कुरुक्षेत्र विद्यापीठ : हरयाणा राज्यातील एक विद्यापीठ. याची स्थापना कुरुक्षेत्र येथे १९५६ मध्ये झाली. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व निवासी असून १६ किमी. परिसरात त्याचे कार्यक्षेत्र विभागले गेले आहे. त्यात दोन घटक महाविद्यालये आणि दोन विद्यापीठीय महाविद्यालये यांचा समावेश आहे. 

विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांसारखेच असून कुलगुरू व कुलसचिव हे प्रमुख शासकीय उच्चाधिकारी आहेत.

शैक्षणिक वर्ष तीन सत्रांचे असते. त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम १९६१-६२ मध्ये येथे सुरू करण्यात आला. विविध विषयांच्या एकूण तेरा विद्याशाखा आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान यांबरोबर संस्कृत, प्राकृत, आधुनिक भारतीय भाषा, भारतीय तत्त्वज्ञान, प्राचीन इतिहास, भारतविद्या हे विषय विद्यापीठात शिकविले जातात. प्रगत अभ्यास व संशोधनकार्य हे याचे खास वैशिष्ट्य आहे. मानव्यविद्या, विज्ञान, कला वगैरेंची महाविद्यालये आणि एक व्यवसाय महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्‍ल आहे. बी. ए. परीक्षेचे माध्यम इंग्रजी, हिंदी व पंजाबी असून इतर सर्व पदव्या व पदव्युत्तर परीक्षांचे माध्यम इंग्रजीच आहे. या विद्यापीठात १९७१-७२ मध्ये ५,३६२ विद्यार्थी शिकत होते.

विद्यापीठाचा १९७१-७२ अर्थसंकल्प सु. ९७·३५ लाख रुपयांचा होता.

घाणेकर, मु. मा.