मीरत विद्यापीठ : उत्तर प्रदेशातील एक विद्यापीठ. १ जुलै १९६५ मीरत येथे स्थापना. आग्रा विद्यापीठावरील वाढत्या महाविद्यालयांचा ताण कमी करण्यासाठी उत्तर प्रदेश विधान परिषदेने एप्रिल १९६५ मध्ये एक अधिनियम करून कानपूर व मीरत अशा दोन स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना करण्याचे जाहीर केले. १९७४ च्या अधिनियमानंतर काही फेरफार करण्यात आले.

विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक व अध्यापनात्मक आहे. बुलंदशर, मीरत, मुझफरनगर, गाझियाबाद आणि सहारनपूर हे जिल्हे तसेच एक संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज), एक घटक महाविद्यालय, ५८ संलग्न महाविद्यालये विद्यापीठ-कक्षेत येतात. कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, कृषी विधी आणि वैद्यक ह्या विद्याशाखा त्यात आहेत. शिक्षणाचे माध्यम हिंदी व इंग्रजी आहे. विद्यापीठात बी. ए. ह्या पदवी परीक्षेसाठी पत्रद्वारा शिक्षणाची तसेच कला आणि वाणिज्य विद्याशाखांतील बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष ७ जुलै ते १४ मे असते.

विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेत (१९६९) कला, विज्ञान व शिक्षणशास्त्र ह्यांच्या पदव्युत्तर तसेच एम्‌. फिल्‌ ह्या अभ्यासक्रमांची सोय केलेली आहे. पीएच्‌.डी., डी.लिट्‌, डी.एस्‌सी. ह्या पदव्यांसाठी संशोधन करण्याची सोय विद्यापीठात आहे. मुले व मुली यांसाठी विद्यापीठाची स्वतंत्र वसतिगृहे आहेत. विद्यापीठाचा स्वतंत्र दवाखाना आहे. विद्यार्थ्यांना विविध खेळ शिकविण्यास विद्यापीठाने क्रीडा अधिकारी व शिक्षक यांची नियुक्ती केली असून त्याद्वारा विद्यापीठस्तरांवर क्रीडास्पर्धा आयोजित केल्या जातात.

विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध व सुसज्ज आहे. सु. १०० वाचक बसू शकतील, अशी ग्रंथालयात सोय आहे. १९८३–८४ मध्ये ग्रंथालयात ८८,२२१ ग्रंथ व ९६६ नियतकालिके होती. विद्यापीठात ६७,८९३ विद्यार्थी शिकत होते. याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न १·०४ कोटी रु. व खर्च १·४४ कोटी रु. होता.

मिसार, म. व्यं.