मिरजोळी : (पीलू, पिलू, खाकण हिं. छोटा पीलू, खरजाल गु. खारीजार, पिलुडी क. गोणीमर सं. पीलु, गुडफल, बृहत् मधु, महाफल इं. टुथब्रश ट्री, मस्टर्ड ट्री लॅ. सॅल्व्हॅडोरा पर्सिका कुल-सॅल्व्हॅडोरेसी). हा सदापर्णी लहान वृक्ष रुक्ष ठिकाणी आणि बहुधा खाऱ्या जमिनीत किंवा समुद्रकाठी असलेल्या जंगलात आढळतो. याच्या प्रजातीतील (सॅल्व्हॅडोरा) फक्त दोनच जाती भारतात आढळतात ही त्यांपैकी एक असून ⇨ किंकानेला ही दुसरी जाती आहे. भारत, श्रीलंका, पाकिस्तान (सिंध), ईजिप्त, ॲबिसिनिया, प. आशिया इ. ठिकाणी मिरजोळीचा प्रसार आहे. भारतात (महाराष्ट्रात ठाणे, रत्नागिरी येथे, गुजरातेत बलसाड, अंकलेश्वर येथे व कर्नाटकात विजापूर, धारवाड, कारवार येथे) अनेक ठिकाणी हा वृक्ष सापडतो. याची लागवड उ. भारतात व इराणात केली जाते. या झाडास अनेक लोंबत्या, पांढरट, गुळगुळीत फांद्या असतात. खोडाची साल खरबरीत आणि भेगाळ असते. पाने साधी, विविध आकाराची (१·८ सेंमी. रुंद) व साधारण मांसल असतात पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांकडे परिमंजरी [⟶ पुष्पबंध] प्रकारचा फुलोरा असून त्यावर नोव्हेंबर ते फेब्रुवारीत हिरवट पिवळी व देठ असलेली लहान फुले येतात. पातळ पुष्पमुकुट घंटेसारखा असून केसरदले खाली त्यास चिकटलेली परंतु वर बाहेर डोकावणारी असतात [⟶ फूल]. आठळी फळे (अश्मगर्भी फळे) फार लहान (०·३ सेंमी. व्यासाची) गोलसर असून पिकल्यावर लाल दिसतात व सतत राहणाऱ्या परिदलांना आधारलेली असतात. बीज एक व गोलसर असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सॅल्व्हॅडोरेसी अगर पीलू कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
मिरजोळीची फळे गोड, भूक वाढविणारी, पित्तप्रकोपाचा नाश करणारी व मूत्रल (लघवी साफ करणारी) असतात. फळांपासून मादक पेय बनवितात. पाने तिखट, दात मजबूत करणारी व संधिवातावर बाहेरून लावण्यास उपयुक्त असतात पानांचा काढा दमा व खोकला यावर देतात. बी मूत्रल व रेचक असते. मुळांची साल तिखट असून बाहेरून लावल्यास क्वचित कातडीवर फोड येतात पण ती चेतना उत्पन्न करते तपकिरीत सालीचे चूर्ण घालतात. मुळे कुटून त्याचा लेप मोहरीच्या लेपाऐवजी लावतात. मुळांचा काढा परम्यावर देतात. मुळांच्या सालीचा काढा पौष्टिक मानला असून तो उत्तेजक व आर्तवदोषांवर (मासिक पाळीच्या दोषांवर) देतात. पाने उंटांचे आवडते खाद्य असून मनुष्यांनाही मोहरीच्या भाजीप्रमाणे खाद्य आहेत. त्यामुळे या झाडाला ‘मस्टर्ड ट्री ऑफ स्क्रिप्चर्स’ म्हणतात.
मिरजोळीची नवीन लागवड बियांपासून करतात व ती निसर्गतः होते. तसेच खोड कापून राहिलेल्या खुंटापासून हिचे ⇨ पुनर्जनन होते. कुंपणाच्या कडेने लावल्यास त्यामुळे उद्यानातील किंवा शेतातील इतर झाडांचे वाऱ्यापासून संरक्षण होते. मिरजोळीचे लाकूड नरम, पांढरे असून रंधून व घासून त्याला चांगली झिलई होते. त्याला वाळवीचा उपद्रव होत नाही ईजिप्शियन लोक प्रेते ठेवण्याकरिता त्याच्या पेट्या करतात. अथर्वसंहिता, पाणिनींची अष्टाध्यायी, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन संस्कृत ग्रंथांत पीलू नावाने हिचा उल्लेख झाला आहे.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972. २. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.
नवलकर, भो. सुं. परांडेकर, शं. आ.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..