भारतीय सहकारी मंडळ : राष्ट्रीय पातळीवर सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणारी ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया’ ही संघटा १९२८ साली ‘ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह युनियन’ या नावाने स्थापन झाली. विविध प्रांतांतील सहकारी संस्था आणि सहकारी बँका यांच्या दोन वेगळ्या संघटना (असोसिएशन्स) होत्या, त्यांचे एकत्रीकरण होऊन ही संस्था अस्तित्वात आली. पुढे १९६१ साली या संघटनेने सध्याचे नाव धारण केले.

भारतात सहकारी चळवळीचा प्रसार व विस्तार करणे, चळवळीचा प्रवक्ता म्हणून काम करणे ही या संघटनेची उद्दिष्टे असून शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे, सहकारी संस्थांच्या व सरकारच्या सहकारी खात्याच्या सेवकवर्गाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे आपासांत सहकार्य वाढविणे, राष्ट्रीय सहकारी काँग्रेस बोलाविणे, आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेला प्रतिनिधी पाठविणे, सहकारी चळवळीसंबंधी साहित्य प्रकाशित करणे, माहिती केंद्रे चालविणे हे तिचे कार्यक्रम होत. 

या संघटनेचे सभासद पुढील प्रकारचे असतात : (१) राष्ट्रीय पातळीवरील सहकारी सोसायट्या, (२) शिखर संस्था (ॲपेक्स सोसायट्या) (उदा., राज्य पातळीवर बँका, मार्केटिंग फेडरेशन इ.), (३) सहकारी विमा कंपन्या, (४) संघटनेचे माजी अध्यक्ष, (५) सहकारी क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती-जास्तीतजास्त पंधरा. ज्या संस्था सभासद आहेत त्यांपैकी पहिल्या व दुसऱ्या वर्गातील संस्थांना प्रत्येकी तीन आणि विमा कंपन्यांना प्रत्येकी एक प्रतिनिधी नियामक परिषदेवर (गव्हर्निंग कौन्सिलवर) पाठविता येतो. तीतून एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक प्रधान सचिव, दोन सहसचिव आणि विविध समित्या, उपसमित्या निवडल्या जातात.

या संघटनेचे १९७५-७६ साली १०८ सभासद होते. त्या सालात सर्वसाधारण सहकारी संस्थांच्या प्राथमिक सभासदांच्या प्रशिक्षणासाठी ९१२४ वर्ग चालविण्यात आले. परिसंवाद संघटित करणे, विविध राज्यांतील सहकारी कायदे, त्यांतील दुरुस्त्या, चौथ्या योजनेतील सहकारी चळवळीसंबंधीची तरतूद, काही संस्थांचे विशिष्ट प्रश्न वगैरेंबाबत सरकारकडे निवेदन देणे, आंतरराष्ट्रीय सहकारी काँग्रेसला प्रतिनिधी पाठविणे, द को-ऑपरेटिव्ह हे त्रैमासिक आणि ऑपरेटर हे पाक्षिक चालविणे, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (पुणे) यांसारख्या संस्था चालविणे आदी कामे या संघटनेने केली होती. या संघटनेचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

सुराणा, पन्नालाल