मुंगीचा वाघ : (गुंडी किडा). न्यूरॉप्टेरा गणाच्या मर्मिलिओंटिडी कुलातील मर्मिलिओनाइड्स या उपकुलातील कीटकांच्या डिंभांना (अळ्यांना) मुंगीचा वाघ असे म्हणतात. यांपैकी मर्मिलिऑन फॉर्मिकेरियस ही जाती सर्वाधिक परिचित आहे. हे कीटक अनाकर्षक व रात्रिंचर आहेत. आर्. ए. एफ्. द रेओम्यूर या संशोधकांनी पॅरिसजवळ सापडणाऱ्या या कीटकाचा अभ्यास केला. या कीटकाचा डिंभ परभक्षी असून ह्याचे अन्न मुंग्या आहे. या डिंभाचे डोके चौकोनी असून त्यावर दाते असलेले तीक्ष्ण व बळकट असे दोन जंभ (जबडे) असतात. डोक्याच्या मागे अग्रवक्ष (छातीचा पुढचा भाग) असते व याचाच मान म्हणून उपयोग होतो. यामागे करड्या रंगाचे व अंडाकृती उदर असते. या उदरावर रोम (राठ केस) व चामखिळीसारखे उंचवटे असतात. आपले भक्ष्य पकडण्याकरिता हे डिंभ ओसाड, भुसभुशीत व रेताड जमिनीत सापळे (गदी) तयार करतात. जंभाच्या, साह्याने जमिनीत केलेला नसराळ्यासारख्या ५० मिमी. खोल, ७५ मिमी. व्यासाचा व आतील अंगाने उतरता असा खळगा म्हणजेच या डिंभाचा सापळा होय. खळग्याच्या तळाशी जाऊन आपले सर्व शरीर मातीने झाकून फक्त जंभ मातीबाहेर ठेवून हा आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसतो. मुंगी गोंधळून जाऊन खाली घसरते व आयतीच त्याच्या जंभात पकडली जाते. मुंगीच्या शरीरातील सर्व अन्नरसांचे सेवन केल्यावर मुंगीचे मृत फोलपटासारखे झालेले शरीर हा बाहेर फेकून देतो. हे सापळे नेहमी कोरड्या जमिनीवर केले जातात. उंच भिंतीच्या पायथ्याशी किंवा खडकाच्या बाजूस हे आढळतात. या डिंभास नेहमीसारखे तोंडाचे छिद्र असत नाही. भक्ष्य जंभांत पकडल्यावर त्यातील रस, जंभांवर असलेल्या खाचेतून सरळ तोंडाच्या पोकळीत नेला जातो.
डिंभाची पूर्ण वाढ झाल्यावर तो स्वतःभोवती अंडाकृती कोश तयार करतो. हा कोश शरीराच्या मागील भागांत असेलल्या ग्रंथीच्या स्त्रावात बारीक रेतीचे कण मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचा असतो. पूर्ण रूपांतरण झाल्यावर कोशातून प्रौढ कीटक बाहेर पडतो. मर्मिलीऑन या प्रजातीत पुष्कळ जाती आहेत. या प्राण्याचा आहार मुंग्या असून तो त्या बळाने पकडतो म्हणून त्याला मुंगीचा वाघ हे नाव मिळाले असावे. या जातीचा प्रौढ प्राणी लाजाळू आहे व तो डिंभासारखाच रात्रिंचर आहे. हे प्राणी आफ्रिका, यूरोप व आशियात आढळतात. अंड्यातून डिंभ बाहेर पडण्यास ८ ते १० दिवस लागतात डिंभावस्था चार ते सहा आठवडे राहते कोशातून बाहेर पडल्यावर पूर्णावस्था सहा ते बारा आठवडे असते. या अवधीत मादी चार ते सहा वेळा जमिनीत अंडी घालते.
क्रोस फिलिपेनिस ही म. फॉर्मिकेरियस या जातीशी निकटचे आप्तसंबंध असलेली प्रारूपिक (नमुनेदार) भारतीय जाती असून या कीटकाचे मागचे पंख खूपच लांबट व फितीसारखे आणि टोकाला थोडेसे पसरट असतात. याचे डोके पुढे वाढलेले असते. डिंभाची मान स्पष्टपणे दोन खंडांची असते आणि त्याच्या मध्यवक्षाचा व पश्चवक्षाचा विकास पूर्ण झालेला नसतो. या कीटकाचे जबडे मुंगीच्या वाघासारखेच असतात व तो इतर लहान किड्यांवर उपजीविका करतो.
म. काँट्रॅक्टस ही बंगालमध्ये आढळणारी जाती चिखलाने माखलेल्या वृक्षांच्या खोडावर सापडते व मुंग्या खाऊन जगते. हा कीटक असंख्य मुंग्यांचा संहार करतो तथापि त्यामुळे मुंग्यांची संख्या घटल्याचे दिसून येत नाही. याचा डिंभ परिपक्व झाल्यावर गोलसर कोश तयार करतो. वाळू किंवा इतर दडून राहण्याच्या जागी हा कोशावस्थेत जातो.
रानडे, द. र.
“