भावनगर विद्यापीठ : गुजरात राज्यातील एक विद्यापीठ. भावनगर हे उच्च अध्यायनाचे केंद्र व्हावे, अशी तेथील संस्थानिकांची इच्छा होती. या संस्थानाचे विलिनीकरण झाले. पुढे गुजरात राज्य स्थापन झाल्यावर राज्य शासनाने राजकोट येथे सौराष्ट्र विद्यापीठ स्थापन केले. सौराष्ट्र विद्यापीठ अधिनियमात पुढे १९६८ साली बदल करण्यात आला व २५ नोव्हेंबर १९६८ पासून भावनगर हे सौराष्ट्र विद्यापीठाचे संयुक्त मुख्यालय म्हणून घोषित करण्यात आले.

गुजरात राज्यात शासनाने ३० डिसेंबर १९७० रोजी एक समिती नेमून भावनगर येथे निवासी विद्यापीठ स्थापन करण्यासंबंधी आपला आहवाल सादर करावा, असा ठराव केला. समितीने १९७१ साली तिचा अहवाल शासनास सादर केला. त्यानंतर भावनगर विद्यापीठ अधिनियमातील (१९७६) काही प्राथमिक कलमे जारी करण्यात येऊन (१ जून १९७८) पुढे २४ मे १९७९ रोजी भावनगर येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

विद्यापीठाचे क्षेत्र भावनगर नगरपालिकेच्या परिसरापुरते मर्यादित आहे. निवासी, संलग्‍न व अध्यापनात्मक असे विद्यापीठाचे स्वरूप असून सात संलग्‍न महाविद्यालये आहेत. १५ जून ते २० मार्च असे विद्यापीठाचे वर्ष असून त्यात (१) १५ जून ते २० ऑक्टोबर व (२) १० नोव्हेंबर ते २० मार्च अशी दोन सत्रे सतत असतात. कला, विधी, गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकी ह्या प्रमुख विद्याशाखा आहेत. अध्यायनाचे माध्यम गुजराती आहे.

विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण विभाग व क्रीडामंडळ विद्यापीठांतर्गत व आंतरविद्यापीठीय क्रीडास्पर्धांचे संयोजन व नियंत्रण करतो. एम्. एस्‍सी. बी. एड्. व एल्एल्. बी. या परीक्षांतर्गत विद्यापीठीने सत्र परीक्षा पद्धतीचा व बी. एड्. परीक्षेसाठी अंतर्गत गुणांकन पद्धतीचा अवलंब केला आहे. सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट (भावनगर) नावाची विद्यापीठाची संशोधन संस्थ आहे. गरजू व हुशार विद्यार्थ्यांना अध्ययन व संशोधन यांसाठी विद्यापीठ शिष्यवृत्त्या व विद्यावेतन देते. विद्यापीठीय परिसरात ३०० विद्यार्थी राहू शकतील असे वसतिगृह, तसेच आरोग्यकेंद्र, रोजगार समाचार व मार्गदर्शन संचालनालय यांची सोय आहे.

विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात ३३,३५७ ग्रंथ व ३५ नियतकालिके आहेत. विद्यापीठात ३,८६४ विद्यार्थी व २०० प्राध्यापक असून (१९८१-८२) याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न ४५.०७ लक्ष रू. व खर्च ४५.०७ लक्ष रू. होता.

मिसार, म. व्यं.