वंशविच्छेद: आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बुद्धिपुरस्पर एखाद्या विशिष्ट मानववंशाच्या, संस्कृतीच्या व धर्माच्या समूहास राजकीय लष्करी दृष्ट्या प्रबळ असलेल्या दुसऱ्या ज्ञाति-समूहाने पद्धतीशीर रीत्या समूळ वा अंशतः नष्ट करण्याचा प्रयत्न. ‘जेनसाइड’ या इंग्रजी संज्ञेचा ‘वंशविच्छेद’ हा मराठी प्रतिशब्द असून हा शब्द दुसऱ्या महायुद्धकाळात १९४४ मध्ये प्रथम वरील अर्थाने वापरण्यात आला. ग्रीक भाषेत ‘जेनॉस’ म्हणजे ‘वंश’ किंवा ‘जमात’ व लॅटिन भाषेत साइडे (Cide) म्हणजे ‘मारणे’ या दोन शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे. अशा प्रकारचा गुन्हा केल्याची अनेक गतकालीन उदाहरणे आहेत. भिन्न मानववंशांच्या, संस्कृतींच्या परंतु राजकीय अगर सांख्यिकीय आणि लष्करी दृष्टींनी कमकुवत असलेल्या एखाद्या जमातीमुळे आपले राजकीय-आर्थिक नुकसान गतकाळात झाले अगर भावी काळात होईल, असे गृहीत धरून एखाद्या जमातीचे उच्चटन अगर त्या जमातीच्या लोकांची हत्या केल्याची उदाहरणे इतिहासात अनेक सापडतात.

उत्तर अमेरिकेतील मूळ निवासी रेड इंडियनांच्या बाबतीत सुरुवातीच्या गौरवर्णीय वसाहतवाद्यांचे धोरणही अशाच प्रकारचे होते. गौरवर्णियांच्या संपर्कात आलेले तद्देशीय मूळ निवासी हे क्षय, देवी आणि उपदंशासारख्या गुप्त रोगाच्या फैलावाने मरण पावले तसेच वसाहतवाद्यांनी अधिकाधिक प्रदेश वस्तीकरिता व्यापल्यामुळे अन्नधान्य व पाणी यांचा तुटवडा निर्माण होऊन कमीअधिक प्रमाणात नष्ट झाले. काही वेळा मूळ निवासी जमातींमध्ये दुःसाध्य रोग पसरावेत म्हणून हेतुपुरस्पर प्रयत्न करण्यात येत. दक्षिण ऑस्ट्रेलियातील टास्मानिया बेटावरील आदिवासींची तेथे वसाहतीकरिता गेलेल्या इंग्रजांनी अक्षरश: करमणूक आणि पाळीव कुत्र्यांचे खाद्य म्हणून शिकार केली. न्यूझीलंडमधील मूळ निवासी माओरींना गौरवर्णियांनी विसाव्या शतकात काही प्रमाणात सामावून घेतले आहे तथापि गौरवर्णियांच्या वंशविच्छेदाच्या धोरणामुळे त्यांची १८०० मध्ये असणारी दोन लाख लोकसंख्या शंभर वर्षांत (१८९७) चाळीस हजारांपर्यंत घटली होती. अमेरिकेतील रेड इंडियनांची संख्या सुरुवातीस १५ ते २० लाखांपर्य़ंत होती. ती घटून चार लाखांवर आली. त्याचप्रमाणे हवाई बेटावर १७७८ मध्ये सु. तीन लाख मूळ निवासी होते परंतु १८७२ मध्ये त्यांची संख्या ५७ हजारापर्यंत घटली. यावरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या होणाऱ्या वंशविच्छेदाची कल्पना येते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, विशेषतः १९३३ ते १९४५ यांदरम्यान, जर्मनीतील नाझी राजवटीने पद्धतशीर रीत्या यूरोपीय यहुदींची (ज्यूंची) वंशश्रेष्ठत्वाच्या तत्त्वावर निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात ४० ते ५० लाख यहुदी मारले गेले असवावेत असे तज्ञांचे मत आहे. जित राष्ट्रांना नाझी पक्ष व तत्कालीन जर्मन अधिकारी यांवर ज्यूंचे हत्याकांड, वंशविच्छेद वगैरे आरोप ठेवून आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायाधिकरणासमोर खटले भरले.आंतरराष्ट्रीय कायद्यान्वये एखाद्या ज्ञातीविरुद्ध आक्रमक युद्ध हा भीषण गुन्हा आहे, असा निर्णय देऊन या न्यायाधिकरणाने सदसद्वविवेकास न्यायाचे अधिष्ठान दिले. न्यूरेंबर्ग खटल्यांतील निर्णयांच्या प्रभावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या संदर्भात एक ठराव संमत केला. पुढे १९५१ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कायद्याखाली हा गुन्हा ठरविला. हा कायदा घडविण्यात रॅफेल लेमकिन (१९००–५९) या पोलिश विधिज्ञाचा सिंहाचा वाटा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या करारात (कन्व्हेन्शन्मध्ये) राष्ट्रीय, वांशिक, जातीय वा धार्मिक समूहाबद्दल पुढील कृत्ये केल्यास तो वंशविच्छेदाचा गुन्हा समजण्यात यावा, असे नमूद केले आहे. या कृत्यांत वरील समूहातील (१) सर्व सदस्यांना ठार मारणे, (२) त्यांचा गंभीर रीत्या मानसिक वा शारीरिक छळ करणे, (३) समूहाच्या जीवन पद्धतीवर बुद्धिपुरस्पर जाचक अटी लादून त्याच्या सर्वनाशास कारणीभूत ठरणे, (४) सभासदांवर संतती प्रतिबंधाचे निर्बंध लादणे, (५) एका समूहातील लहान मुले सक्तीने दुसऱ्या समूहात घालणे इ. प्रमुख कृत्ये आहेत. १९७० मध्ये ह्या करारावर सु. ७४ देशांनी सह्या केल्या. अमेरिकेने सही केली असली, तरी पूर्ण मंजुर दिलेली नाही. तरीसुद्धा १९६५ साली इंडोनेशियात सत्ता हस्तगत करण्याचा साम्यवाद्यांचा प्रयत्न फसल्यानंतर झालेली त्यांची हत्या आणि १९६६ साली आफ्रिका खंडातील नायजेरियात झालेली इबो जमातीच्या काही लोकांची हत्या हीसुद्धा वंशविच्छेदाचीच विसाव्या शतकातील काही उदाहरणे होत.

संदर्भ: 1. Drost, P. N. Genocide, New York, 1959.

          2. Robinson, Nehemiah, The Genocide Convention, London, 1960.

कुलकर्णी, मा. गु.