मिल्न, एडवर्ड आर्थर : (१४ फेब्रु. १८९६–२१ सप्टेंबर–१९५०). इंग्रज ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती व विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञ. त्यांनी आइन्स्टाइन यांचा गणितीय क्लिष्ट सापेक्षता सिद्धांत टाळून त्याला पर्यायी ठरू शकेल असा नवीनच गतिकीय सापेक्षता सिद्धांत (आणवीय कालमापनावर आधारलेली तत्त्वमीमांसक प्रणाली) विकसीत केला व त्याचा विश्वोत्पत्तिशास्त्रात वापर केला. त्याचप्रमाणे ग्रह व तारे यांच्या वातावरणांच्या संबंधात त्यांनी महत्त्वाचे संशोधन केलेले आहे.

मिल्न यांचा जन्म किंगस्टन-अपॉन-हल (इंग्लंड) येथे व शिक्षण हायमर्स कॉलेज (हल) व ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. ते केंब्रिज विद्यापीठाचे एम्. ए. १९२० साली व डी. एस्‌सी. १९२५ साली झाले. १९१९ साली ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो झाले. केंब्रिज विद्यापीठात सोलर फिजिक्स ऑब्झर्वेटरीचे सहसंचालक (१९२०–२४) व अनुप्रयुक्त गणिताचे प्राध्यापक (१९२४) होते. १९२९ जानेवारीनंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात ते गणिताचे प्राध्यापक व बॅडहॅम महाविद्यालयाचे फेलो झाले. १९३९–४४ हा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी सोडून शेवटपर्यंत त्यांनी ही दोन्ही पदे सांभाळली.

मिल्न केंब्रिजला असताना पहिले महायुद्ध सुरू होते. दृष्टिदोषामुळे त्यांनी सैन्यात दाखल न होता युद्धसामुग्री संशोधन खात्याच्या विमानविरोधी प्रायोगिक विभागात काम करण्यास सुरुवात केली. या विभागात तोफगोळ्यांचे प्रक्षेपण आणि आवाजाचा पल्ला या विषयांतील प्रश्न हाताळताना पृथ्वीच्या वातावरणाशी संबंध आल्यामुळे वातावरणातील अनेक समस्यांचा त्यांना अभ्यास करावा लागला. अशा प्रकारे पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या ताऱ्यांच्या वातावरणाच्या संशोधनास एक प्रकारे येथेच आरंभ झाला. युद्धकार्याबद्दल त्यांना एम्‌.बी.ई. पदवी बहाल करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत त्यांना केंट येथील तोफखाना संशोधन कार्यालयात काम करावे लागले. तेथेही त्यांना तोफगोळ्यांचे प्रक्षेपण, रॉकेट, आवाजाचा पल्ला, तोफांचे सुयोग्य वितरण इ. युद्धासंबंधी समस्या सोडवाव्या लागल्या. त्यांचे बरेचसे संशोधन युद्धासंबंधीच्या विषयांत असले, तरी खगोलीय भौतिकी व विश्वोत्पत्ती या विषयांतील त्यांच्या कामामुळे ते प्रसिद्धीस आले.

मिल्न यांना असे आढळले की, प्रारणाचे (तरांगरूपी ऊर्जेचे) वातावरणामधून होणारे स्थानांतर व द्रव्यांचे आयनीभवन (विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगट यांमध्ये रूपांतर होण्याची क्रिया) अशा सारख्या ताऱ्यांच्या बाह्य वातावरणाशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार एकत्रितपणे करणे योग्य आहे. यामध्ये मुख्यतः द्रव्य व प्रारण यांमध्ये होणाऱ्या परस्पर क्रियांचा सूक्ष्मपणे विचार करावा लागतो. या दिशेने त्यांनी केलेल्या संशोधनामुळे खगोल भौतिकीविदांना ताऱ्यांच्या वातावरणाच्या अभ्यासाला योग्य अशी सैद्धांतिक बैठक उपलब्ध झाली.

ताऱ्याच्या गर्भात निर्माण झालेली ऊर्जा प्रारणरूपात बाहेर पडताना ताऱ्याच्या वरील स्तरांत गाळली जाते. जे प्रारण बाहेर पडते ते ताऱ्याच्या बाह्य स्तरांच्या तापमान, घनता व रासायनिक घटक यांवर अवलंबून असते. जसजसे केंद्रापासून दूर जावे, तसतसे तापमान, घनता व तेथील वायूची अपारदर्शकता कमी होत जाते व ताऱ्याच्या बाह्य भागी असा एक स्तर येतो की, तो प्रकाशाला पारदर्शक ठरतो. या संक्रमण भागाची जाडी ताऱ्याच्या एकंदर त्रिज्येशी तुलना करता खूपच कमी असते. प्रत्येक स्तरात शोषणापेक्षा उत्सर्जन अधिक प्रभावी असून वरच्या स्तरात शोषण प्रभावी असते. केवळ शोषण व उत्सर्जन यासंबंधी असलेल्या दोन वेगळ्या सिद्धातांचा मिल्न यांनी एकत्रित विचार करून अपारदर्शकता व तापमान यांचा ठोकळमानाने असलेले संबंध स्पष्ट केला. यावरून काढलेले गणितीय समीकरण ‘मिल्न समीकरण’ म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या सिद्धांताचा विस्तार करून त्यांनी ताऱ्यांच्या बिंबाच्या कडेला दिसणारा काळपटपणा का दिसतो, ते स्पष्ट करून त्यासंबंधीचा नियम तयार केला. ह्याचा ताऱ्याच्या प्रकाशाच्या वर्णपटातील ऊर्जेच्या वितरणाशी संबंध असल्याचे दाखवून काळपटपणावरून तापमान ठरविता येते. असे त्यांनी दाखविले. ताऱ्याची अपारदर्शकता व तरंग कंप्रता (एका सेंकदात होणाऱ्या कंपनांची संख्या) यांचा संबंध स्पष्ट केला. यावरून नंतर सूर्याची अपारदर्शकता ऋण हायड्रोजन आयनामुळे असल्याचे दाखविले गेले.

आर्. एच्. फौलर यांच्याबरोबर ताऱ्यांच्या वर्णपटांतील शोषणरेषांच्या विस्ताराचा व तेजाचा त्यांनी विशेष अभ्यास केला. भारतीय शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्या उच्चतापमानात होणाऱ्या आयनीभवनासंबंधीच्या सिद्धांताचा विस्तार करून शोषणरेषेतील महत्तम तीव्रतेचा सिद्धांत मिचेल यांनी मांडला व ज्या स्तरांत प्रकाश शोषण घडते, तेथील वातावरणाचा दाब किती असेल, ते ठरविले. त्याचप्रमाणे वर्णपटांवरून ताऱ्याचे तापमान काढण्याचा नियम शोधला.

ताऱ्यांच्या वातावरणातून निसटून जाणाऱ्या रेणूंसंबंधातही त्यांनी बरेच संशोधन केले. गुरूत्वाकर्षण व प्रारणोप्तन्न दाब व या दोहोंच्या अमंलाखाली समतोलात असणाऱ्या सूर्यावरील वर्णगोलाचा अभ्यास केला. अंतर्भागाच्या प्रारणांत होणाऱ्या फरकामुळे काही प्रसंगी हा समतोल बिघडून सूर्यावरचे अणू सेंकदास सु. १,६०० किमी. वेगाने फेकले जाऊ शकतात, असे त्यांनी दाखविले. मिल्न यांच्या वेगवेगळ्या सिद्धांतावरून चंद्रशेखर यांनी अतिघन पांढऱ्या लघुताऱ्यांविषयीचे स्पष्टीकरण केले. विश्वाचे प्रसरण हे निर्वात प्रदेशात सोडलेल्या वायूच्या ढगाच्या विखुरण्यापेक्षा वेगळे नसावे, अशी त्यांची विचारसरणी होती. मर्यादित सापेक्षता सिद्धांत व भूमितीय अवकाश यांच्या उपयोगाने विश्वोत्पत्तीसंबंधी त्यांनी नवीन सिद्धांत मांडला. विश्वाची अंतरे व गती यांच्या सामान्य गुणोत्तरावरून विश्वाचा काल काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विश्वाच्या सोप्या प्रतिकृतींचे वर्णन करण्यास त्यांनी नवीन गतिकीय सापेक्षता सिद्धांत मांडला पण त्यांच्या पश्चात मागे पडला.

मिल्न रॉयल सोसायटीचे फेलो (१९२६) तसेच लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीचे (१९३७–३९) व रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे (१९४३–४५) अध्यक्ष होते. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने सुवर्ण पदक (१९३५), रॉयल पदक (१९४१) व ब्रूस पदक (१९४५) देऊन त्यांचा सन्मान केला होता.

अनेक शास्त्रीय नियतकालिकांत त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले असून त्यांची पुढील पुस्तके आहेत : इक्विलिब्रियम ऑफ क्रोमोस्फिअर (१९२४), थर्मोडायनॅमिक्स ऑफ द स्टार्स (१९३०), द व्हाइट ड्‌वॉर्फ स्टार्स (१९३२), रिलेटिव्हिटी, ग्रॅव्हिटेशन अँड वर्ल्ड स्ट्रक्चर (१९३५), फाउंडेशन्स ऑफ डायनॅमिक्स (१९३६), इलेक्ट्रोमॅग्नेटिझम (१९३८), कायनॅमॅटिक रिलेटिव्हिटी (१९४८), व्हेक्टोरिअल मेकॅनिक्स (१९४८), मॉडर्न कॉस्‌मॉलॉजी अँड द ख्रिश्चन आयडिया ऑफ गॉड द क्रिएटर (१९५१), लाइफ ऑफ जेम्स हॉपवुड जीन्स (१९५२) इत्यादी. ते डब्लिन येथे मृत्यू पावले.

नेने, य. रा. ठाकूर. अ. ना.