मिचर्लिख, आइलहार्ट: (७ जानेवारी १७९४–२८ ऑगस्ट १८८३). जर्मन रसायनशास्त्र आणि खनिजवैज्ञानिक. ⇨ समरूपतेच्या नियमांबद्दल, तसेच कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्रातील शोधांबद्दल प्रसिद्ध.

मिचर्लिख यांचा जन्म नेउएंडे (ओल्डेनबर्ग, प. जर्मनी) येथे व प्राथमिक शिक्षण येव्हर येथे झाले. हायडल्‌बर्ग (१८११) व पॅरिस (१८१३) विद्यापीठांत त्यांनी प्राच्य भाषांचे, विशेषतः फार्सी भाषेचे, सखोल अध्ययन केले. १८१७ मध्ये ते गटिंगेन विद्यापीठांत दाखल झाले. तेथे त्यांनी फार्सी भाषेची डॉक्टरेट पदवी संपादन केली व त्याच वेळी वैद्यक व विज्ञान यांचाही अभ्यास केला. शिवाय तेथे त्यांनी एफ्. स्ट्रोमायर यांच्या हाताखाली रसायनशास्त्राचेही अध्ययन केले. १८१८ मध्ये बर्लिनला आल्यावर त्यांनी हाइन्रिख लिंगक यांच्या प्रयोगशाळेत स्फटिकविज्ञानाचा अभ्यास केला, तर १८१९–२१ या काळात त्यांनी स्टॉकहोम येथे बर्झीलियस यांच्या हाताखाली रसायनशास्त्राचे संशोधन केले. स्टॉकहोम येथे असताना त्यांनी फालन येथील खाणकाम, धातुविज्ञान, रासायनिक विश्लेषण व अकार्बनी रसायनशास्त्र यांविषयीची अधिक माहिती मिळविली. १८२३–२४ मध्ये त्यांनी पॅरिस येथे फ्रेनेल यांच्याबरोबर प्रकाशाच्या स्फटिकातून होणाऱ्या द्विप्रणमनाविषयी [स्फटिकातून जाताना प्रकाश शलाकेचे दोन घटकांत विभाजन होऊन ते भिन्न वेगाने पुढे जाण्याच्या आविष्काराविषयी → प्रकाश] संशोधन केले. बर्लिन येथील फ्रीड्रिख व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये १८२२ मध्ये ते साहाय्यक प्राध्यापक व १८२५ मध्ये प्राध्यापक झाले व शेवटपर्यंत ते या पदावर होते.

स्फटिकविज्ञानाचा अभ्यास करीत असताना पोटॅशियम फॉस्फेट व पोटॅशियम आर्सेनेट या भिन्न रासायनिक संघटनाच्या संयुगांच्या स्फटिकांचे आकार जवळजवळ सारखे असल्याचे त्यांच्या लक्षात आले व तेव्हापासून त्यांच्या समरूपतेच्या अभ्यासाला सुरुवात झाली. या विषयीचा त्यांचा पहिला लेख १८१८–१९ मध्ये व बर्झीलियस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला दुसरा लेख १८२२ मध्ये प्रसिद्ध झाला. अणूंची संख्या व त्यांचा संयोग (मांडणी) होण्याची तऱ्हा एकच असल्यास तोच स्फटिकाकार निर्माण होतो, म्हणजे स्फटिकाचा आकार अणूंच्या स्वरूपावर नव्हे, तर त्यांची संख्या व संयोगाची तऱ्हा यांनुसार ठरतो, असे त्यांनी दाखविले. समरूपतेविषयीच्या आपल्या कल्पनांमध्ये त्यांनी वेळोवेळी सुधारणा केल्या उदा., सारखे रासायनिक गुणधर्म व स्फटिकरूपे असलेल्या द्रव्यांची रासायनिक सूत्रे बहुधा सारखी असतात. तसेच स्फटिक रूपांमध्ये ठराविक मूलद्रव्येच एकमेकांची जागा घेऊ शकतात, असे त्यांनी १८३२ मध्ये प्रतिपादिले होते. समरूपतेविषयीच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा उपयोग बर्झीलियस यांना अणुभार अचूकपणे काढण्याकरिता झाला. यातूनच अणुभार काढण्याची मिचर्लिख पद्धती अस्तित्वात आली.

द्युमा यांच्या बाष्प घनता (कोणत्या तरी प्रमाणभूत द्रव्याच्या-हायड्रोजनाच्या-संदर्भात सांगितलेली बाष्पाची घनता) काढण्याच्या उपकरणात मिचर्लिख यांनी सुधारणा केल्या आणि उच्च तापमानाला असलेली बाष्प घनता योजण्याची पद्धती शोधून काढली. त्यांनी ब्रोमीन, गंधक, फॉस्फरस, आर्सेनिक, पारा इत्यादींची बाष्प घनता काढली. 

अकार्बनी रसायनशास्त्रातील त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे मँगॅनीजाच्या उच्च संयुगांचे अनुसंधान करणे व त्यांची संरचना ठरविणे (१८३०) हे होय. १८२३ मध्ये गंधकाचे एकनताक्ष [→ स्फटिकविज्ञान] स्फटिकरूप शोधून काढून त्यांनी द्विरूपतेचे एकाच रासायनिक संघटनांचे द्रव्य दोन स्फटिकरूपांत असण्याच्या आविष्काराचे) तत्त्व शोधून काढले. आयोडीन, ॲझाइड, सेलेनिक अम्ल (१८२७) इ. संयुगे त्यांनी प्रथम मिळविली.

बेंझॉइक अम्लाच्या कॅल्शियम लवणाचे शुष्क ऊर्ध्वपातन [→ ऊर्ध्वपातन] करून त्यांनी १८३४ मध्ये बेंझीन मिळविले व त्याचे बेंझीन असे नामकरणही त्यांनीच केले. बेंझिनाच्या अनुजातांवर (मूळ पदार्थांपासून मिळणाऱ्या इतर पदार्थांवर) त्यांनी बरेच संशोधन केले, तसेच त्यांनी नायट्रोबेंझीन, बेंझोसल्फॉनिक अम्ल, ॲझोबेंझीन इ. संयुगे तयार केली. अल्कोहॉल व विरल सल्फ्यूरिक अम्ल यांचे ऊर्ध्वपातन केल्यास ईथर व पाणी मिळते. या प्रक्रियेत सल्फ्यूरिक अम्ल निर्जलीकारक (पाणी काढून टाकणारा पदार्थ) म्हणून कार्य करते, असे त्यांनी सुचविले. यावरून इतर ठराविक द्रव्यांच्या उपस्थितीतच (याला पुढे उत्प्रेरक म्हणण्यात येऊ लागले) विशिष्ट रासायनिक विक्रिया घडू शकतात हा सिद्धांत त्यांनी मांडला व अशा प्रकारे हा सिद्धांत बर्झीलियस यांच्या ⇨ उत्प्रेरण सिद्धांताचा आधीचा टप्पा ठरला. यावरून मिचर्लिख यांनी साखरेच्या किण्वनाद्वारे [आंबविण्याच्या क्रियेद्वारे → किण्वन] अल्कोहॉल बनविण्यासाठी यीस्ट आवश्यक असल्याचे (आणि यीस्ट सूक्ष्मजीव असल्याचेही) त्यांनी निदर्शनास आणले.

यांशिवाय त्यांनी कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्रातील विश्लेषणाच्या पद्धतींत व त्यांच्या अचूकतेत सुधारणा केल्या. भूविज्ञान व खनिजविज्ञानाच्या त्यांच्या कार्यांपैकी कृत्रिम खनिजनिर्मितीचे त्यांचे प्रयोग महत्त्वाचे आहेत. यूरोपातील प्रमुख ज्वालामुखींची प्रत्यक्ष पहाणीद्वारे माहिती मिळवून त्यांनी तिच्या आधारे ज्वालामुखींविषयीचा सर्वसाधारण सिद्धांत मांडण्याचा प्रयोग केला. 

पाठ्यपुस्तके लिहिणारे ते सर्वाधिक यशस्वी लेखक मानले जातात. त्यांचे Lehrbuch der Chemie (१८२९) हे पुस्तक या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे सुवर्णपदक व बर्लिन ॲकॅडेमीचे सदस्यत्व हे बहुमान मिळाले होते. ते बर्लिन येथे मृत्यू पावले.

आइलहार्ट यांचे पुत्र अलेक्झांडर हेही रसायनशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी कॅल्शियम बायसल्फाइटाबरोबर लाकूड उकळून त्यापासून सेल्युलोज काढण्याची मिचर्लिख प्रक्रिया शोधून काढली.

मिठारी, भू. चिं.