मीयाजीमा : ईत्सूकूशिमा या नावाने ओळखले जाणारे हीरोशीमा आखातातील हे बेट, हीरोशीमा शहरापासून आग्नेयीस ९५ किमी. अंतरावर आहे. ते मुख्यत्वे ग्रॅनाइट खडकांचे असून त्यावर सपाट भूमी जवळजवळ नाहीच. या बेटाची जास्तीत जास्त लांबी १० किमी. व रूंदी ४ किमी. आहे. क्षेत्रफळ ३१ चौ. किमी. प्रशासकीय दृष्टीने हे हीरोशीमा विभागात मोडते. उत्तरेकडील किनाऱ्यावर प्रसिद्ध ईत्सूकूशिमा हा बौद्ध मंदिरसमूह आहे. समुद्रात दूरवर उभारलेली १६५ मी. उंचीची भव्य गडद केशरी रंगाची कमान (तोराई) होन्शू बेटाकडून येणाऱ्यांचे स्वागत करते. येथील शिंतो पंथाचे मंदिर इ. स. ५९३ मध्ये बांधले असावे, असे मानतात. येथील देवता मच्छीमारी जमातींच्या संरक्षक देवता आहेत, अशी श्रद्धा आहे. या मंदिरसमूहावर बौद्ध धर्माचाही प्रभाव असून, बेन्‌झाइटेन (सरस्वती) या देवतेचेही वास्तव्य तेथे आहे असे मानतात. त्यामुळे जपानी लोकांचे हे पवित्र देवस्थान ठरले आहे. या देवस्थानाची ६,००० उपदेवस्थाने इतरत्र पसरलेली आहेत. ईत्सूकूशिमा देवस्थानात पुरातन व दुर्मिळ ग्रंथसंहितांचे संग्रहालय असून त्यातील ‘लोटस सूत्रा’ ची सचित्र संहिता उल्लेखनीय आहे. ईत्सूकूशिमा मंदिरसमूह किनाऱ्याजवळ असल्याने भरतीच्या वेळी मंदिरे समुद्रात तरंगत असल्याचा भास होतो. बेटाचा जवळजवळ सर्व भाग वृक्षराजींनी समृद्ध असून, विशेषतः चेरीच्या शोभिवंत झाडांमुळे तेथील परिसराची निसर्गरम्यता वाढलेली आहे. सुंदर वनराजी, पाळीव हरणांचे कळप व किनाऱ्यावरील पुळणी यांमुळे ईत्सूकूशिमा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ झाले आहे.

देशपांडे, चं. धुं.