मिल, जेम्स : (६ एप्रिल १७७३–२३ जून १८३६). स्कॉटिश तत्त्ववेते, इतिहासवेत्ते व अर्थशास्त्रवेत्ते. जेम्स मिल हे आपल्या कालखंडात उपयुक्ततावाद (युटिलिटेरिॲनिझम) ह्या विचारपंथाचे एक प्रमुख पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध होते. ‘तत्त्वज्ञानात्मक जहालवाद’ (फिलॉसॉफिकल रॅडिकॅलिझम) हे ह्या विचारपंथाचे पर्यायी नाव. ⇨ जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२) हे ह्या विचारसरणीचे प्रवर्तक होते आणि तिचा प्रसार करण्याच्या आणि तिला मान्यता प्राप्त करून देण्याच्या कार्यात जेम्स मिल हे बेथॅम ह्यांचे एक प्रभावी सहकारी म्हणून ओळखले जात होते. ह्या आपल्या जीवितकार्याला अनुलक्षून तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राजकीय व सामाजिक धोरणे ह्या क्षेत्रांतील समस्यांवर जेम्स मिल ह्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ⇨ जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–७३) हे प्रसिद्ध अनुभववादी तत्त्ववेत्ते, अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक व राजकीय विचावंत हे जेम्स मिल ह्यांचे पुत्र होत.
जेम्स मिल ह्यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये फॉरफरजवळील एका खेड्यात झाला आणि उच्च शिक्षण एडिंबरो विद्यापीठात झाले. तेथे ग्रीक भाषेचे उत्तम अभ्यासक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. काही काळ प्रेसबिटेरिअन पंथाचे धर्मगुरू म्हणून काम केल्यानंतर ते इतिहास व तत्त्वज्ञान ह्यांच्या अभ्यासाकडे वळले. नियतकालिकांत लेखन करून उपजीविका करण्याच्या इराद्याने ते १८०२ मध्ये लंडनला आले व तेथे स्थायिक झाले.
अँटी-जॅकोविन रिव्ह्यू, द ब्रिटिश रिव्ह्यू, द एडिंबरो रिव्ह्यू ह्या त्या काळी प्रसिद्ध असलेल्या वैचारिक नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केले. १८११ मध्ये द फिलॅन्थ्रॉपिस्ट ह्या नियतकालिकाच्या संपादनातही त्यांनी भाग घेतला. राज्यशास्त्र व प्रचलित राजकारण, कायदे, शिक्षण, आर्थिक धोरण हे त्यांच्या लिखाणाचे मध्यवर्ती विषय होते. लंडनला आल्यानंतर जेरेमी बेंथॅम ह्यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि बेंथॅम ह्यांचे सिद्धांत त्यांनी पूर्णतया स्वीकारले. जेम्स मिल ह्यांनी आपल्या कसदार लेखनाने ह्या सिद्धांतांना सुशिक्षित वर्गात व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी आणि पाठिंबा मिळवून दिला. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ह्या कोशाच्या त्या काळच्या आवृत्त्यांतही त्यांनी वरील विषयांवर लेख लिहिले आणि तेही अतिशय प्रभावी ठरले. वेस्टमिन्स्टर रिव्ह्यु ह्या १८२४ मध्ये बेंथॅम यांनी उपयुक्ततावादाचा पुरस्कार करण्यासाठी सुरू केलेल्या नियतकालिकात त्यांचे लेख नेमाने प्रसिद्ध होत असत १८३२ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मताधिकार अधिक व्यापक करणारा आणि निवडणुकीच्या पद्धतीत सुधारणा करणारा जो कायदा-पहिले रिफॉर्म बिल पास केला त्याला अनुकूल असे लोकमत निर्माण करण्यात जेम्स मिल ह्यांच्या वरील लिखाणाचा मोठाच वाट होता.
जेम्स मिल ह्यांनी १८०६ मध्ये हिस्टरी ऑफ ब्रिटिश इन्डिया (म. शी. ब्रिटिश भारताचा इतिहास) ह्या आपल्या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या लेखनाला प्रारंभ केला व तो १८१७ मध्ये प्रसिद्ध केला. भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा आणि विस्ताराचा हा पहिला इतिहास होय. ह्या सत्तासंपादनासाठी ज्या पद्धतींचा अवलंब करण्यात आला होता आणि ज्या प्रकारची शासनव्यवस्था रूढ करण्यात आली होती त्यांच्यावर ह्या ग्रंथात जरी खरमरीत टीका करण्यात आली होती, तरी ह्या ग्रंथामुळे जेम्स मिल ह्यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या मध्यवर्ती कार्यालयात-इंडिया हाऊसमध्ये नेमणूक करण्यात आली आणि १८३० मध्ये ते आपल्या खात्याचे प्रमुख बनले. तत्कालीन भारतीय ब्रिटिश राजवटीतील दोषांचे जे दिग्दर्शन ह्या ग्रंथात करण्यात आले होते. त्यांच्यामुळे व जेम्स मिल ह्यांच्या इंडिया हाऊसमधील १७ वर्षाच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश राजवटीतील दोषांचे जे दिग्दर्शन ह्या ग्रंथात करण्यात आले होते त्याच्यामुळे व जेम्स मिल ह्यांच्या इंडिया हाऊसमधील १७ वर्षांच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश शासनसंस्थेत बरीच सुधारणा घडून आली.
१८२१ मध्ये एलिमेन्ट्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (म. शी. अर्थशास्त्राची प्राथमिक तत्त्वे) हा त्यांचा अर्थशास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्यांतील सिद्धांत प्रामुख्याने ⇨ डेव्हिड रिकार्डो (१७७२–१८२३) ह्या अर्थशास्त्राज्ञाच्या उपपत्तीवर श्रमसिद्धांताचा त्यांनी पुरस्कार केला आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे कोणत्याही वस्तूचे मूल्य हे ती वस्तू निर्माण करण्यात जेवढे मानवी श्रम खर्ची पडले असतील त्यामुळे निश्चित होत असते. पुढे ⇨ कार्ल मार्क्स (१८१८–८३) ह्यांनीही मूल्याच्या श्रमसिद्धांतावर आपल्या अर्थशास्त्राची उभारणी केली हे प्रसिद्धच आहे. जेम्स मिल ह्यांच्या मताप्रमाणे अर्थशास्त्रातील प्रमुख समस्या लोकसंख्येच्या वाढीमुळे निर्माण होते. कारण ज्या वेगाने लोकसंख्या वाढते त्या वेगाने समाजात संचित भांडवल वाढत नाही.
राज्यशास्त्रात, प्रत्येक माणसाला काही विशिष्ट हक्क, ‘नैसर्गिक हक्क’ म्हणून प्राप्त झालेले असतात आणि म्हणून सर्व माणसे समान असतात ह्या सिद्धांताला विरोध केला. हा सिद्धांत पायाभूत मानून त्यावर राजव्यवस्था उभारण्याऐवजी, आपापल्या वृत्तीला आणि मतांना अनुसरून जगण्यासाठी नागरिकांना सुरक्षितता प्राप्त करून देणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यव्यवस्थेची आखणी केली पाहिजे ह्या मताचे त्यांनी समर्थने केले. अशी राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त व्यापक केला पाहीजे, हा विचारही त्यांनी आग्रहाने मांडला.
मानसशास्त्र आणि ज्ञानशास्त्र त्यांनी ⇨ साहचर्यवादाचा पुरस्कार केला. त्यांचा ॲनॅलिसिस ऑफ द फिनॉमेना ऑफ द ह्यूमन माइंड (१८२९) हा ग्रंथ प्रसिद्ध असून त्यात त्यांनी पुढील विचार मांडले : आपल्याला लाभणाऱ्या संवेदना ह्या मूळ मानसिक घटना होत. अनेक संवेदना जेव्हा सातत्याने एकाकालीच प्राप्त होतात, तेव्हा परस्परांमध्ये साहचर्य प्रस्थापित होते आणि त्यांतील एक प्राप्त झाली असताना ह्या इतर सहचारी संवेदना कल्पनांच्या स्वरूपात मनात जागृत होतात. कल्पनांचे हे पुंजके म्हणजे विशिष्ट वस्तूविषयीच्या उदा. एक मांजर, एक टेबल इ. कल्पना होत. सातत्याने एकाकाळी लाभणाऱ्या संवेदनांमध्ये ज्याप्रमाणे साहचर्य निर्माण होते त्याप्रमाणे सातत्याने एकामागून दुसरी अशा रीतीने प्राप्त होणाऱ्या संवेदनांमध्येही साहचर्य प्रस्थापित होते. सर्व मानसिक घटना त्यांच्यामधील साहचर्य ह्यांच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण संवेदना आणि त्यांच्यामधील साहचर्य ह्यांच्या साहाय्याने करता येते असे दाखवून देण्याचा मिल ह्यांनी प्रयत्न केला. उदा.,’गुलाबाचे फूल सुवासिक असते’ ह्या विश्वासाचा अर्थ असा, की गुलाब, फूल हे कल्पनापुंज आणि सुवास ही कल्पना ह्यांचे परस्परसाहचर्य आपल्या मनात निर्माण झालेले असते. संवेदनाप्रमाणे भावभावना आणि सुखदुःख ह्यांच्यातही परस्परांशी किंवा संवेदनांशी साहचर्य निर्माण होऊ शकते. उदा., कुणीही माणूस मूलतः स्वतःचे सुख साधण्यासाठी कृत्ये करीत असतो. पण त्याचे स्वतःचे सुख आणि इतरांचे सुख ह्यांत साहचर्य प्रस्थापित झाल्यामुळे तो स्वाभाविकपणे इतरांचेही सुख, स्वतःच्या सुखाप्रमाणेच, साधण्याचा प्रयत्न करू लागतो.
जेम्स मिल ह्यांचा शिक्षणविषयक विचारही मानसशास्त्रीय साहचर्यवादावर आधारलेला आहे. व्यक्तीचे स्वतःचे आणि समाजाचे म्हणजे इतर व्यक्तींचे सुख ज्यांच्या योगे वृद्धिंगत होईल अशी साहचर्ये व्यक्तिच्या मनात प्रस्थापित करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. तेव्हा शिक्षण हे केवळ बौद्धिक असता कामा नये. ते भावनिक, नैतिक आणि शारीरिकही असले पाहिजे असा त्यांचा दृष्टीकोन होता. आपला मुलगा जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्याचे शिक्षण जेम्स ह्यांनी स्वतः केले त्याचे जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्यांनी आपल्या आत्मचरित्रात (ऑटोबायॉग्राफी, १८७३) केलेले वर्णन व विश्लेषण प्रसिद्ध आहे.
संदर्भ 1. Bain, Alexander, James Mill, London, 1882.
2. Halevy, Elie Trans. Morris, Mary, The Growth of Philosophical Radicalism, London, 1982.
रेगे, मे. पुं.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..