सहशिक्षण : समान निकषांच्या आधारे मुलांना व मुलींना शाळेत प्रवेश देऊन व त्यांना एकाच वर्गात बसवून, शालांतर्गत व आंतरशालेय उपक्रमांमध्ये एकत्र येण्याची संधी देणे म्हणजेच सहशिक्षण होय. सहशिक्षण-पद्धतीमध्ये मुलांचे व मुलींचे शिक्षण एकाच शिक्षणसंस्थेत होऊन त्यांना एकमेकांमध्ये मिसळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. केवळ मुलींनी मुलांच्या शाळेत शिक्षण घेणे, किंवा मुलांनी मुलींच्या शाळेत प्रवेश घेणे म्हणजे सहशिक्षण घेणे, असा ह्याचा अर्थ नव्हे. जर कोणत्याही शालेय उपक्रमांमध्ये मुलामुलींना एकत्र येण्याची संधी न देता निव्वळ अध्यापनाच्या सोयीसाठी त्यांना एकत्र बसविले जात असेल, तर अशा प्रकारच्या शिक्षणाला सहशिक्षण म्हणता येणार नाही. या शिक्षणपद्धतीमध्ये मुलांना व मुलींना समान पद्धतीने एकाच वेळी, एकाच ठिकाणी व एकाच संस्थेच्या अंतर्गत शिकविले जाते.

संक्षिप्त इतिहास : सहशिक्षण हा शैक्षणिक क्षेत्रातील एक वादग्रस्त मुद्दा आहे. पाश्चिमात्य देशांत सहशिक्षणाची परंपरा फार जुनी आहे. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींत सहशिक्षण-पद्धती अस्तित्वात होती. स्विस शिक्षणतज्ज्ञ ⇨ पेस्टालोत्सीच्या (१७४६-१८२७) शैक्षणिक सिद्धांतामध्येही या पद्धतीला पाठिंबा दर्शविलेला आहे. अमेरिकेमध्ये जवळजवळ संपूर्ण शालेय शिक्षण सहशिक्षण-पद्धतीने दिले जाते. संधीची समानता ही अमेरिकन राष्ट्रीय संकल्पना या पद्धतीतून प्रतिबिंबित होते. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि इटली या यूरोपीय देशांमध्ये मात्र आरंभीच्या काळात सहशिक्षणाची व्याप्ती केवळ प्राथमिक स्तरापुरतीच मर्यादित होती. भारतात ⇨स्त्रीशिक्षणला सुरूवात झाल्यावर सहशिक्षणाच्या मुद्याबाबत चर्चा होऊ लागली व काही शैक्षणिक आयोगांनी पुढील प्रमाणे शिफारशी केल्या:

विदयापीठ शिक्षण आयोग (१९४९) : वय वर्षे १३ ते १८ पर्यंत मुले व मुलींकरिता स्वतंत्र शाळांमध्ये शिक्षण देणे योग्य ठरेल. महाविदयालयीन शिक्षण मात्र सहशिक्षण-स्वरूपाचे असावे, कारण मुले व मुलींकरिता स्वतंत्र महाविदयालये स्थापन करणे आर्थिक दृष्ट्या व्यावहारिक ठरू शकत नाही. या आयोगाच्या मते त्यावेळी भारतात खऱ्या अर्थाने सहशिक्षण देणारी फारच थोडी महाविदयालये होती. खरे तर ती पुरूषांची महाविदयालये होती व तेथे स्त्रियांना प्रवेश दिलेला होता. त्यामुळे बहुतेक सोयी पुरूषांच्या दृष्टिकोनातून केलेल्या होत्या.

माध्यमिक शिक्षण आयोग (१९५२-५३) : जिथे शक्य असेल तिथे मुलींकरिता स्वतंत्र शाळा स्थापन केल्या जाव्यात. कारण मिश्र शाळांपेक्षा स्वतंत्र शाळांमध्ये त्यांची शारीरिक, सामाजिक आणि मानसिक क्षमता विकसित होण्यासाठी योग्य संधी मिळतात. सर्व राज्यांमध्ये आवश्यक तितक्या स्वतंत्र शाळा स्थापन कराव्यात. ज्या पालकांचा विरोध नसेल अशांच्या मुलींसाठी मुलांच्या शाळांमध्ये सहशिक्षणाची संधी उपलब्ध करून दयावी. पण ज्या शाळांमध्ये सहशिक्षण दिले जाणार आहे, अशा ठिकाणी स्त्री-शिक्षक व पुरूष-शिक्षक नेमण्यात यावेत. त्या शाळांमध्ये संगीत, गृहकला, चित्रकला इ. मुलींना आवडणारे विषय शिकविण्याची सोय करण्यात यावी. मुलींकरिता स्वतंत्र विश्रामगृहे, कीडांगणे व प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात यावी. खेडयातील शाळांमध्ये मुलींची संख्या कमी असली, तरी प्रत्येक शाळेत एकतरी शिक्षिका नेमण्यात यावी. मुलींच्या व्यक्तिमत्त्वाला पोषक असे गृहपरिचारिका, विणकाम, वीरबाला यांसारखे शैक्षणिक कार्यक्रम आयोजिले जावेत.

हंसा मेहता समिती (१९६२) : प्राथमिक स्तरावर सहशिक्षण देण्यात यावे. सहशिक्षणपद्धतीला केला जाणारा विरोध मोठया प्रमाणावर सहशिक्षणाचा प्रचार करून कमी करण्यात यावा. तोपर्यंतच्या संक्रमणकाळात पटनोंदणीच्या दृष्टीने आवश्यक वाटल्यास मुलींकरिता स्वतंत्र प्राथमिक अथवा माध्यमिक शाळा स्थापन करण्यात याव्यात. माध्यमिक व महाविदयालयीन स्तरांवर तसेच मुलांच्या शैक्षणिक संस्थांमध्येही शिक्षकांची नेमणूक केली जावी. विशेषत: ज्या संस्थांमध्ये मुली शिक्षण घेत आहेत अशा संस्थांमध्ये शिक्षिकांची नेमणूक करणे सक्तीचे असावे.

सहशिक्षण-पद्धतीवर घेतले जाणारे आक्षेप : सर्वसाधारणपणे प्राथमिक स्तरावर सहशिक्षण-पद्धती लागू करण्यावर विशेष आक्षेप घेतले जात नाहीत. मात्र माध्यमिक स्तरावर अशी पद्घत लागू करण्यावर शारीरिक, मानसिक, सामाजिक, नैतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनांतून बरेच आक्षेप घेतले जातात. माध्यमिक शिक्षण घेत असलेला विदयार्थी पौगंडावस्थेत असतो. या अवस्थेत मुलगा व मुलगी यांच्यात जाणवण्याजोगा फरक पडत जातो. हा काळ सर्वांत जास्त नाजूक आणि मोहमयी असतो. या स्थितीमध्ये विदयार्थ्यांच्या भावविश्वात बरीच उलथापालथ होते. या वयात भावनांवर कडक नियंत्रण नसल्याने ते लैंगिक आकर्षणाला बळी पडू शकतात. त्यामुळे मुलांना व मुलींना एकत्र मिसळू देणे धोक्याचे ठरू शकते. त्याचप्रमाणे विरूद्धलिंगी व्यक्तीकडे आकर्षित झाल्याने त्यांचे अभ्यासावरचे लक्ष विचलित होऊ शकते.

पौगंडावस्थेत मुलांच्या व मुलींच्या क्षमतांचा विकास वेगवेगळ्या पातळ्यांवर झाल्यामुळे दोघांना समान शारीरिक व मानसिक कृतिकार्यक्रम देणे अवघड ठरते. या अवस्थेतील मुले व मुली यांच्यांत बौद्धीक दृष्टया फरक नसला तरी भाषिक जडणघडण व मानसिकतेमध्ये फरक पडतो. त्यामुळे त्यांच्या अभिवृत्ती व अभिरूची यांच्यात तफावत पडते. सहशिक्षण-पद्धतीत बरेचदा मुलींना न्याय मिळत नाही. त्यांच्याकरिता आवश्यक सोयी पुरविल्या जात नाहीत.

समाज मुलामुलींचे मुक्तपणे मिसळणे मान्य करीत नाही. तीच प्रवृत्ती शाळेत संकमित होते. लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ होईल या भीतीपोटीही काही पालक मुलींना मुलांबरोबर शिकण्यास संमती देत नाहीत. अर्थात स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून भारतीय समाजातील स्त्रीची भूमिका व स्थान बदलण्यासाठी खूप धडपड केली आहे. तरीही माध्यमिक स्तरावर सहशिक्षण धोक्याचे आहे, असे या शिक्षणाबाबत आक्षेप घेणाऱ्यांना वाटते.

सहशिक्षण-पद्धतीचे फायदे : या पद्धतीला पाठिंबा देणाऱ्यांनी  नैतिकतेच्या मुदयावर सहशिक्षणावर घेतले जाणारे आक्षेप खोडून काढले आहेत. त्यांच्या मते मुलेमुली एकमेकांच्या सतत सहवासात राहिल्याने त्यांची लैंगिकतेची जाणीव कमी होत जाते. त्यामुळे शाळेतच त्यांना नागरी जीवन समतेच्या तत्त्वावर जगण्याचे प्रशिक्षण सहशिक्षणाव्दारे मिळते. सहशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या जोडप्यांचे विवाह अधिक यशस्वी ठरतात. व्यक्तीचे नैतिक चारित्र्य अधिक बलवान होते. फॉइडच्या मते केवळ सहशिक्षणामुळेच युवा पिढी मानसिक आजारांपासून मुक्त राहू शकते. सहशिक्षणाने विरूद्ध लिंगी व्यक्तीचा आदर करण्याचे शिक्षण सहजगत्या मिळते.

आर्थिक दृष्टया सहशिक्षण हे जास्त फायदेशीर ठरते. विशेषत: भारतासारख्या देशात मोठया प्रमाणावर स्वतंत्र शाळा सुरू करणे परवडणारे नसल्याने मुलामुलींना एकत्र शिक्षण देणे हा पर्याय जास्त योग्य ठरतो. विशेषत: खेडयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी असल्याने थोडया मुलींकरता वेगळी शाळा व इतर सोयी पुरविण्यामुळे अर्थव्यवस्थेवर दुहेरी भार पडतो.

वरील विवेचनातून असा निष्कर्ष काढता येतो, की योग्य नियोजन आणि दक्ष असणारे शालेय व्यवस्थापन प्रत्येक स्तरावर सहशिक्षण यशस्वी करू शकते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षण संस्थामध्ये सहशिक्षणाचे समायोजन मोठया प्रमाणावर केले गेले, ही शैक्षणिक विकासातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे.

संदर्भ : 1. Agarwal, I. C. The Progress of Education in Free India, New Delhi, 1987.

           2. Das, K. K. Development of Education in India, New Delhi, 1986.

           3. Mukherji, B. History of Education in India, New Delhi, 1972.

देहाडराय, वृषाली