मीर ‘अनीस’ : (सु. १८०२–९ डिसेंबर १८७४). उर्दूतील ‘मर्सिया’ (शोकगीत) हा काव्यप्रकार हाताळणारे सर्वोत्कृष्ट कवी. मीर बबर अली ‘अनीस’ यांचा जन्म फैझाबाद येथे झाला. फैझाबादहून ते लखनौला आले आणि तेथेच स्थायिक झाले. मौलवी हैदर अली यांच्याकडून अनीस अरेबिक भाषा शिकले व काव्यरचनेचे तंत्र त्यांनी आपले वडील मीर खलीफ यांच्याकडून आत्मसात केले.

प्रारंभी त्यांनी गझला लिहिल्या पण नंतर मात्र त्यांनी आपली सर्व काव्यप्रतिभा ‘मर्सिया’ या काव्यप्रकारची रचना करण्यात खर्च केली. मर्सियात त्यांनी पैंगंबरांचा नातू इमाम हुसेन यांचे नातेवाईक व स्नेही यांच्या इराकमधील करबला येथे झालेल्या लढाईत (इ. स. ६८०) शहीद झालेल्या घटनेचे वर्णन केले आहे. मर्सियातील उत्कृष्ट शैलीमुळे आणि मर्सिया सादर करण्याच्या अत्यंत प्रभावी पद्धतीमुळे त्यांनी लखनौमधील अमीर-उमरावांची व सर्वसामान्य व्यक्तींची हृदये काबीज केली. १८५७ च्या बंडामुळे लखनौमध्ये जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे ते १८५९ मध्ये नबाब कासीम अली यांच्या निमंत्रणावरून पाटणा येथे गेले. त्यांनी १८७१ मध्ये हैदराबादचा देखील प्रवास केला पण लखनौच्या आठवणी त्यांना इतरत्र स्थिर होऊ देत नव्हत्या. ते पुन्हा लखनौस परतले आणि तेथेच त्यांचा अंत झाला.

त्यांनी मर्सियाचे विपुल लेखन केले ते मरसिए अनीस (५ खंड–१९१२, १९६१) या नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी ‘मर्सिया’हा काव्यप्रकार ‘मुसद्दस’ लिहिला. या पद्धतीत एका कडव्यात सहा ओळी असतात. त्यांनी काही रूबाईयाँही लिहिल्या असून त्यांत कमालीचा संक्षेप व मानवी जीवनाकडे तत्त्वज्ञाच्या दृष्टीने पहाणे ही दोन वैशिष्ट्ये दिसून येतात. मर्सियामध्ये मीर अनीसांचे विपुल शब्दभांडार व काव्यातील ओघ प्रकर्षाने जाणवतो. त्यांची भाषा उपमारूपकांनी नटलेली आणि नावीन्यपूर्ण आहे. त्यांच्या शैलीत वाक्‌प्रचारांचा सहजसुंदर वापर आढळतो. त्यावेळी लखनौतील काव्य हे बरेचसे कृत्रिम बनले होते पण मीर अनीस यांनी मात्र अत्यंत सहजतेने काव्यरचना करून त्यात जिवंतपणा आणला. त्यांची काव्यकला इतकी साधी व सहज होती, की सकृद्दर्शनी तिचे कलारूप जाणवतच नाही. आपल्या काव्यरचनेत त्यांनी आलंकारितेचा अत्यंत खुबीने वापर केला आहे. नैसर्गिक दृश्यांचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. ‘मर्सिया’ तील विविध पात्रांच्या भावभावनांचे वर्णन मीर अनीस यांनी मोठ्या ताकदीने केले असून त्याला भारतीय जीवनाची झालर लावली आहे. ‘बैन’ (विलाप) आणि ‘रझ्म’ (महाकाव्य) या मर्सियाच्या दोन्ही घटकांत मीर अनीस यांनी वाखाणण्याजोगे प्रावीण्य तर प्राप्त केलेच, पण मर्सिया-प्रकाराचा आपल्या लेखनाने परमोत्कर्षही साधला आहे.

नईमुद्दीन, सैय्यद