सनदी कंपनी : ( चार्टर्ड कंपनी ). एखादया राष्ट्राच्या सार्वभौम राजाने अथवा राणीने दिलेल्या सनदेनुसार विशिष्ट कार्यपूर्ततेसाठी अस्तित्वात आलेली कंपनी. ब्रिटनमध्ये पुरातन वहिवाटीनुसार प्राप्त झालेल्या सार्वभौम हक्काचा वापर करून अनेक सनदी कंपन्या स्थापण्यात आल्या. उदा., ईस्ट इंडिया कंपन्या, बँक ऑफ इंग्लंड व पी. अँड ओ. स्टीम नॅव्हिगेशन कंपनी इत्यादी. सनदी कंपन्यांची नोंदणी कोणत्याही संसदीय अधिनियमाखाली झालेली नसल्यामुळे त्यांचे नियमन केवळ त्यांना मिळालेल्या सनदेमधील कलमांच्या आधारे केले जाई. सनदेतील एखादया बाबीचा किंवा अटीचा कंपनीने भंग केल्यास राजाज्ञेने सनद रद्दसुद्धा करण्यात येई.

सनदी कंपन्या साधारणत: परराष्ट्रीय व्यापाराचा धोका पतकरण्यास तयार असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटना असत किंवा यूरोपीय राष्ट्रांना समुद्रपार वसाहती स्थापण्यास उपयोगी पडणाऱ्या एजन्सी असत. परराष्ट्रीय व्यापार चालविणे व वसाहती काबीज करणे या त्यांच्या कामगिरीचे बक्षीस म्हणजे त्यांना विशिष्ट क्षेत्रात मक्तेदारीचे हक्क व वसाहतींमध्ये काही वैधानिक सैनिकी व राजनैतिक अधिकार बहाल करण्यात येत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास बऱ्याचशा सनदी कंपन्या नामशेष झाल्या होत्या परंतु १८८० नंतर विशेषत: आफिकेत वसाहती काबीज करण्यासाठी यूरोप आणि ब्रिटनमध्ये काही नवीन सनदी कंपन्या अस्तित्वात आल्या. वसाहतींना स्थैर्य प्राप्त झाल्यावर त्या कंपन्या विसर्जित करण्यात आल्या. १९४६ साली बँक ऑफ इंग्लंडचेदेखील राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

पहाः सनद. धोंगडे, ए. रा.