मीठापूर : गुजरात राज्याच्या जामनगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीचे शहर. हे द्वारकेच्या उत्तरेस सु. १९ किमी. आणि ओखा बंदरापासून सु. ८ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १९,०१४ (१९८१). ही वसाहत विरमगाव-ओखा रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीने १९३९ साली येथे मीठ व विविध रसायननिर्मितीचा मोठा उद्योग सुरू केला. त्यासाठी येथे एक स्वतंत्र औद्योगिक वसाहत उभारली. सोडा ॲश, कॉस्टिक सोडा, द्रवरूप फ्लोराइड, विरंजक चूर्ण, हायड्रोक्लोरिक अम्ल, झिंक क्लोराइड यांसारखी रसायने येथे तयार करतात. येथे टाटा कंपनीतर्फे शैक्षणिक संस्था, वैद्यकीय व इतर नागरी सेवा इ. सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जाधव, रा. ग.