एमरी : मुख्यत्वेकरून कुरूविंद व थोड्या प्रमाणात हेमॅटाइट, हर्सींनाइट व स्पिनेल असणाऱ्या मिश्रणाला एमरी म्हणतात. ग्रीसच्या नॅक्सॉस बेटाच्या एमरी नावाच्या भूशिराजवळ एमरीचे निक्षेप (खनिज साठे) प्रथम आढळल्यामुळे त्यांना एमरी हे नाव दिले गेले. एमरीचे निरनिराळ्या आकारमानांचे भरड व बारीक कण असणारे प्रकार आढळतात. अपघर्षक (खरवडून व घासून वस्तूचे पृष्ठ गुळगुळीत करणारा पदार्थ) म्हणून एमरीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. एमरीच्या घटकांपैकी महत्त्वाचे म्हणजे कुरूविंद हे खनिज होय. ते कठीण व उच्चतापसह (उच्च तापमानास न वितळणारे) असते. त्याचे कण चिवट असतात व दाब पडल्यावर हळूहळू भंग पावतात. म्हणून एमरीचा कठीणपणा व कापण्याची शक्ती ही तिच्यात किती कुरूविंद आहे, यावर अवलंबून असतात. सामान्यत: एमरीची कठिनता सु. ८ मोस असते [→कठिनता].

ग्रीस, तुर्कस्तान व अमेरिका या देशांतील एमरी बाजारात येते. त्यांपैकी ग्रीसची एमरी सर्वांत कठीण व तुर्कस्तानची तिच्या खालोखाल असते. अमेरिकेतील एमरी बरीच नरम असते. एमरीची चाके करून ती घासण्याच्या व धार लावण्याच्या कामांसाठी वापरली जातात. तिचे सुटे कण किंवा तिच्या कणांचा लेप चिकटवून तयार केलेले कागद व कापड हीसुद्धा अपघर्षक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

यंत्रसामग्री व शस्त्रास्त्रे बनविताना अपघर्षक म्हणून एमरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण अलीकडे कृत्रिम अपघर्षक मिळू लागल्यापासून तो कमी होऊ लागला आहे.

पहा : अपघर्षक.

कानिटकर, बा. मो.