संयुक्त राष्ट्रांचा बालक निधि (युनिसेफ) : संयुक्त राष्ट्रांनी बालकल्याणार्थ स्थापन केलेले अभिकरण (एजन्सी). संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ११ डिसंेबर १९४६ रोजी त्याची स्थापना केली. त्याचे पूर्वीचे नाव ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड’ (१९४६-५३) असून ‘युनिसेफ’ या संक्षिप्त नावाने ही संस्था सर्वपरिचित आहे. यूरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची झळ पोहोचलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार इ. पुरवण्याचे कार्य युनिसेफने स्थापनेनंतर (१९४६) लगेचच तत्परतेने सुरू केले. त्यानंतर युनिसेफने आपले सेवाक्षेत्र विस्तारले आणि १९५० नंतर विशेषत: कमी विकास झालेल्या देशांत आणि आपद्ग्रस्त भागांत यूनिसेफने लक्ष केंद्रित केले बालकांमधील रोगराई, कुपोषण, निरक्षरता यांचे उच्चटण करण्यासाठी काही दीर्घ पल्ल्याचे उपक्रम कार्यान्वित केले. पुढे १९५३ मध्ये त्याच्या शीर्षकातील ‘ इंटरनॅशनल ’ (आंतरराष्ट्रीय) व ‘ इमर्जन्सी ’ (विपद्ग्रस्त) हे शब्द वगळण्यात आले. विदयमान काळातील युनिसेफचे कार्य म्हणजे अविकसित तसेच विकसनशील देशांतील कोट्यावधी बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्या त्या देशांतील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सर्वतोपरी साहाय्य करणे. युनिसेफ शंभराहून अधिक देशांतील बालकांचे अनारोग्य, उपासमार, निरक्षरता यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मदत करते. बालकांसाठी रोगनियंत्रण कार्यक्रम, आरोग्य केंद्रे, दीन-सेवाकेंद्रे, शालेय आहार योजना, तसेच इतरही अनेक प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवते. सुश्रूषा, अध्यापनादी सेवांचे प्रशिक्षण व्यक्तींना देण्यासाठी युनिसेफमार्फत आर्थिक अनुदानही दिले जाते.

युनिसेफचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक समितीमार्फत तीस देशांतील प्रतिनिधींचे कार्यकारी मंडळ तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जाते. युनिसेफच्या ह्या कार्यकारी मंडळाच्या अखत्यारीत धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे घालून देणे व युनिसेफच्या कार्यकमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, ही कार्ये प्रामुख्याने येतात. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव कार्यकारी संचालकाची नियुक्ती करतात. युनिसेफच्या न्यूयॉर्कच्या मुख्यालयातील १,४०० कर्मचारी, तसेच जगभरातील सु. ४० क्षेत्रीय कार्यालये ही कार्यकारी संचालकांच्या नियंत्रणाखाली येतात. युनिसेफचे शंभराहून अधिक देशांत जे उपक्रम चालतात, त्यांपैकी अनेक संयुक्त राष्ट्रांच्या इतर अभिकरणाच्या तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने संयुक्त रीत्या चालतात.

युनिसेफला स्वेच्छेने दिल्या जाणाऱ्या देणग्या, निधी यांव्दारे अर्थसाहाय्य होते. त्याच्या उत्पन्नाचा जवळजवळ तीन-चतुर्थांश हिस्सा वेगवेगळ्या देशांच्या शासनांकडून येतो. काही उत्पन्न निरनिराळ्या संघटना, व्यक्ती यांच्या देणग्यांतून मिळते, तसेच भेटकार्डांची विकी व इतर निधिसंकलनयोजना यांतूनही काही उत्पन्न जमते. युनिसेफच्या एकूण उत्पन्नापैकी एक-चतुर्थांश हिस्सा तातडीच्या आपत्कालीन सेवांसाठी राखून ठेवलेला असतो. नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थैर्य, साथीचे रोग अशा कारणांमुळे नुकसान पोहोचलेल्या विपद्गस्त बालकांसाठी त्याचा उपयोग केला जातो. दीर्घ पल्ल्याच्या पुनर्वसन योजनांसाठीही युनिसेफ साहाय्य देते. बालपणी उद्भभवणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच एच्आय्व्ही/एड्स सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपयोजिलेल्या प्रतिरक्षक उपकमांना युनिसेफ सर्वतोपरी मदत करते. १९७६ मध्ये युनिसेफने तिसऱ्या जगातील, अविकसित देशांतील बालके व माता यांच्या आरोग्यसुधारणेसाठी पोषक आहार, पर्यावरण-स्वच्छता, शिक्षण, समाजकल्याण इ. बाबींमध्ये मूलभूत सेवासुविधांविषयक एक योजना तयार केली. बालहक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी युनिसेफवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सोपवली आहे (१९८९). त्यानुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषक आहार इत्यादी सुविधा व सवलती त्यांना प्राप्त करून दयाव्यात, असे निवेदन त्यात आहे. या जाहीरनाम्यान्वये बालकांचे हक्क जपण्यात आले आहेत. बालकांच्या आंतरराष्ट्रीय वर्षातील (१९७९) संयुक्त राष्ट्रांच्या विविध उपकमांचा समन्वय साधणारी ‘ युनिसेफ ’ ही मध्यवर्ती संघटना होती. १९६५ मध्ये युनिसेफला त्याच्या बालकल्याणाच्या कार्यार्थ, तसेच आंतरराष्ट्रीय बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या भूमिकेबद्दल शांततेसाठी असलेला नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

इनामदार, श्री. दे