खनिज लोकर : ज्यांच्या तंतूंचे पुंजके लोकरीसारखे किंवा कापसासारखे दिसतात, अशा काचमय पदार्थांना खनिज लोकर म्हणतात. खनिज लोकर ज्यापासून बनविली असेल त्यानुसार तिचे धातुमळी लोकर, दगडी लोकर, सिलिकेटी व काच लोकर असे प्रकार होतात. खनिज लोकरीला खनिज किंवा सिलिकेटी कापूस ही नावेही आहेत.

नैसर्गिक खनिज लोकर प्रथम हवाई बेटांतील किलाउआ नावाच्या ज्वालामुखी विवरात १८३६ साली आढळली. येथे तिला पेलेचे (ज्वालामुखीदेवतेचे) केस म्हणतात. ज्वालामुखीतून हवेत फेकल्या गेलेल्या लाव्हा रसाचे घनीभवन (घट्ट) होऊन ती तयार झाली असावी.

लोखंड, तांबे, शिसे, इ. धातूंच्या उत्पादनात जी धातुमळी राहते, तिच्यापासून धातुमळी लोकर प्रथम १८४० साली बनविण्यात आली. वितळविलेल्या धातुमळीच्या प्रवाहातून हवेचा झोत सोडून किंवा उच्च दाबाखाली असलेल्या वाफेच्या साहाय्याने धातुमळी चंद्रकोरीसारख्या छिद्रातून जाऊ दिली म्हणजे धातुमळी लोकर तयार होते. काच तयार करण्यासाठी जो कच्चा माल वापरतात, त्यापासून काच लोकर तयार करतात [→ काच, तंतुरूप]. चुनखडक, सिलिकामय खडक किंवा खनिजांची मिश्रणे यांपासून बनविलेल्या लोकरीला दगडी लोकर म्हणतात. यांशिवाय काही वैशिष्ट्ये असलेले व त्यामुळे काही विशेष कामांकरिता उपयोगी पडणारे प्रकारही माहीत आहेत.

गुणधर्म व उपयोग : खनिज लोकर मऊ, हलकी (घनता ०·०२४ ते ०·०६४ ग्रॅ. / घ.सेंमी.), उष्णता व विजेची मंदवाहक आणि अदाह्य असते. तिचे सूक्ष्म तंतू एकमेकांमध्ये गुंतलेले असल्याने उष्णता, ध्वनितरंग, द्रवातील किंवा वायूतील घन कण इत्यादींना त्यांमधून आरपार जाता येत नाही. म्हणून ती मुख्यत: उष्णतेचे किंवा ध्वनीचे निरोधन करण्यासाठी व गाळण्याचे माध्यम म्हणून वापरली जाते. ती मूळच्या सैलसर रूपात किंवा तक्ते, ठोकळे, चटया, लाद्या, ओतीव वस्तू व कणिदार गोळ्या अशा विविध रूपांत मिळते आणि वापरली जाते. उच्च तापमानाच्या भट्ट्या, वाफेचे नळ, बाष्पित्र (बॉयलर) इत्यादींना उष्णता निरोधनासाठी हिचे आच्छादन वा अस्तर लावतात. थंड प्रदेशात नळातील पाणी गोठून नळ फुटू नये म्हणूनही हिचा नळावर थर देतात. हिच्या अतिसूक्ष्म तंतूंचा मोटरी, विमाने, प्रशीतन (पदार्थ थंड करण्याची क्रिया) वगैरे उद्योगांमध्ये उपयोग होतो. जीव परिरक्षकामध्ये (पाण्यात तरंगण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कड्यामध्ये) भरण द्रव्य म्हणून ही लोकर वापरतात. आवाज घुमू नये म्हणून खोलीच्या किंवा इमारतीच्या भिंती, जमीन व छप्पर यांच्यामध्ये ही लोकर वापरली जाते. जुन्या इमारतींच्या भिंतींमध्येही ही लोकर भरता येते. तसेच हिच्या कणिदार गोळ्या वायवीय (दाबाखालील हवेवर चालणाऱ्या) यंत्राच्या साहाय्याने फेकून भिंतीत घातल्या जातात. शिवाय उष्णतारोधक सिमेंट, द्रायूंच्या (द्रव व वायू यांच्या) गाळण्या इत्यादींमध्ये योग्य त्या प्रकारच्या खनिज लोकरीचा वापर करण्यात येतो.

ठाकूर, अ. ना.