रॉथ्सचाइल्ड घराणे :  एकोणिसाव्या शतकारंभापासून वित्तप्रंबंधक, कलावस्तुसंग्राहक, शास्त्रज्ञ म्हणून प्रतिष्ठा मिळविणारे आणि ज्यू समाजाचे नेतृत्व करणारे यूरोपातील सर्वांत मोठे घराणे. या घराण्याने जवळजवळ दोन शतके यूरोपच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासावर आपला मोठा प्रभाव पाडल्याचे दिसून येते.

               

रॉथ्सचाइल्ड घराण्याचा संस्थापक मायर आमशेल (२३ फेब्रुवारी १७४४−१९ सप्टेंबर १८१२) याचा जन्म फ्रँकफुर्ट-आम-मेन येथे झाला. ‘रॉथ्सचाइल्ड’ हे नाव मायरचे पूर्वज ज्या घरात राहत असत, त्या घरावरील तांबड्या (रॉट) ढालीच्या (शील्ड) चित्रावरून पडले असावे. मायरचे आई-वडील लवकर निवर्तल्यामुळे त्याला एका बँकव्यवसायीकडे उमेदवारी करावी लागली. लवकरच तो हेस-कासेलचा ड्यूक नववा विल्यम याचा वित्तविषयक बाबींचा सल्लागार बनला. सत्ताधारी सरदार-दरकदार घराण्यांशी वित्तव्यवहार करण्याचे धोरण मायरने प्रथमपासूनच अनुसरले. मायर आणि त्याचे पाचही मुलगे आमशेल मायर (१२ जून १७७३−६ डिसेंबर १८५५), सॅलोमन मायर (९ सप्टेंबर १७७४−२७ जुलै १८५५), नाथान मायर (१६ सप्टेंबर १७७७−२८ जुलै १८३६), कार्ल मायर (२४ एप्रिल १७८८−१० मार्च १८५५) आणि जेम्स किंवा जॅकब मायर (१५ मे १७९२−१५ नोव्हेंबर १८६८) यांनी प्रथमतः चैनीच्या वस्तूंचा तसेच नाणी व वचनचिठ्ठ्या, हुंड्या, धनादेश यांसारख्या परक्राम्य पत्रांचा व्यापार सुरू केला. लवकरच मायार आणि त्याचे मुलगे हे सर्वजण बँक व्यवसायी बनले. फ्रेंच राज्यक्रांती तसेच नेपोलियनची युद्धे (१७९२−१८१५) या दोन घटना त्यांच्या व्यवसायाला वरदानच ठरल्या. मायर व त्याचा मोठा मुलगा आमशेल मायर या दोघांनी मिळून फ्रँकफुर्ट येथून आपल्या वाढत्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले नाथान मायर ह्या तिसऱ्या मुलाने १८०४ मध्ये लंडन येथे एक शाखा उघडली जेम्स हा पाचवा मुलगा पॅरिस येथे १८११ पासून व्यवसाय करू लागला आणि सॅलोमन व कार्ल या त्याच्या दुसऱ्या व चौथ्या मुलांनी अनुक्रमे व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) व नेपल्स (इटली) या ठिकाणी १८२० च्या पुढील काळात आपली कार्यालये उघडली.

               

रॉथ्सचाइल्ड बंधूंनी युद्धाचा उपयोग आपल्या आर्थिक भर भरभराटीसाठी करून घेतल्याचे दिसते. युद्धात गुंतलेल्यांना कर्जे देणे गहू, कापूस, वसाहतकालीन माल व शस्त्रास्त्रे यांसारख्या वस्तूंची खरेदी-विक्री करणे आणि ब्रिटिश राजे, सरदार-दरकदार व अन्य यूरोपीय राष्ट्रांमधील सरदार यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपात पैशाची देवघेव करणे हे त्यांचे युद्धकालीन उद्योग असत. शांतता प्रस्थापित झाल्यावर वाढत्या रॉथ्सचाइल्ड व्यवसायाचे स्वरूप पालटले. त्यांच्यामधील  बँकिंग व्यवहार करणारा समूह आंतरराष्ट्रीय व्यवसाय करीत होताच तथापि सरकारी कर्जरोखे (प्रशियन, इंग्लिश, फ्रेंच इ.) विमाकंपन्यांचे रोखे तसेच औद्योगिक कंपन्यांचे भाग यांची खरेदी-विक्री करणारे प्रतिनिधी अथवा अडत्ये (दलाल) असे त्यांना स्वरूप प्राप्त झाले. औद्योगिक क्रांतीच्या चाहुलीचा रॉथ्सचाइल्ड समूहाने सबंध यूरोपभर रेल्वे, कोळसा, लोखंड उत्पादनाचे कारखाने, धातुकामाचे उद्योग यांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवूणक करून आर्थिक लाभ उठविला. १८५० च्या पुढील काळात या घराण्यातील बँकिंग गटाने खनिज तेल व अलोह धातू यांच्या जागतिक व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळविले. तथापि याच सुमारास ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या देशांत उदयास आलेल्या संयुक्त भांडवली बँका व व्यापारी बँका यांच्यामुळे रॉथ्सचाइल्ड घराण्याच्या व्यापारातील अग्रेसर स्थानास मोठ्या प्रमाणात खीळ बसली.

               

(१) सर्व व्यवहार संयुक्तपणे पार पाडावयाचे आणि (२) केव्हाही अतिरिक्त नफ्याची अपेक्षा बाळगायची नाही, ही मायर ॲमशेलने आर्थिक व्यवहारासंबंधी आखून दिलेली दोन मार्गदर्शक तत्त्वे घराण्यातील पुढील पिढ्यांनाही अत्यंत उपयुक्त ठरली. मात्र रॉथ्सचाइल्ड बंधूंचे पुढील काही वारसदार घराण्याचे उद्योगव्यवसाय चालविण्यास काही प्रमाणात फिके पडले.

                 

नाथान व जेम्स हे सर्व भावंडांत अधिक आक्रमक व आग्रही व्यक्तिमत्त्वाचे होते. नाथानने आपल्या धंद्यातील यशामुळे इंग्लंडच्या राजघराण्याचा तसेच वित्तंत्रालयाचा जबर विश्वास संपादिला होता. नेपोलियनबरोबरची युद्धे समाप्त होण्यापूर्वीच, नाथान लंडनमधील एक बडे प्रस्थ म्हणून गणले जाऊ लागले होते. सबंध यूरोप खंडात पसरलेल्या आपल्या प्रतिनिधींमार्फत नाथाला सातत्याने वत्तांत व बातम्या कळत असत त्यांचा उपयोग त्याला स्वतःच्या व्यवसायासाठी तसेच सरकारलाही होत असे. उदा., वॉटर्लू येथे झालेल्या नेपोलियनाच्या पराभवाची विश्वसनीय वार्ता प्रथम त्यालाच समजली होती. शांततेच्या काळातही नाथानाने आपले अग्रेसर स्थान कायम ठेवली होते व तो अनेक मोठे आर्थिक व्यवहार धडाडीने पार पाडीत होता. ब्रिटिश वेस्ट इंडिजमधील गुलामांच्या मुक्ततेसाठी लागणारे दोन कोटी पौंडांचे कर्ज नाथानने तात्काळ उपलब्ध केले. फ्रँकफुर्ट येथे काही कामानिमित्त गेला असताना तेथेच त्याचे निधन झाले. लायोनेल हा नाथाचा मुलगा. त्याने वडिलांची पेढी ख्यातकीर्त केली. त्याच्या कारकीर्दीत लंडन पेढीने सु. १६० कोटी पौंड किंमतीची १६ सरकारी कर्जे उभारली. १८७५ मध्ये लायोनेलने काही तासांच्या सूचनेकरून ब्रिटिश शासनाला (डिझरेली पंतप्रधान असताना) सुएझ कालवा कंपनीचा प्रमुख भागधारक होण्यासाठी ४० लक्ष पौंड कर्ज उपलब्ध करून दिले. लायोनेल हा ब्रिटिश संसदेचा म्हणूनही निवडून आला होता (१८५८−६८ व १८६९−१८७४). त्याचा एक भाऊ सर अँटनी डी रॉथ्सचाइल्ड (१८१०−७६) हा १८५८−६८ व १८६९−१८७४). त्याचा एक भाऊ सर अँटनी डी रॉथ्सचाइल्ड (१८१०−७६) हा १८५८ मध्ये ऑस्ट्रीय कौन्सल जनरल आणि लडनस्थित ‘युनायटेड सिनॅगॉग’ चा अध्यक्ष बनला (१८७०). लायोनेलचा वॉल्टर (८ फेब्रुवारी १८६८−२७ ऑगस्ट १९३७) हा लायोनेलचा नातू. जन्म लंडन येथे. हा प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ असून त्याने ‘रॉथ्सचाइल्ड निसर्गेतिहास संग्रहालय’ स्थापिले. त्याला १९१५ मध्ये ‘बेरॉन’ (सरदार) हा किताब देण्यात आला. तो ब्रिटिश संसदसदस्य होता (१८९९−१९१०) त्याचा मृत्यू ट्रिंग-बकिंगहॅमशर येथे झाला.

जेम्स हा मायर ॲमशेलचा पाचवा व सर्वांत धाकटा मुलगा. त्याचा फ्रँकफुर्ट येथे जन्म झाला. १८१२ पासून तो पॅरिस येथे रॉथ्सचाइल्ड घराण्याची पेढी चालवू लागला. प्रथमपासूनच तो वित्तव्यवहारांबाबत अतिशय सावध होता. फ्रान्समध्ये अर्धशतकभर चालू असलेले क्रांतिकारक बदल व घडामोडी यांच्यामध्येही जेम्सने अत्यंत कौशल्याने आपल्या पेढीचे नाव अग्रभागी राखले. त्याच्या कारकीर्दीत रॉथ्सचाइल्ड घराण्याच्या फ्रेंच शाखेने फ्रेंच रेल्वे बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वित्तप्रबंध केला. त्या काळात तो ज्यू समाजाचा निर्विवाद नेता मानला जात होता त्यामुळेच ज्यू समाजाला काही प्रसंगी त्रास वा छळ सोसावा लागण्याची वेळ आल्यास, तो फ्रेंच शासनावर दबाव आणीत असे व ज्यू समाजाचे संकट निरसन करीत असे. त्याचे पॅरिस येथे निधन झाले.

               


ॲल्फॉन्स हा जेम्सचा थोरला मुलगा पॅरिस येथे जन्म. ॲल्फॉन्सने आंतरराष्टीय बँकिंग संघाचा अध्यक्ष या नात्याने, प्रशियाने फ्रान्सचा पराभव केल्यानंतर, १८७१ व १८७२ मध्ये ५०० कोटी सुवर्ण फ्रँकची दोन कर्जे (जी मुक्तिकर्जे म्हणून ओळखली गेली) प्रशियाला देऊ केली. ‘माझ्या प्रभावामुळेच फ्रेंच राज्यप्रमुखाला-अदोल्फ थेअर्स-पुन्हा सत्तेवर राहणे शक्य झाले’ असे त्याने म्हटल्याचे प्रसिद्ध आहे. बँक ऑफ फ्रान्सचा तो रीजंट होता त्याच्या परोपकारी कृत्यांबद्दल-कामगारांसाठी गृहनिवास प्रकल्प तसेच लूव्हचा देणगीदार−तो प्रसिद्ध होता. तो पॅरिसमध्येच मरण पावला. त्याचा सर्वांत धाकटा भाऊ−एडमंड (१८४५−१९३४) हा पॅलेस्टाइनमध्ये झालेल्या ज्यूंच्या पुनर्वसनाचा एक प्रमुख आधार होता. त्याने अनेक वर्षे एकट्याने कृषिवसाहती चालविल्या या कृषिवसाहतींनीच ज्यूंच्या जीवनप्रवाहाला वेगळे वळण मिळाले, त्या कृषिवसाहतींशिवाय इझ्राएल हे राष्ट्रच अस्तित्वात येऊ शकले नसते. तो बूलोन-त्यूर-सेन (फ्रान्स) येथे मरण पावला.

               

नेपोलियनचा अस्त व पहिले महायुद्ध यांदरम्यान रॉथ्सचाइल्ड घराणे जगामधील आघाडीचे खाजगी बँकव्यवसायी म्हणून गणले जात होते. १८१७−४८ व पुढे १८४८−७५ या काळांत या घराण्यातील शाखाप्रमुखांनी निरनिराळ्या देशांत मिळून ६५ कोटी व सु. ३० कोटी पौंडांचे कर्ज उपलब्ध केले. विशेषतः ऑस्ट्रिया व फ्रान्स या देशांत रेल्वेबांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वित्तप्रबंध केला. ज्या ज्या देशांत त्यांनी आपल्या शाखा उघडल्या, त्या त्या देशांतील ज्यू समाजाचे त्यांनी निरपवाद नेतृत्व केले. दुसऱ्या पिढीतील रॉथ्सचाइल्ड हे कलावस्तुसंग्राहक, कलासंग्रहालये व कलावीथी यांचे उदार आश्रयदाते व लोकोपकारी म्हणून ख्याती पावले. नंतरच्या रॉथ्सचाइल्ड घराण्यातील काही व्यक्ती विज्ञान, पांडित्य व राजकारण अशा विविध क्षेत्रांत तळपल्या. पहिल्या महायुद्धानंतर रॉथ्सचाइल्ड घराण्याची ऑस्ट्रियन शाखा बंद पडली तथापि अद्यापही लंडन व पॅरिस येथील रॉथ्सचाइल्ड घराणी वित्तजगतात आघाडीवर असलेली दिसून येतात.

                                                                गद्रे, वि. रा.