मिश्राश्म : (मिग्मॅटाइट). भूपृष्ठाखाली खोल भागात प्रचंड उष्णतेने तेथील खडकांचे पुन्हा स्फटिकीभवन होते अथवा ते खडक थोड्या प्रमाणात वितळतात व ग्रॅनाइटासारख्या संघटनाचा शिलारस बनतो. तो आजूबाजूच्या रूपांतरित खडकांत घुसतो. अशा तऱ्हेने देशीय (मूळचा) रूपांतरित खडक व ग्रॅनाइटी शिलारस एकमेकांमध्ये पुरते मिसळून बनलेले मिश्र खडक म्हणजे मिश्राश्म होत. प्रथमतः ही संज्ञा सुभाजा आणि पट्टिताश्म यांच्यासारखे रूपांतरित खडक ग्रॅनाइटी शिलारसाशी एकजीव होऊन बनलेल्या संकरज खडकांसाठी वापरीत. फिनलंडमधील अशा कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांहून अधिक जुन्या) खडकांसाठी जे.जे. सेडरहोम यांनी ही संज्ञा प्रथम वापरली (१९०७). आता ही संज्ञा, ग्रॅनाइटी शिलारस कसा तयार झाला, हे विचारात न घेताच अशा संमिश्र स्वरूपाच्या बहुतेक सर्व पातालिक (खोल जागी तयार झालेल्या) खडकांसाठी वापरली जाते.
मिश्राश्मामध्ये ग्रॅनाइटांच्या रेषांसारख्या शिरा तसेच ग्रॅनाइट व मूळ खडक यांचे एकाआड एक थर असतात त्यामुळे तो शिरायुक्त पट्टिताश्माप्रमाणे दिसतो. मिश्राश्म बहुधा सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असणाऱ्या) संघटनाचे (उदा., ग्रॅनाइट, पेग्मटाइट, ॲप्लाइट खडकांच्या संघटनांचे) असतात. तयार होताना याचे मिश्रण डांबराप्रमाणे मंदवाही असल्याने यातील ग्रॅनाइटाचे थर नागमोडी दिसतात. अशा नागमोडी घड्यांना परिवलित (टिग्मॅटिक) घड्या म्हणतात.
यावरून मिश्राश्म मुख्यत्वे अंतर्वेशन व रूपांतरण या क्रियांद्वारे बनत असल्याचे मानतात. छिद्र-द्रायूची (मिग्माची म्हणजे घनरूप खडक व शिलारस यांच्या गतिशील मिश्रणाविषयीची) संकल्पना या दोन्ही मतांच्या मधले मत आहे. पर्वताच्या मूळात (तळाकडील भागात) भिन्नभिन्न प्रकारे किंवा अंशतः वितळण्याची क्रिया होऊन हा छिद्र-द्रायू निर्माण होत असावा. यावरून मिश्राश्म हे रूपांतरीत व अग्निज यांच्या दरम्यानचे संक्रमणी खडक असून ते ग्रॅनाइटाच्या निर्मितीतील एक टप्पा मानले जातात.
शिरायुक्त पट्टिताश्मांचे निर्मितीनुसार दोन प्रकार पडतात : (अ) आर्टेराइट : यातील शिरेचे अंतःक्षेपित द्रव्य शाखोपशाखांप्रमाणे दिसते. याला अंतःक्षेपित पट्टीताश्म असेही म्हणतात. (आ) व्हेनाइट : याच्यामधील शिरांचे द्रव्य मूळच्या खडकातूनच स्त्रावरूपात आलेले असावे. या दोन्हींचे स्वरूप व संघटन सारखे असते. जेव्हा दोन्हींत फरक करता येत नाही, तेव्हा खडकाला फ्लेबाइट म्हणतात.
अंतर्वेशित ग्रॅनाइटाच्या सीमेलगतच्या पट्ट्यात आणि जेथे तीव्र स्वरूपाचे रूपांतरण होते अशा खोल भागात मिश्राश्म आढळतात. फिनलंड नॉर्वे, अमेरीका, स्वीडन, कॅनडा, ग्रेट ब्रिटन इ. देशांत मिश्राश्माचे चांगले नमुने आढळले आहेत. मिश्रण होणे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे ‘मिग्मॅटाइट’ हे इंग्रजी नाव पडले आहे.
पहा : ग्रॅनाइट रूपांतरीत खडक.
ठाकूर, अ. ना.