मिश्र विवाह : परंपरेने अंतर्विवाही असणाऱ्या दोन गटांतील व्यक्तींनी एकत्र येऊन केलेल्या विवाहास मिश्रविवाह म्हणता येईल. सर्व समाजांमध्ये स्वतःचे वेगळेपण टिकविण्याची जी प्रवृत्ती असते त्यानुसार मिश्रविवाहांना सर्वच पारंपरिक रूढिप्रिय समाजांमध्ये विरोध केला जात असे. मिश्रविवाही जोडपे व त्यांची अपत्ये समाजबहिष्कृत केली जात असत. साधारणतः भिन्न वंशांच्या, भिन्न धर्मांच्या व भिन्न राष्ट्रांच्या सदस्यांमधील विवाह हा मिश्रविवाह म्हणून जगभर ओळखला जातो व प्रत्येक समाजात अजूनही कमीअधिक प्रमाणात त्याला विरोध होत असतो. भारतामध्ये याच्या भरीला भिन्न धर्मपंथ, भिन्न जाती व उपजाती, भिन्न प्रांतांमधील सदस्यांच्या विवाहालाही मिश्रविवाह मानले जाते.

भारतातील प्राचीन हिंदू वाङ्‌मयामध्ये भिन्न वर्णांतील व्यक्तींच्या विवाहास ‘वर्णसंकर’ संज्ञा असून हा मिश्रविवाहाचाच प्रकार होता. भगवद्‌गीतेमध्ये ‘वर्णसंकरामुळे संस्कृतीचा नाश होतो’ असे सांगितले आहे. समाजात प्रतिलोम वर्णसंकर अजिबात मान्य नव्हता. अनुलोम वर्णसंकर जरी तत्त्वतः मान्य असला, तरी त्यापासून होणाऱ्या अपत्यांना कुटुंबात आणि समाजात दुय्यम स्थान दिलेले मनुस्मृति व इतर ग्रंथांमध्ये आढळून येते.

ब्रिटिशांच्या आगमनानंतर १८७२ मध्ये ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’ ने मिश्रविवाहाला परवानगी दिली. १९४९ च्या ‘हिंदू मॅरेजिस व्हॅलिडिटी ॲक्ट’ ने, इतर कारणांनी वैध असलेला विवाह हा, जोडीदार वेगवेगळ्या धर्म, जात किंवा पंथ-उपपंथाचे आहेत एवढ्याच कारणावरून अवैध ठरविता येणार नाही अशी तरतूद करून मिश्रविवाहाच्या मार्गातील सर्व अडथळे काढून टाकले आहेत. ‘हिंदू मॅरेज ॲक्ट’व वर नमूद केलेले कायदे यान्वये, रूढी वा धर्मग्रंथांप्रमाणे विवाहाबाबत असलेले नियम गौण ठरविण्यात आले आहेत. विवाह करणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीचा धर्माच्या, जातीच्या वा पंथाच्या रूढीप्रमाणे झालेला विवाह कायदेशीर समजला जातो.

कायदे अनुकूल असले, तरी भारतातील जातिव्यवस्था प्रभावी असल्याने मिश्रविवाहांचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. मात्र नागरीकरण, स्त्रियांचे उच्च शिक्षण, स्त्रियांचे अर्थार्जन, सामाजिक गतिशीलता, संपर्कसाधनांचा वाढता वापर, धर्माचा घटता प्रभाव आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी मूल्यांचा प्रसार हे सर्व घटक मिश्रविवाहास अनुकूल आहेत व त्यांचा प्रभाव जसाजसा वाढत जाईल तसतशी विवाहावरील जाति-धर्म-प्रांत-भाषा ही बंधने कमी होतील अशी अपेक्षा आहे. मिश्रविवाहामुळे स्त्रीपुरुष समानता, हुंडाबंदी, जातिनिरपेक्षता यांसारख्या आधुनिकतेच्या घटकांना चालना मिळेल असा समाजशास्त्रज्ञांना विश्वास वाटतो. सहाव्या पंचवार्षिक योजनेत मागासवर्गातील व्यक्तींमध्ये मिश्रविवाहाला उत्तेजन देण्यासाठी आर्थिक अनुदान योजना मान्य करून त्यासाठी तरतूद केलेली आहे.

मिश्रविवाहात भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमीतील व्यक्ती एकत्र येत असल्याने विवाहाची स्थिरता कमी असते. ज्या ज्या समाजामध्ये मिश्रविवाहांचे प्रमाण वाढत गेलेले आढळते त्या त्या समाजांमध्ये घटस्फोटांचे प्रमाणही वाढत गेलेले आढळते. भारतात अजून तरी दोहोंचे प्रमाण अत्यल्प असल्याने व परित्यागाचे प्रमाण पुष्कळ असल्याने निश्चित व विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध नाही.

पहा : विवाहसंस्था.

संदर्भ : Kapadia, K. M. Marriage and Family in India, Calcutta, 1966.

गोरे, सुधांशू