बाझेडो, योहान बेर्नहार्ट : (११ सप्टेंबर १७२३- २५ जुलै १७९॰). जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ. जन्म हँबर्ग (प. जर्मनी) येथे. हँबर्ग व लाइपसिक येथे शिक्षण. हॉल्स्टाइन येथे तीन वर्षे शिक्षक (१७४९-५२). पुढे सॉर (डेन्मार्क) येथील अकादमीत प्राध्यापक (१७५३-६१) म्हणून त्याने काम केले. नंतर आल्तोना (प.जर्मनी) येथे त्याची बदली झाली. तेथे तो सात वर्षे (१७६१-६८) होता. रूसोच्या एमिल या ग्रंथाने (१७६२) प्रभावित होऊन योहानने शिक्षणात मूलग्राही बदल घडविण्याचा प्रयत्न केला. त्याने प्राथमिक शिक्षणपद्धतीवर एलीमेंटरवर्क नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा स्थूलमानाने आशय खालीलप्रमाणे : लहान मुलांना शब्द आणि वस्तू यांच्या साहाय्याने शिक्षण देण्यात यावे शिक्षणाची पद्धत अनुभवांवर आधारित असावी लहान मुलांना निसर्गातून देता येईल असे ज्ञान द्यावे त्याचप्रमाणे त्यांना तर्क, नीतिज्ञान व सामाजिक कर्तव्ये यांचेही शिक्षण द्यावे. बाझेडोच्या चळवळीला सामान्यत: ‘लोककल्याणकारी चळवळ’मानले जाते. त्याच्या वरील ग्रंथाने शिक्षणक्षेत्रात मोठीच खळबळ उडवून दिली आणि एक श्रेष्ठ लोककल्याणकर्ता असे त्याला मानण्यात येऊ लागले. बाझेडो विचारवंत असला, तरी त्याच्याजवळ व्यवस्थापन कौशल्ये नव्हती. तो स्वभावाने चंचल व भांडखोर होता. त्याच्या विचारावर कोमेनियस, लॉक आणि रूसो यांच्या दृष्टिकोनांचा प्रामुख्याने परिणाम झाला. ‘रूसोच्या मतांचा खराखुरा पुरस्कर्ता’ असेच बाझेडोचे वर्णन केले जाते. त्याने लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल जी विचारप्रणाली मांडली, ती अंमलात आणण्यासाठी ‘फिलान्थ्रॉपिनम्’ म्हणजेच लोककल्याणकारी नावाची शाळा सुरू केली. या शाळेमध्ये तरुणांना मानवतावादी शिक्षण दिले जाई. श्रीमंतांच्या मुलांना सुखी जीवनाचे आणि इतरही दृष्टीने उपयुक्त असे, तर गरिबांच्या मुलांना कष्ट करून पोट भरता येईल या प्रकारचे शिक्षण देणे या शाळेचे उद्दिष्ट होते. शाळेत पाठयपुस्तकांची व शारीरिक शिक्षणाची आवश्यकता आहे शिक्षण हे धर्मपीठांच्या (चर्च) नियंत्रणापासून मुक्त असावे ज्यू, कॅथलिक, प्रॉटेस्टंट इतकेच नव्हे तर ज्यांचा कोणत्याच धर्मपंथावर विश्वास नाही, अशांनाही आपल्या शाळेत प्रवेश असावा शिक्षणाच्या बाबतीत शासनाचे नियंत्रण धर्मसत्तेच्या नियंत्रणापेक्षा वरचे असावे असे बाझेडोचे मत होते. त्याच्या या मतामुळे शिक्षणावर राज्यसत्तेचे नियंत्रण असावे हे मत ग्राह्य मानण्यात येऊ लागले. शिक्षणविषयक सुधारणेला बाझेडोच्या लिखाणाने मोठीच चालना लाभली. शिक्षणात नेमकी सुधारणा कोणती पाहिजे, हे त्याने मांडले. इतकेच नव्हेत तर ते प्रतिपादन आचरणात कसे आणावयाचे हेही दाखवून दिले. त्यामुळे पुढील काही वर्षांत बाझेडोच्या पद्धतीप्रमाणे अनेकांनी जर्मनीत शाळा काढल्या व त्याने काढलेल्या शाळेसारख्या शाळा पुढील अनेक वर्षांत जर्मनी आणि स्वित्झर्लंमध्ये पसरल्या. बाझेडोच्या काळापूर्वी शाळेचे व्यवस्थापन अत्यंत कमकुवत असून त्यावर धर्मसत्ता आणि राज्यसत्ता या दोहोंचे नियंत्रण होते. शाळेमध्ये वास्तववादी शिक्षण आणि शारीरिक शिक्षण यांचा अंतर्भाव करावा, असे त्याचे मत होते. त्याच्या कार्यात खालील उणिवा होत्या : (१) बाझेडोने काढलेल्या शाळा मुख्यत: स्वभावदोषांमुळे बंद कराव्या लागल्या. शालेय व्यवस्थापनातील उणिवाही काही अंशी त्यास कारणीभूत ठरल्या. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये नव्याने उदयास आलेल्या मानवतावादामुळे बाझेडोच्या उपयुक्ततावादास मोठाच विरोध होऊ लागला. याप्रकारे त्याच्या विचारप्रणालीत व प्रयोगात काही दोष असले, तरी त्याच्या कार्यप्रणालीचा उपयोग करून पेस्टालोत्सी, फ्रबेल आणि हर्बर्ट यांसारख्या तत्त्ववेत्त्यांनी शिक्षणसुधारणेत मोठी भर घातली. अवलोकन व अनुभव यांवर शिक्षणाची उभारणी केली जावी, असे पूर्वकालीन वास्तववादी तत्त्वज्ञांच्या मतांशी जुळणारे त्याचे मत होते. तो स्थानिक परिसराच्या अभ्यासापासून भूगोल विषयाचा आरंभ करी. लॅटिन भाषा तो एखाद्या रोमन नागरिकाप्रमाणे सहजपणे बोलत असे. निसर्गनिरीक्षणाबरोबरच शारीरिक आणि हस्तव्यवसायांचे शिक्षण त्याच्या शाळांतून दिले जाई. प्राथमिक शिक्षणाची एक नवीन पद्धती त्याने सुरू केली. मुलांचा संबंध केवळ शब्दांशी न राखता शक्यतो खऱ्याखुऱ्या वस्तूंशी त्यांचा संबंध आणून त्यांचा बौद्धिक विकास साधणरी ही पद्धती होती. देसौ येथे त्याने स्थापिलेल्या आदर्श शाळेचा लोकांवर फारच प्रभाव पडला. या आदर्श शाळेत विद्यार्थ्यांचे तीन गट असत : (१) श्रीमंतांची मुले, (२) गरीब पण हुशार मुले, (३) गरीब आणि मंद मुले. अशाच शाळा सर्वत्र सुरू करण्यात येऊ लागल्या. रूसो आणि कोमीनिअस यांचे विचार शिक्षणपद्धतीत राबविण्यात आले. मुलाला मूल समजून शिकविले पाहिजे त्यास प्रशिक्षण व मार्गदर्शन करायला हवे त्याच्या सहजप्रवृत्तींना दडपून न टाकता अभ्यासक्रमात विचार व शब्द यांच्यापेक्षा अनुभव व वास्तवता यांस स्थान देण्यात यावे प्रत्यक्षानुभव, खेळ आणि संभाषण यांना शिक्षणपद्धतीत फार महत्त्व आहे असा बाझेडोचा दृष्टिकोन होता. लोकशिक्षणाची एक पर्यवेक्षी समिती असावी व तिने दोन प्रकारच्या शाळांचे संचालन करावे : एक प्रकार रीतसर पाठशाळेत जाणाऱ्या मुलांच्या शाळा आणि दुसरा प्रकार सामान्यजनांच्या मुलांच्या शाळा. त्याची ही शैक्षणिक चळवळ जर्मनी व स्वित्झर्लंमध्ये खूप फोफावली. त्याचे विचार स्वतंत्र असून तत्त्वधारा बेकन (१५६१-१६२६), कोमीनिअस (१५९२-१६७॰) आणि रूसो (१७१२-७८) यांच्या तत्त्वप्रणालींशी जुळणारी होती. जर्मन भाषेत त्याच्यासंबंधी बरेच ग्रंथ उपलब्ध आहेत. पाखंडीपणामुळे त्याचे धर्मपीठाशी कधीच पटले नाही. त्याने शिक्षणपद्धतीत प्रायोगिक पद्धती व शिक्षकांचे प्रशिक्षण या तत्त्वांचा अवलंब केला. मॅग्डेबर्ग (पू.जर्मनी) येथे त्याचा मृत्यू झाला.

घाणेकर, मु. मा मिसार, म. व्यं.