मु ‘अल्लकात, अल् : अरबी भाषेतील इस्लाम-पूर्व सात कसिदांचा संग्रह. इम्रु–उल्–कैस, अल्–हारिस–इब्न–हिल्लिझह, अंतरह, जुहैर, लबीद, अम्र–इब्ज कुलसूम आणि तरफह हे ह्या कसीदांचे सात कवी. हे सर्व इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेले. सात कसीदांचे हे संकलन इ. स. च्या आठव्या शतकात हम्माद अर्रावियाह ह्याने केले. ह्या सातही कसीदा प्राचीन अरबी काव्याचा उत्कृष्ट नमुना समजल्या जातात. कवींची वेधक प्रतिमासृष्टी, सूक्ष्म निरीक्षण आणि निसर्गाबद्दल त्यांना वाटणारी उत्कट जवळीक ही ह्या संग्रहातील कवितांची काही लक्षणीय वैशिष्ट्ये, लेडी ॲनी आणि सर डब्ल्यू. एस् ब्लंट ह्यांनी ह्या कसीदासंग्रहातील कवितांच्या इंग्रजी अनुवाद ‘द सेव्हन गोल्डन ओड्स ऑफ पेगन अरेबिया’ ह्या नावाने केला आहे (१९०३) तसेच ए. जे. आरबेरी ह्यांनी केलेला द सेव्हन ओड्स (१९५७) हा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध आहे.
कुलकर्णी, अ. र.