मिलर हेन्री : (२६ डिसेंबर १८९१–७ जून १९८०) अमेरिकन कादंबरीकार. न्यूयॉर्क शहरी जन्मला. ब्रुकलिनमध्ये तो वाढला. न्युयॉर्कमध्ये थोडेसे शिक्षण त्याने घेतले होते. १९०९ ते १९२४ ह्या कालखंडात विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्यानंतर त्याने लेखनास वाहून घेण्याचा निर्णय घेतला आणि तो पॅरिसला आला. अवघड आर्थिक परिस्थितीत तेथे सु. दहा वर्षे त्याने काढली. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर (प्रकाशित-फ्रान्समध्ये १९३४ अमेरिकते १९६१) ह्या त्याच्या कादंबरीत ह्या दहा वर्षांतील अनुभवांचे प्रतिबिंब पडलेले आहे. लैंगिक अनुभवही अत्यंत मोकळेपणाने सांगण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे ही कादंबरी गाजली तिला अश्लील ठरविण्यात आले. तथापि टी. एस्‌. एलियट, एझरा पाऊंड ह्यांसारख्या साहित्यश्रेष्ठीनी ह्या कादंबरीची प्रशंसा केली. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न (प्रकाशित-फ्रान्समध्ये १९३४ अमेरिकेत १९६१) ही कादंबरीही आत्मचरित्रात्मक आहे. मिलरचे ब्रुकलिनमधील किशोरजीवन तीत आलेले आहे. १९३९ मध्ये मिलरने ग्रीसला भेट दिली. द कलॉसस्‌ ऑफ मॅरोसी ह्या आपल्या पुस्तकात त्याने ह्या प्रवासाचे वर्णन केले आहे. आधुनिक प्रवासवर्णनपर पुस्तकांतील एक उत्कृष्ट पुस्तक म्हणून द क्लॉसस्‌….. ला मान्यता मिळालेली आहे. ११४० मध्ये मिलर अमेरिकेत परतला. त्यानंतर त्याने द एअर कंडिशन्ड नाइटमेअर  (१९४५) आणि रिमेंबर टू रिमेंबर (१९४७) ही दोन पुस्तके लिहून अमेरिकन संस्कृतीवर टीका केली. पुढे द रोझी क्रुसिफिक्शन ही त्याची कादंबरी सेक्सस (१९४९) आणि प्लेक्सस (१९५३) आणि नेक्सस (१९६०) अशा तीन खंडात प्रसिद्ध झाली ह्या कादंबरीच्या अमेरिकन आवृत्तीत हे तिन्ही खंड एकत्रित स्वरूपात आहेत (१९६५). ह्या कादंबरीतही रतिविषयक अनुभव आहेतच. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि द रोझी क्रुसिफिक्शन ह्या कादंबऱ्या अनेक वर्ष अमेरिकेत प्रसिद्ध होऊ शकल्या नव्हत्या.

मिलरच्या अन्य ग्रंथांत द कॉस्मॉलॉजिकल आय (निबंधसंग्रह, १९३९), द विज्डम ऑफ द हार्ट (निबंधसंग्रह, १९४१), द टाइस ऑफ द असॅसिन्स (फ्रेंच कवी अर्त्यूर रॅंबो ह्याच्यावरील-१९५६) ह्यांचा समावेश होतो.

युरोपातील आधुनिक आणि पुरोगामी अशा तरूण लेखकांवर मिलरचा बराच प्रभाव पडलेला दिसतो.

पॅसिफिक पॅलिसेड्‌स (कॅलिफोर्निया) येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Baxter, Annette K. Henry Milier, Expatriate, 1961.

             2. Corle, Edwin, The Smile at the Foot of the Ladder, 1948.

             3. Durrell, Lawrence Perles, Alfred, Art and Outrage : A Correspondence about Henry Miller, 1959.

             4. Gordon, A. W. The Mind and Heart of Henry Miller, 1967.

             5. Kingsley, Widmer, Henry Miller, 1967.

             6. Perles, Alfred My Friend Henry Miller, 1955.

             7. Wickes, George, Ed. Henry Miller and the Critics, 1963.

नाईक, म. कृ.