियापदाबरोबर वापरतात. यापैकी आछ या धातूची फक्त वर्तमान व भूतकाळाची रूपेच मिळतात. रीतिभूत व भविष्यकाळात थाक-ची रूपे वापरतात. इतर धातूंची सर्व रूपे मिळतात. शुद्ध काळातील क्रियापदांच्या प्रत्ययांचा तक्ता पुढीलप्रमाणे :

पुरुष ⟶ 

प्रत्ययपूर्व  रूप 

↓ 

प्रथम 

द्वितीय सामान्य 

द्वितीय कनिष्ठ 

द्वितीय तृतीय आदरवाचक 

तृतीय 

वर्तमान

धातू + शून्य

–इ 

–अ, –ओ 

–इस 

–एन 

–ए, –य 

भूत

धातू +–इल, –ल 

–इलाम, –इलेम, –लाम, –लेम, –लुम 

–इले, –ले 

–इलि, –लि  (–लिस) 

–इलेन, –लेन 

–इल, –ल, –लो 

(सकर्मक असल्यास –ले) 

रीतिभूत

धातू +–इत, –त 

–इताम, –इतेम, – ताम, –तेम, –तुम 

–इते, –ते 

–इतिस, –तिस 

–इतेन, –तेन 

–इत, –त 

भविष्य

धातू +–इब, –ब

–इब,–ब, –बो 

–इबे, –बे 

–इबि, –बि 

–इबेन, –बेन 

–इबे, –बे 

मिश्र काळांची रूपे पुढीलप्रमाणे : चालू वर्तमान = धातू + आछ-चा वर्तमान चालू भूत = धातू + आछ-चा भूत चालू रीतिभूत = धातू + (इ) ते आछ-चा रीतिभूत चालू भविष्य = धातू (इ) ते + आछ-चा भविष्य पूर्ण वर्तमान = धातू + इया, ए + आछ-चा वर्तमान पूर्ण भूत = धातू + इया, ए + आछ-चा भूत पूर्ण रीतिभूत = धातू + इया, ए + आछ-चा रीतिभूत पूर्ण भविष्य = धातू + इया, ए + आछ -चा भविष्य.

चल – या धातूची सर्व काळातील प्रथमपुरुषाची रूपे – (वर्तमान) चलि ‘मी-आम्ही चालतो’ (भूत) चलिलाम ‘मी चाललो’ (रीतिभूत) चलिताम ‘मी चालायचो’ (भविष्य) चलिब ‘मी चालीन’ (चालू वर्तमान) चलछि ‘मी चालतो आहे’ (चालू भूत) चल छिलाम ‘मी चालत होतो’ (चालू रीतिभूत) चलतेथाकतुम ‘मी चालत असायचो’ (चालू भविष्य) चलतेथाकबा ‘मी चालत असीन’ (पूर्ण वर्तमान) चलेलि ‘मी चाललो आहे’ (पूर्ण भूत) चलेछिलाम ‘मी चाललो होतो’ (पूर्ण रीतिभूत) चलेथाकताम ‘मी चाललो असायचो’ (पूर्ण भविष्य) चले थाकबो ‘मी चाललो असतो’.

चल –या धातूची इतर रूपे अशी आहेत : (तुबंत) चलते ‘चालायला’ (क्रियावाचक नाम) चला, चलन, चलबा ‘चालणे’ (अव्यय) चले ‘चालून’ (अव्यय) चलिले ‘चालल्यावर’ (वर्तमान धातुसाधित) चलते ‘चालत’ (वर्तमान विशेषण) चलंत ‘चालणारा’ (कर्मणि धातुसाधित) चला ‘चाललेला.’

वाक्यरचना : वाक्यातील शब्दांचा क्रम सामान्यपणे कर्ता + अप्रत्यक्ष कर्म + क्रियापद असा आहे : से आमाके दुटो टाका दिले ‘त्यांनी मला दोन रुपये दिले’. विशेषण नामापूर्वी आणि अव्यय क्रियापदापूर्वी येते. संयोजक क्रियापद बहुधा वगळण्यात येते : छेलेटि बड भाल ‘मुलगा फार चांगला (आहे)’ तोमार बाडी कोथा ? ‘तुमचं घर कुठे (आहे)?’

नकारवाचक शब्द वाक्याच्या शेवटी येतो : आमि बाडी जाबो ना ‘मी घरी जाणार नाही आहे’. पण आश्रित उपवाक्यात ना क्रियापदापूर्वी येते : जदि आमि ना आसि, तुमि ताहाले एकलाइ जेओ’ जर मी आलो नाही, तर तू एकटा जा’.

वाक्ये ओ ‘आणि’ या अव्ययाने जोडण्याऐवजी क्रियापदांचे अव्ययरूप जास्त वापरले जाते: से सेखाने गिये घरे ढुके देखले जे लोकटि असुख इथे बिछानाथ पडे आसे ‘त्यांनी तिथे जाऊन घरात शिरून पाहिलं की तो माणूस आजारी होऊन बिछान्यात पडून आहे’.

अप्रत्यक्ष कथनापेक्षा प्रत्यक्ष कथन अधिक रूढ आहे. अप्रत्यक्ष कथन जरा कृत्रिम वाटते.

आश्रित उपवाक्य मुख्य वाक्यापूर्वी येते : से फिरले आमि जाबो ‘तो परतल्यावर मी जाईन.’

संदर्भ : 1. Chatterji, S. K. A Bengali Phonetic Reader, London, 1928.

            2. Chatterji, S. K. Bengali Self-taught, London, 1927.

            3. Chatterji S. K. The Origin and Development of the Bengali Language. 2 Vols., Calcutta, 1926.

            4. Government of India, Census of India : Grammatical Sketches of Indian Languages with Comparative Vocabulary and Text, new Delhi, 1971.

            5. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. V, Delhi, 1963.

           ६. सुखटणकर, स. ग. बंगाली भाषाप्रवेश, खंड १, मुंबई, १९७३.

कालेलकर, ना. गो.