मकीव्हर, रॉबर्ट मॉरिसन : (१७ एप्रिल १८८२-१५ जून १९७०). स्कॉटिश-अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, तत्त्वचिंतक आणि मानवतावादी. स्कॉटलंडमधील स्टार्नोवे येथे जन्म. एडिंबरो आणि ऑक्सफर्ड येथून शिक्षण पूर्ण केल्यावर ॲबर्डीन विद्यापीठात समाजशास्त्र व राज्यशास्त्राचे व्याख्याते (१९०७-१५), त्यानंतर टोराँटो (कॅनडा) येथे १९१५-२७ राज्यशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख, नंतर अमेरिकेतील बर्नार्ड विद्यापीठात १९२७-२९ अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९२९ नंतर कोलंबिया विद्यापीठात राजकीय तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विषयांचे ‘लीबर प्रोफेसर’ म्हणून १९५० पर्यंत काम करून ते निवृत्त झाले. याखेरीज १९१७-१८ मध्ये कॅनडातील नॅशनल वॉर लेबर बोर्डाचे उपाध्याक्ष, न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च, न्यूयॉर्क या संस्थेचे अध्यक्ष (१९६२-६५) व नंतर कुलपती (१९६५-६६) ही पदे त्यांनी भूषविली.

त्यांनी १९५० नंतरच्या दोन दशकांमध्ये अनेक संशोधन प्रकल्पांचे संचालक म्हणून काम केले. त्यांपैकी१९५६-६१ या काळातील न्यूयॉर्क शहरातील बालगुन्हेगारीच्या मूल्यमापनाचा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो तसेच ‘सोशल सायन्स रिसर्च कौन्सिल’,‘रसेल सेज फौडेशन’ व ‘नॅशनल मॅनपॉवर कौन्सिल’ या संस्थांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. १९४० साली ते ‘अमेरिकन सोशिऑलॉजिकल सोसायटी’ चे अध्यक्ष होते.

मानवी समाजाची प्राथमिक, समुदायप्रधान अवस्थेकडून गुंतागुंतीच्या, विविध कार्यात्म, व्यक्तिप्रधान बहुविध समाजाच्या अवस्थेकडे उत्क्रांती होत जाते हा विचार त्यांनी प्रामुख्याने पुढे मांडला. त्या अनुषंगाने त्यांनी मूलभूत अशा काही संकल्पनाही स्पष्ट केल्या आणि वापरल्या. सामाजिक हितसंबंधांचे वर्गीकरण, समुदाय (कम्युनिटी) आणि मंडळ (असोसिएशन) यांतील भेद, व्यक्ती व समाज यांतील सुसंवादी संबंधांचा सिद्धांत आणि सामाजिक संस्थांमध्ये सुधारणांशी (सिव्हिलिझेशन) निगडित असणाऱ्या व संस्कृतीशी (कल्चर) निगडितअसणाऱ्या संस्था असा फरक तसेच ‘सुधारणा’ साधनरूपी असून ‘संस्कृती’ साध्यरुपी असते हा विचार हे त्यांचे समाजशास्त्राला महत्त्वाचे योगदान म्हणावे लागेल. त्यांच्या संशोधनामुळे सामाजिक ऐक्याची समस्या, सामाजिक परिवर्तन, विविध सामाजिक संस्थांची कार्ये, व्यक्ती व समाज यांतील परस्परसंबंध, बहुविध समाजाचे स्वरूप यांसारख्या तात्त्विक क्षेत्रांतील अभ्यासाच्या प्रगतीस फार मोठी प्रेरणा मिळाली. सामाजिक घडामोडींची कारणे सामाजिक संबंधांमध्ये शोधली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे आणि त्याआधारे कामगार संबंध, आर्थिक पुनर्रचना, आंतरराष्ट्रीय शांतता, गटागटांतील संघर्ष, धर्म, शैक्षणिक स्वायत्तता, बालगुन्हेगारी, सामाजिक कार्य इ. क्षेत्रांमधील व्यावहारिक समस्या सोडविण्यासही त्यांनी हातभार लावला. राज्यसंस्था ही एक सामाजिक संस्था असून व्यापक सामाजिक मूल्यव्यवस्थेच्या प्रभावाखाली ती असते. तिचा हेतू समाजात सुव्यवस्था राखण्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासास साह्य करणे हाही आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते आणि त्या अनुषंगाने लोकशाही स्वरूपाच्या संस्था आणि प्रक्रिया यांच्या बाबतीत मूलभूत नैतिक, तात्त्विक व समाजशास्त्रीय तत्त्वे सुव्यवस्थितपणे मांडण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

मकीव्हर यांनी समाजशास्त्र व राज्यशास्त्रावर पंचविसावर ग्रंथ लिहिले. त्यांपैकी महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे :कम्युनिटी-ए सोशिऑलॉजिकल स्टडी (१९१७), द एलिमेंट्स ऑफ सोशल सायन्स (१९२१), द मॉडर्न स्टेट (१९२६), सोसायटी : इट्स स्ट्रक्चर अँड चेंजेस (१९३१), सोशल कॉझेशन (१९४२, ६४), द वेब ऑफ गव्हर्नमेंट (१९४७), सोसायटी :ॲन इंट्रॉडक्टरी ॲनालिसिस (१९४९), द ॲकडेमिक फ्रीडम इन अवर टाइम (१९५५) इत्यादी. ए टेल दॅट इज टोल्ड (१९६८) हे त्यांचे आत्मचरित्र आहे.

संदर्भ : 1. Alpert, Harry, Ed, Robert M. MacIver: Teacher and Sociologist, Northampton, Mass., 1953.

            2. Spitz, David, Ed. Freedom and Control in Modern Society (Robert M. Maciver’s  Contribution to Political Theory, pages 293-313), New York, 1964.

भोइटे, उ. बा. कुलकर्णी, मा. गु.