उत्पादकता : साधनसामग्रीचे वस्तूंत रूपांतर करण्याची उत्पादक घटकांची कार्यक्षमता. एखाद्या निवेशाच्या (इन्‌पुट) एककाचा एका ठराविक काळातील उत्पाद (आउटपुट) असाही उत्पादकतेचा अर्थ लावला जातो. मजुराच्या बाबतीत तो दरवर्षी, दरमहा वा दरताशी किती उत्पाद निर्माण करतो, हे पाहिले जाते.

जेव्हा एखाद्या उत्पादक घटकाची उत्पादकता वाढते, तेव्हा निवेशाच्या एककापासून अधिक उत्पाद उपलब्ध होतो म्हणजे तोच उत्पाद मिळविण्यासाठी निवेशाचे प्रमाण कमी करून भागण्यासारखे असते. या परिस्थितीत निवेशाची किंमत तीच राहिली, तर उत्पादाच्या परिव्ययात घट होईल, हे उघड आहे. एखाद्या देशातील साधनसामग्रीची उत्पादकता वास्तव परिव्ययाची पातळी निश्चित करते आणि अपेक्षित फलनिष्पत्तीसाठी विशिष्ट साधनसामग्री किती प्रमाणात उपयोगात आणावी, हे ठरविते. अधिक उत्पादक असलेला एखाद्या देशातील मजूर, दुसऱ्या देशातील कमी उत्पादक मजुराहून जादा वेतन मिळवितो, तेव्हा त्या जादा वेतनामुळे परिव्ययात वाढ होत नाही. पश्चिम यूरोप आणि उत्तर अमेरिका या भागांतील वाढत्या राहणीमानाचा इतिहास म्हणजे तेथे झपाट्याने वाढलेल्या उत्पादकतेचाच इतिहास होय.

उत्पादकतेची आंतरराष्ट्रीय तुलना : उत्पादकतेचे मोजमाप करणे गुंतागुंतीचे असते. विशेषतः विविध उद्योगांतील वा देशादेशांतील उत्पादकतेची तुलना करावयाची झाल्यास किंवा दोन वेगवेगळ्या कालखंडांतील उत्पादकतेमधील फरक विचारात घ्यावयाचा झाल्यास, अनेक समस्या उभ्या राहतात. निवेश व उत्पाद यांचा दर्जा सर्वत्र सारखा असत नाही मजुरांच्या कुशलतेत फरक असतो आणि उत्पादाची जात वेगवेगळी असते. तत्त्वतः या अडचणी निवेश व उत्पाद यांच्या भौतिक स्वरूपाचे मौद्रिक आय स्वरूपात रूपांतर करून सोडविता येतील, परंतु तुलना करताना अशा प्रकारे किंमतीवर फारसे विश्वासून चालत नाही. एखाद्या देशात मक्तेदारीचे प्रमाण अधिक असते. त्याचा परिणाम उत्पादाची किंमत वाढण्यात होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी तुलना करणे तेवढेच कठीण असते. कारण दोन देशांमधील चलनांच्या विनिमय दरात देशांतर्गत किंमतींच्या पातळीचे खरेखुरे प्रतिबिंब पडतेच, असे नाही. विविध उत्पादक घटक उत्पादनासाठी एकत्रितपणे वापरले की, प्रत्येक घटकाची उत्पादकता स्वतंत्रपणे ठरविणे सोपे नसते. उत्पादाच्या प्रमाणात बदल घडवून आणण्यासाठी एकाहून अधिक निवेशांच्या एककांत बदल करावा लागत असेल, तर कोणत्या निवेशामुळे उत्पादकतेत फरक झाला ते ठरविणे दुरापास्त होते.

सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत : उत्पादक घटकांमुळे मनुष्याच्या गरजा प्रत्यक्षतः पूर्ण होत नसतात. त्यांचा उपयोग करून गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू तयार करता येतात म्हणून त्या घटकांना मागणी असते. म्हणजे वस्तूंना त्यांच्या उपयुक्ततेमुळे मागणी असते, तर उत्पादक घटकांना त्यांच्या उत्पादकतेमुळे मागणी असते. उत्पादक घटकांच्या उत्पादकतेचा उपयोग करून घेण्यासाठी, उत्पादक त्यांचे मोल द्यावयाला तयार असतात. हे मोल घटकाच्या उत्पादकतेवर अवलंबून असते. एखाद्या उत्पादक घटकाचे एकामागून एक एकक उपयोगात आणताना, उत्पादकता एकतर वाढेल, स्थिर राहील वा घटत जाईल. अन्य उत्पादक घटक न बदलता, एका उत्पादक घटकाच्या एककांत एकाने वाढ केल्यामुळे उत्पादकतेत होणारा बदल, ही त्या घटकाची सीमांत उत्पादकता होय. सीमांत उत्पादकतेची साधारण प्रवृत्ती घटण्याची असते. अशी ती घटल्यास उत्पादक घटकाच्या जादा एककांसाठी उत्पादक पूर्वीपेक्षा कमी किंमत देण्यास तयार होईल. पहिल्या एककाची आय उत्पादकता दहा रुपये असेल व जादा एककाची आठ रुपये असेल, तर उत्पादक जादा एककासाठी आठ रुपयांहून अधिक मोबदला देण्यास तयार होणार नाही, हे उघड आहे. उत्पादक घटकाच्या जादा एककापासून मिळणारे उत्पादन, जोपर्यंत त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मोबदल्याहून अधिक असेल, तोपर्यंत त्या घटकाच्या अधिकाधिक एककांची मागणी करणे उत्पादकाच्या दृष्टीने फायदेशीर असते. अधिकाधिक एकक योजून उत्पादक उत्पादनवाढ करीत असताना, एक वेळ अशी येते की, घटकाच्या नव्या एककापासून मिळणारे उत्पन्न नेमके त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मोबदल्याइतके असते. या टप्प्यावर उत्पादक नव्या एककांची भर घालणे सोडून देतो. बाजारात वस्तूंच्या सर्व नगांची एकच किंमत प्रस्थापित होत असल्यामुळे उत्पादक घटकाच्या सर्व एककांची किंमतदेखील सारखी असते. त्यामुळे उत्पादकाने योजिलेल्या शेवटच्या एककासाठी तो जी किंमत देण्यास तयार असतो, तीच किंमत तत्पूर्वीच्या अन्य एककांसाठी प्रस्थापित होते. सीमांत एककाची किंमत त्याच्या उत्पादकतेबरोबर असते. म्हणून मागणीच्या बाजूने विचार केला असता, उत्पादक घटकाची किंमत त्याच्या सीमांत उत्पादकतेइतकी असते, असा निष्कर्ष निघतो. ह्यालाच ‘सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत’ असे म्हणतात.

सरासरी व सीमांत आय उत्पादकता : एखाद्या उत्पादक घटकाची सरासरी उत्पादकता काढावयाची झाल्यास, एकूण उत्पादकतेस त्या घटकाच्या एककांच्या संख्येने भागावे लागते. उदा., १० एककांची एकूण उत्पादकता ८० असेल, तर एककाची सरासरी उत्पादकता ८ येईल. बाजारपेठेत पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असल्याचे गृहीत धरल्यास उत्पादक घटकाची किंमत सीमांत उत्पादकतेबरोबर असते एवढेच नव्हे, तर सरासरी उत्पादकतेएवढी असते. आकृतीच्या साहाय्याने हे दाखवावयाचे असल्यास असे म्हणता येईल की, पूर्ण स्पर्धेत ज्या जागी सरासरी उत्पादकता व सीमांत उत्पादकता ह्या समान होतात, त्या बिंदूपाशी उत्पादक घटकांना द्यावयाची किंमत ठरते. खालील तक्त्यात ‘मजूर’ या उत्पादक घटकाची सरासरी व सीमांत व आय उत्पादकता दाखविली आहे :

मजूर एकूण आय उत्पादकता सरासरी आय उत्पादकता सीमांत आय उत्पादकता

१०

१४

२४

३६

५०

६०

६६·५

७२

७६·५

८०

१०

१०

९·५

८·५

१०

१२

१४

१०

६·५

५·५

४·५

३·५

मजुराच्या सहाव्या एककाची सरासरी व सीमांत आय उत्पादकता एकच आहे. रोजगारी दहा रुपये धरली, तर उत्पादक सहाव्या मजुरापर्यंत मजुरांची मागणी करील. त्यापुढे मजुराची सीमांत उत्पादकता रोजगारीहून कमी असल्याने, उत्पादक नुकसान सोसण्यास तयार होणार नाही, हे सोबतच्या आकृतीच्या स्वरूपात दाखविता येईल.

मजुरांची सरासरी व सीमांत आय उत्पादकता दर्शविणारा आलेख.

‘रअ’ वेतन असेल, तर उत्पादक ‘अ ज’ मजुरांची मागणी करील. ‘म’ ह्या ठिकाणी सरासरी व सीमांत आय उत्पादकता एकच आहे.

उत्पादक घटकांचे एकत्रीकरण : उत्पादनासाठी निरनिराळ्या उत्पादक घटकांचे कोणत्या प्रमाणात एकत्रीकरण करणे किफायतशीर ठरेल, याचा विचार करताना उत्पादकाला सीमांत उत्पादकतेचे तत्त्व साहाय्यभूत ठरते. निरनिराळ्या उत्पादक घटकांची सीमांत उत्पादकता समान राहील, अशा संख्येत त्यांचे एकत्रीकरण करणे उत्पादकाच्या दृष्टीने जास्तीतजास्त फायद्याचे ठरते. सर्व उत्पादक घटकाची सीमांत उत्पादकता समान होईपर्यंत, ज्या घटकांची सीमांत उत्पादकता कमी असेल, त्याच्या जागी ज्याची सीमांत उत्पादकता अधिक असेल, त्या घटकाची योजना करून घटकांची परस्परांत अदलाबदल घडवून आणणे, उत्पादकलाला इष्ट आणि आवश्यक असते.

एखाद्या उत्पादक घटकाची सीमांत आय उत्पादकता वाढल्या शिवाय त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ होणार नाही. उत्पादकता वाढविण्यासाठी घटकाची कार्यक्षमता वाढविणे जरूर आहे. उत्पादकता ही तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती, मनुष्यबळ, भांडवल, बचत, नैसर्गिक साधनसामग्रीची उपलब्धता, आर्थिक व सामाजिक संस्था ह्यांवर अवलंबून असते. कामगारांना उपलब्ध असणाऱ्या यंत्रावजारांचा दर्जा, कामगारांची कार्यक्षमता व बौद्धिक पातळी, प्रवर्तकाचे संघटनकौशल्य व आधुनिक उत्पादनतंत्राचा उपयोग करण्याची त्याची तयारी ह्यांचाही उत्पादकतेवर परिणाम होतो.

पहा : औद्योगिक उत्पादकता.

संदर्भ : 1. Mills, Frederick C. Productivity and Economic Progress, New York, 1952.

2. Stigler, George T. Production and Distribution Theories, New York, 1941.

भेण्डे, सुभाष