मिचेल, वेस्ली क्लेअर: (५ ऑगस्ट १८७४–२९ ऑक्टोबर १९४८). व्यापारचक्रांच्या विश्लेषणाबाबत अर्थशास्त्राच्या विचारांत बहुमोल भर घालणारा प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. इलिनॉय राज्यातील रशव्हिल गावी जन्म. त्याचे वडील अमेरिकेच्या यादवी युद्धकाळातील एक अनुभवी सैनिक होते. मिचेलने १८९२ मध्ये शिकागो विद्यापीठात प्रवेश केला. तेथे त्याच्यावर थोर विचारवंत डॉन ड्यूई तसेच अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ थॉर्स्टाइन व्हेब्लेन यांच्या विचारांचा सखोल परिणाम झाला. जे. लॉरेन्स लाफ्‌लिन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी मिचेलला चलनविषयक सिद्धांत व चलननीती यांमधील समस्यांचे धडे दिले. १९१२ मध्ये त्याचा ल्यूसी स्प्रॅग हिच्याशी विवाह झाला.

यादवी युद्धातील किंमतींचा चढउतार व पैसा यांबाबत मिचेलने प्रारंभिक लेखन बरेच केले. यावर त्याने १८९९ मध्ये पीएच्.डी.साठी एक प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविली. १९०३ मध्ये त्याचे ए हिस्टरी ऑफ द ग्रीनबॅक्स हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. १८६२–६५ यांदरम्यानच्या चलनविषयक चढउतारांवरील एक अधिकृत ग्रंथ म्हणून आजही त्याला मान्यता दिली जाते. १९०८ मध्ये मिचेलने गोल्ड, प्राइसेस अँड वेजिस अंडर द ग्रीनबॅक स्टँडर्ड या ग्रंथाद्वारे पहिल्या ग्रंथाच्या इतिहासाचे विश्लेषण आणखी पुढे विस्तारले व त्यातून १८६२–७८ यांदरम्यानची आकडेवारी मांडली. 

वरील दोन ग्रंथांवरून मिचेलला सुचलेल्या कल्पना त्याच्या आर्थिक विचारांना अतिशय प्रेरक व मार्गदर्शक ठरल्या. मानवी वर्तन आणि सामाजिक संस्था यांच्याशी अर्थशास्त्राचा संबंध असल्याने त्याचा अभ्यास निरीक्षण व मापन यांद्वारे करावयास हवा  त्यासाठी सांख्यिकीची मोठी गरज भासते, असे त्याचे मत बनले. आर्थिक आधारसामग्रीच्या संकलनात मिचेलला रस असल्यामुळे त्याच्या हातून अनेक अभ्यासपूर्ण प्रबंध निर्माण झाले. त्यापैंकी द मेकिंग अँड यूझिंग ऑफ इंडेक्स नंबर्स ही अमेरिकन शासनाच्या श्रमसांख्यिकी कार्यालयाद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेली (१९१५, पुनर्मुद्रित १९३८) प्रबंधिका उत्कृष्ट मानली जाते. या अभ्यासामुळे वस्तू व रोखे यांच्या किंमतींचे निर्देशांक, उत्पादन निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न निर्देशांक यांसारख्या सांख्यिकीय क्षेत्रांत मौलिक भर पडली.

‘पैशाचा उपयोग व त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून करावयाचा विचार ही आधुनिक काळातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे,’ अशी मिचेलची विचारसरणी होती. चलनाधिष्ठित अर्थव्यवस्था प्रत्यक्षात कशी उत्पन्न झाली आणि मानवजातीच्या वर्तणुकीवर तिचा काय परिणाम घडून आला, यासंबंधी मिचेलने अभ्यासपूर्ण लेखन केले.

मिचेलने १९०३–१३ एवढा काळ कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनकार्य केले. १९१३ मध्ये त्याचा बिझिनेस सायकल्स हा त्रि विभागात्मक प्रचंड ग्रंथ प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ म्हणजे पुढील अनेक वर्षांकरिता व्यापारचक्रीय अभ्यासाचा पूर्वप्रवर्तक व मार्गदर्शक ठरला. विशेषतः या ग्रंथाचा तिसरा विभाग १९४१–१९५९ दरम्यान अनेकदा पुनर्मुद्रित करण्यात आला. या विभागात व्यापारचक्रांच्या उद्‌भवाच्या प्रक्रियांचे विश्लेषण आहे. 

व्यापारचक्राच्या चार महत्त्वाच्या अवस्था आणि प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये यांचे सुसंबद्ध व सुसंगत विश्लेषण करण्याचे श्रेय मिचेलकडे जाते. त्याने व्यापारचक्र हा आपल्या जीवनभरच्या अभ्यासाचा विषय मानला. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्कमध्ये ‘राष्ट्रीय आर्थिक संशोधन कार्यालय’ (नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च) या बव्हंशी त्याच्या परिश्रमामुळे स्थापन झालेल्या संस्थेने (१९२०) व्यापारचक्रांबाबत मौलिक संशोधन केले आहे. बिझिनेस सायकल्स :द प्रॉब्लेम अँड इट्स सेटिंग (१९२७) हा मिचेलचा महत्त्वाचा ग्रंथ असून त्यात १८५० ते १९२५ पर्यंतचा तसेच १७ देशांमधील उद्योग व्यवसायांच्या निर्देशांकांचा व वार्षिक घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथात व्यापारचक्रांची पुढीलप्रमाणे व्याख्या केली आहे : देशांचा व्यापार व्यवसाय व उद्योग यांच्या आर्थिक उलाढालींमध्ये आढळून येणाऱ्या तेजी मंदीच्या आंदोलनात्मक अवस्था म्हणजे व्यापारचक्रे होत. अनेक आर्थिक उलाढालींमध्ये एकाच वेळी विस्तारण वा भरभराट दिसून येत असून ती पाठोपाठ घसरण, संकोच व पुनरुज्जीवन अशा अवस्था उद्‌भवतात आणि नंतर त्या पुढच्या व्यापार चक्राच्या विस्तारण वा भरभराटीच्या अवस्थेत विरून जातात. या बदलाचा अनुक्रम नियतकालिक नसून आवर्ती असतो. व्यापार चक्रांचा कालावधी एक वर्षांहून जास्त आणि दहा किंवा बारा वर्षांपर्यंतचा असू शकतो. व्यापारचक्रे ही एकाच प्रकारची नसतात, प्रत्येक व्यापार चक्राचे स्वरूप निराळे असते. मिचेलच्या मते कोणतेही व्यापारचक्र चार अवस्थांमधून फिरते आणि त्या अवस्था एकमेकीतून उद्‌भवणाऱ्या तसेच स्वयंगतिक असतात. व्यापारचक्र एकदा सुरू झाले की, त्यामधील सर्व अवस्था क्रमशः व एकापाठोपाठ येतात. बाह्य घटकांमुळे कोणत्याही अवस्थेची गती कमीअधिक होते, तथापि पहिली अवस्था संपून दुसरी सुरू होण्याच्या प्रक्रियेला बाध येत नाही. सारांश, व्यापारचक्र हे स्वयंनिर्मित प्रवाहानुसार फिरत राहते आणि त्यातील प्रत्येक अवस्था ही स्वयंपोषक असते, असे मिचेलचे मुख्य प्रतिपादन होते. व्यापारचक्राच्या चार अवस्थांपैकी संजीवन ही पहिली अवस्था मानल्यास भरभराट अथवा तेजी (प्रॉस्पेरिटी-पीक), घसरण (रिसेशन-डिक्लाइन) आणि अरिष्ट (मंदी-डिप्रेशन ट्रफ) या तीमागून येणाऱ्या तीन अवस्था होत [→ व्यापारचक्र].

व्यापारचक्रांचा अभ्यास आणि संशोधन यांखेरीज मिचेलने इतर बाबींकडेही लक्ष दिले. १९१३ मध्ये तो कोलंबिया विद्यापीठात अध्यापनार्थ रुजू झाला, तेथे त्याने १९४४ पर्यंत (१९१९–२२ हा कालखंड वगळून) अध्यापनकार्य केले. १९२० मध्य तो राष्ट्रीय आर्थिक संशोधन कार्यालयात संचालकपदी रुजू झाला, या पदावर तो १९४५ पर्यंत होता. या कार्यालयाद्वारा प्रकाशित झालेल्या अनेक निबंधांचा तो लेखक किंवा सहलेखक होता त्याशिवाय संस्थेचे अन्य अनेक अभ्यासप्रकल्प पूर्ण करण्यात त्याने पुढाकार घेतला. कार्यालयाची स्टडीज इन बिझिनेस सायकल्स ही अभ्यासमालिका सातत्याने चालू ठेवण्याचे श्रेय मिचेलला द्यावे लागेल. मेझरिंग बिझिनेस सायकल्स (१९४६) या बर्न्स आणि मिचेल यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ग्रंथात व्यापारचक्राच्या प्रक्रियेचे विश्लेषण अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांतील एक हजारांवरील उद्योगव्यवसायांच्या प्रातिनिधिक पाहणीवरून केलेले आहे. व्यापारचक्रावरील आणखी एक मोठा प्रकल्प त्याच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिला. या ग्रंथात व्यापारचक्रे आणि त्यांची कारणे यांबाबतचे सविस्तर विश्लेषण करण्याची त्याची योजना  होती.व्हॉट हॅपन्स ड्यूरिंग बिझिनेस सायकल्स : ए प्रोग्रेस रिपोर्ट (१९५१) हा मिचेलच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे वरील प्रकल्पाचा एक छोटासा भाग होता.


मिचेलच्या व्यापारचक्रासंबंधीच्या चतुरस्त्र संशोधनामुळे त्याला सांख्यिकीय अर्थशास्त्राच्या प्रवर्तकांमध्ये मानाचे स्थान मिळाले. त्याच्या विद्वत्ताप्रचुर, अनुभवाधिष्ठित दृष्टिकोनाचा आर्थिक संशोधनाच्या विकासावर फार मोठा ठसा उमटलेला दिसून येतो. अर्थशास्त्रातील ‘संस्थावाद’ (इन्स्टिट्यूशनॅलिझम) या संप्रदायाचा थॉर्स्टाइन व्हेब्लेन (१८५७–१९२९) व जॉन रॉजर्स कॉमन्स (१८६८–१९४५) यांच्याबरोबरीचा एक संस्थापक म्हणून मिचेल ओळखला जातो. मिचेलचा बिझिनेस सायकल्स हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जात असून ‘ॲल्फ्रेड मार्शल यांचाप्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स ‘ (१८९०) हा ग्रंथ आणि जॉन मेनार्ड केन्स  यांचा जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी (१९३६) हा ग्रंथ या दोहोंच्या मधल्या काळात बिझिनेस सायकल्स (१९१३) या ग्रंथासारखा अन्य कोणत्याही ग्रंथाचा पश्चिमी जगतातील आर्थिक विचारांवर मोठा प्रभाव पडला नाही ’ असे ए. एफ्. बर्न्स या लेखकाने म्हटले आहे.

पहिल्या महायुद्धकाळात ‘युद्धकालीन उद्योगमंडळा’चा किंमतविभागप्रमुख, ‘सामाजिक प्रवृत्तिविषयक संशोधन समिति’ चा अध्यक्ष (१९२९–३३) तसेच ‘राष्ट्रीय नियोजन मंडळ’ (१९३३) व ‘राष्ट्रीय साधनसामग्री मंडळ’ (१९३४–३५) यांचा सदस्य अशा विविध शासकीय जबाबदाऱ्या मिचेलने सांभाळल्या. मिचेल मोठा मानवतावादी व व्यवहारवादी होता. अर्थव्यवस्थेत वारंवार उद्‌भवणारी मंदी, बेकारी, संधीमधील असमानता, सत्ता-केंद्रीकरण, भौतिक असुरक्षितता यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी अर्थशास्त्रादी सामाजिक शास्त्रांचा उपयोग झाला पाहिजे, यावर त्याचा भर होता. तो न्यूयॉर्क येथे निधन पावला.

संदर्भ : 1. Burns, Arthur F. Ed. Wesley Clair Mitchell: The Economic Scientist, New York, 1952.

             2. Dorfman, Joseph, The Economic Mind in American Civilization, Vol. 3, New York, 1949.

             3. Schumpeter, Joseph Alois, Ten Great Economists, London, 1956.

गद्रे, वि. रा.