मातृसत्ताक कुटुंबपद्धति : कुटुंबातील व्यक्ती, मालमत्ता आणि व्यवहार यांच्यावर मातेची किंवा वडिलधाऱ्या स्त्रीची अधिसत्ता चालते, अशा व्यवस्थेस मातृसत्ताक कुटुंबपद्धती असे म्हटले जाते. जगातील काही आदिवासी जमातींमध्ये ही पद्धती आढळते. मानवाच्या अप्रगत भटक्या अवस्थेमध्ये अपत्यप्राप्तीतील पित्याची भूमिका निश्चित माहीत नसल्याने अपत्ये ‘मातेची’ मानली जात असत तसेच पुरुष शिकारीसाठी निवासस्थानापासून दूर जात असे. त्यामुळे निवासस्थाने व तेथील थोडीफार मालमत्ता हीही स्त्रीची मानली जात असे आणि त्यातूनच मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचा उगम झाला असे बॅकोफेन, कलर, स्पेन्सर, टायलर, मॉर्गन इ. मानवशास्त्रज्ञांचे मत आहे.

या व्यवस्थेमध्ये कुटुंबाची वंशपरंपरा, कुलनाम व गोत्रनाम मातेकडून अपत्यांना प्राप्त होते. मालमत्ता स्त्रीची मानली जाते आणि तिच्या मुली ह्या तिच्या वारसदार मानल्या जातात. धार्मिक कार्यामध्ये गृहप्रमुख या नात्याने स्त्रियांना प्राधान्य असते. विवाहानंतर वधू आपल्या मातेच्याच घरी रहाते. गरजेनुसार वर तिच्याकडे रहावयास जातो. काही जमातींमध्ये वधू-वर वराच्या मामाच्या घरी (म्हणजेच मातेच्या नातेवाईकांकडे) रहावयास जातात. काही ठिकाणी पुरुषाला स्वकष्टाने मालमत्ता जमवण्यास परवानगी असली, तरी ती पितृसत्ताक पद्धतीने त्याच्या अपत्यांना मिळत नाही तर ती त्याच्या भाच्यांकडे वारसाहक्काने जाते.

ही पद्धती असणाऱ्या जमातींमध्ये विवाहप्रसंगी वधूमूल्य देण्याची प्रथा बहुधा आढळते. घटस्फोट सुलभ असतो. पती व पत्नी दोघेही घटस्फोट मागू शकतात. विधवा व घटस्फोटित स्त्रियांना पुनर्विवाहास मोकळीक असते. अनेक जमातींमध्ये अभ्रातृकबहुपतिकत्वाची चाल असते. बहुपत्नीकत्व क्वचितच असते व असले तरी भगिनीबहुपत्नीकत्व (सोरोराइट्स) असते. अशा जमातींमधील दैवतांमध्ये स्त्री-दैवते प्रमुख असतात आणि पुराणकथांमध्ये स्त्रियांच्या शौर्याच्या व मोठेपणाच्या कथा असतात.

पितृसत्ताक पद्धतीत स्त्रीचे स्थान जितके गौण असते, तेवढे मातृसत्ताक पद्धतीत पुरुषांचे स्थान गौण नसते. घरातील कामे स्त्रीयांकडे व बाहेरील कामे पुरुषांकडे असे साधे श्रमविभाजन असते आणि कुटुंबप्रमुख जरी स्त्री असली, तरी तिचा भाऊ किंवा क्वचित मुलगा कार्यकारी प्रमुखाची भूमिका बजावतो. गोत्रप्रमुखही स्त्रीच असते पण प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडणारा तिचा भाऊ असतो. अशा तऱ्हेने बहिणीचा प्रतिनिधी म्हणून दैनंदिन व नैमित्तिक व्यवहारात पुरुषाला अनेक अधिकार व स्वातंत्र्य असते फक्त त्याचे मत निर्णायक नसते.

जेव्हा अशा मातृसत्ताक जमाती स्थिर होऊन शेती, मासेमारी असे अतिरिक्त उत्पन्नाचे व्यवसाय स्वीकारतात किंवा त्यांच्यावर वारंवार आक्रमणे होऊन त्यांना युद्धे करावी लागतात किंवा दुसऱ्या एखाद्या पितृसत्ताक संस्कृतीशी त्यांचा संपर्क प्रस्थापित होतो, अशा वेळी तेथील पारंपारिक मातृसत्ताक पद्धतीचा ऱ्हास होतो. कारण या सर्व प्रकारच्या बदलांमुळे पुरुषांचे महत्त्व वाढते आणि ते वर्चस्व गाजवू लागतात. कालांतराने तेथे पुरुषांना समान अथवा श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होते.

आर्यांच्या आगमनापूर्वी भारतामध्ये राहणाऱ्या सिंधू संस्कृती व अन्य द्राविडी जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती होती असे मानणारा श्मिट, कोपार्स, मार्शल, मेंगीन इ. मानवशास्त्रज्ञांचा मोठा वर्ग आहे. वेदोत्तर वाङ्‌मयामध्ये मातृसत्तासूचक काही कथाभाग आढळतात तथापि आर्यांच्या आगमनानंतर पितृसत्ताक पद्धतीच प्रभावी ठरली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात ईशान्येस खासी व गारो या जमाती आणि दक्षिणेस तोडा, कादर व नायर हे मातृसत्ताक व्यवस्था पाळणारे होते. परंतु आधुनिक समाजाच्या संपर्कामुळे त्यांच्यात पितृसत्ताक पद्धतीचा हळूहळू शिरकाव होत आहे. ब्रिटिश कायद्याने नायरांमधील बहुपतिकत्वाची चाल बंद केली व त्यांच्या वारसाहक्क कायद्यातही बदल घडवून आणले (१८९६ ते १९४२). त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांच्या मातृसत्ताक पद्धतीलाच धक्का बसला. तोडा जमात आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये टिकवू शकली नाही आणि खासी व गारो या हळूहळू पितृसत्ताक होण्याच्या मार्गावर आहेत कारण भारतीय कायद्यांच्या चौकटीत त्यांना आपले जीवन नव्याने जुळवून घ्यायचे आहे.

संदर्भ : 1. Ehrenfels, O. R. Mother-right in India, Bombay, 1941.

           2. Goode, W. J. World Revolution and Family Patterns, New York, 1963.

           3. Kapadia, K. M. Marriage and Family in India, Calcutta, 1966.

           4. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

           5. Parsons, Talcott, The Family : Its Function and Destiny, New York, 1959.

गोरे, सुधांशू