सारडा, हरबिलास : (३ जून १८६७ – ? १९५५). अग्रगण्य समाजसुधारक. जन्म अजमेर (राजस्थान) येथे. त्यांचे शालेय शिक्षण अजमीर (अजमेर) येथेच झाले. कलकत्ता (कोलकाता) विद्यापीठातून मॅट्रिक (१८८३), तर आग्रा येथील महाविद्यालयातून इंग्रजी हा विषय घेऊन ते बी. ए. झाले (१८८८). बी. ए. च्या परीक्षेत तेव्हाच्या संयुक्त प्रांतात ते पहिले आले होते. अजमीरच्या सरकारी महाविद्यालयात वरिष्ठ अध्यापक (१८८९), जैसलमीर संस्थानच्या महाराजांचे पालक-शिक्षक (१८९२–१९०२) अशा काही नोकऱ्या

त्यांनी केल्या तथापि अजमीर-मारवाड प्रांताच्या न्यायखात्यात त्यांनी मुख्यतः आपली सेवा बजावली. तेथे विविध पदांवर त्यांनी काम केले. १९२४ मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर काही काळ ते जोधपूर संस्थानच्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

लहानपणापासूनच आर्यसमाजी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पुढे आर्य समाजाचे ते सदस्यही झाले (१८८५). तेथून त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. आर्य समाजाच्या स्थानिक, प्रांतीय व अखिल भारतीय स्वरूपाच्या एकूण तीन सभा आहेत. सारडा हे आर्य समाजाच्या अजमीर, राजपुताना आणि मध्य भारताच्या सभेचे अध्यक्ष होते. सदस्य आणि उपाध्यक्ष म्हणून अजमीर नगरपालिकेचीही त्यांनी सेवा केली होती. अजमीर येथील डीएव्ही विद्यालय (दयानंद अँग्लो-वेदिक कॉलेज, लाहोर) आणि परोपकारिणी सभा ह्या संस्थांशी त्यांचा आरंभापासून निकटचा संबंध होता.

अजमीर-मारवाड मतदारसंघातून ते तत्कालीन केंद्रीय विधानसभेत प्रथम निवडून गेले. तेथे त्यांनी समाजसुधारणेचा दृष्टिकोण ठेवून अनेक महत्त्वाची विधेयके मांडली. बालविवाहाला प्रतिबंध करणारे आणि ‘सारडा ॲक्ट’ ह्या नावाने विख्यात झालेले विधेयक हे अशा विधेयकांपैकीच एक होय. ह्या विधेयकाला सनातन्यांचा प्रखर विरोध झाला पण सारडा यांनी खंबीरपणे आणि चिकाटीने हे विधेयक मान्य करून घेतले. विवाहासाठी मुलाचे किमान वय अठरा, तर मुलीचे चौदा असे कायद्याने ठरविले गेले. ह्याच कायद्यात १९७८ मध्ये दुरुस्ती होऊन आज विवाहासाठी मुलीचे किमान वय अठरा, तर मुलाचे एकवीस वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. ‘सारडा ॲक्ट’ अंमलात आला तेव्हाची देशातली सामाजिक परिस्थिती पाहता हा कायदा किती क्रांतिकारक होता, ह्याची कल्पना करता येते.

सारडांना आर्यसमाजप्रणीत हिंदू धर्माचा अत्यंत अभिमान होता. देशाच्या इतिहासाचा–विशेषतः राजस्थानच्या इतिहासाचा–त्यांचा व्यासंग मोठा होता. हिंदू सुपिअरिऑरिटी (१९०६) हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ होय. अजमीर शहराचा इतिहासही त्यांनी लिहिला. त्याचप्रमाणे महाराणा कुंभ, महाराणा संग व रणथंभोरचे हमीर ह्यांची चरित्रे त्यांनी लिहिली (१९१५, १९१८, १९२१). आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या दयानंद सन्मान ग्रंथाचे ते संपादक होते.

ब्रिटिश सरकारने ‘दिवाणबहादूर’ हा किताब त्यांना दिला होता. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे’ ते सदस्य होते. तसेच ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’ (ब्रिटन अँड आयर्लंड) आणि ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी ऑफ लंडन’ ह्या संस्थांचे ते फेलो होते.

कुलकर्णी, अ. र.