जोहार : १. अभिवादन, २. अग्नीमध्ये देह समर्पण करणे किंवा स्वतःचा देहान्त करणे. महाराष्ट्रातील महार जमातीत अनेक शतके जोहार हा शब्द उच्चारून वरिष्ठांना अभिवादन करण्याची प्रथा आहे. एकनाथांच्या भारूडात तशा अर्थी हा शब्द वापरला आहे. अग्नीमध्ये देहसमर्पण करण्याची वीरजमातीतील प्रथा राजस्थानात होती ती अशी : देशावर परकीय आक्रमण झाले आणि त्यात पराभव अटळ ठरला, की राजपूत स्त्रिया शत्रूच्या हाती सापडून आपली विटंबना होऊ नये, म्हणून सामुदायिक रीत्या अग्निप्रवेश करून देहत्याग करीत व रजपुत योद्धे केशरी पोषाख परिधान करून शत्रूवर तुटून पडत व रणांगणावर वीरमरण पतकरीत. असे जोहार राजपुतांच्या इतिहासात अनेकवार घडले आहेत, त्यांपैकी पद्मिनीचा जोहार प्रसिद्धच आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री