भारतीय वास्तुकला : भारतीय द्वीपकल्पातील (भारत व पाकिस्तान) वास्तुकलेचे सर्वांत प्राचीन नमुने सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत पहावयास सापडतात. ⇨ मोहें-जो-दडो, ⇨ हडप्पा,कालिबंगा व ⇨ लोथल येथे वास्तुकलेचा सर्वांगीण आविष्कार दिसून येतो. नगररचना, नगररक्षण, धान्याची कोठारे, गृहरचना, पाण्याची कुंडे, इतकेच काय पण जहाजासाठी एक प्रचंड गोदी इतक्या सगळ्यांचा यात समावेश आहे. इ. स. पू. २००० ते १७०० च्या दरम्यान ही संस्कृती अस्तमान झाली. येथपासून पुढे हजार वर्षांच्या काळात भारतात कोणतीही उल्लेखनीय नागरी संस्कृती निर्माण झाली नाही. या दरम्यान प्रागैतिहासिककालीन वसाहतींत सापडणाऱ्या बांबू-चिखलाच्या झोपड्या ‘वास्तू’ या प्रगल्भ अवस्थेस येऊन पोहोचल्या नव्हत्या. इ. स. पू. १०००-८०० च्या नंतर गंगा-यमुना यांच्या खोऱ्यांत जी काही नगरे उदयाला आली, त्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर सापडलेले नाहीत. तत्कालीन साहित्य, त्यानंतर लगोलग निर्माण झालेल्या वास्तू व शिल्पांतील प्रतिकृती यांवरून काही अंदाज बांधणे शक्य झाले आहे. मौर्यकाळात प्रथमच वास्तूंचे सुस्थित अवशेष मिळतात व तेथून पुढे भारतीय वास्तुकलेच्या प्रगतीचे एकसूत्री चित्रण करता येते. 

कालखंड : मौर्यकाळापासून पुढे दोन हजार वर्षे बांधण्यात आलेल्या वास्तूंचे ढोबळमानाने वर्गीकरण करून त्या त्या कालखंडांना विशेष नावे देता येतात. हे कालखंड व त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

(१) इ. स. पू. ५०० ते इ. स. १०० : बौद्ध-पूर्वखंड (हीनयान) मौर्य, शुंग, कुशाण व सातवाहन राजवंशांचा आश्रय व प्रोत्साहन. 

(२) इ. स. १००० ते इ. स. ७०० : बौद्ध-उत्तरखंड (महायान) आणि हिंदू व जैन-पूर्वखंड गुप्त, वाकाटक, बादामी-चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट.

(३) इ.स. ७०० ते इ.स. १२०० : हिंदू जैन मध्यखंड, चोल पांड्य, कल्याणी चालुक्य, होयसूळ, चंदेल प्रतिहार, पाल.

(४) इ. स. १२०० ते इ. स. १६५० : हिंदू-जैन-उत्तरखंड आणि इस्लामी कालखंड विजयनगर आमि इतर दाक्षिणात्य घराणी, दिल्ली व इतर प्रांत येथील इस्लामी राजवंश.

(५) इ. स. १६५० ते इ. स. १८५० : हिंदू-मराठा राजस्थानी घराणी.

(६) इ. स. १८५० ते इ. स. १९४७ : ब्रिटिश कालखंड (पाश्चात्य).

(७) इ. स. १९४७ च्या पुढे आधुनिक किंवा नवशैली.

साधने आणि तंत्र : वास्तुकलेच्या प्रगतीच्या दृष्टीने वास्तुरचनेसाठी वापरण्यात येणारी साधने आणि बांधकामाची तंत्रे ही महत्त्वाची ठरतात. मौर्यकाळातील उत्खनित अवशेष तसेच वाङ्‌मयातील वर्णने यांचा अभ्यास करता, वास्तुरचनेचे साधन किंवा माध्यम म्हणून लाकूड आणि कच्च्या वा भाजलेल्या विटा या दोन गोष्टींचा उपयोग केलेला दिसतो. स्तंभ आणि तुला यांची चौकट हाच वास्तूचा मुख्य आधार असून त्यांच्या जोडीला वीटकाम, छपरासाठी खंगरी कौले, भिंतीवर मातीचा लेप व त्यावर रंगकाम केले जात असे. वास्तुरचनेसाठी दगडाचा उपयोग प्रथम अशोकाच्या काळात झाला. मात्र त्यानंतर दोन शतके उलटली तरी, त्या साधनाचा वापर करण्यात वास्तुकारांना फारसे कौशल्या प्राप्त झाले नाही. दगड या पदार्थाच्या गुणावगुणाचे फायदे घेण्याऐवजी त्यांनी लाकडाच्या जागी दगडाचा उपयोग केला, एवढेच. स्तंभ, तुला, तोरणे ही लाकडी असावयाची त्याऐवजी ⇨ भारहूत,सांची इ. ठिकाणी ती दगडाची दिसतात. सातवाहन-गुप्त वंशांच्या दरम्यानच्या काळात ⇨ स्तूप व मंदिरवास्तू दगडाच्या व निवासस्थाने लाकूड-विटांची असा प्रघात रूढ झाला असावा. गुप्तकाळातील बहुतेक मंदिरे संपूर्णपणे दगडी बांधणीची असली, तरी पुढच्या काळात मंदिराच्या भिंती दगडी आणि शिखरे व छपराचे इतर भाग वीटकामाचे बांधण्यात येऊ लागले. इस्लामी कालखंडात सर्व तऱ्हेच्या वास्तूंना दगड वापरण्यात आले आणि दगडाचे लाल, पिवळा तसेच संगमरवरी असे विविध प्रकार वेगवेगळ्या कामांसाठी वा वास्तूसाठी उपयोगात आले. भिंती दगडी असल्या तरी, त्यावरही मातीचा लेप देऊन चित्रकाम करण्याची पद्धत कायम राहिली.

वास्तुरचनेत स्तंभ व तुला हेच महत्त्वाचे किंबहुना एकमेव घटक १२५० पर्यंत राहिले. या पद्धतीत वरचे मजले, छप्पर, शिखर हे सर्व भाग तुला व तुलांच्या द्वारे स्तंभांवर पेललेले असत. त्यांचे वजन प्रत्यक्षपणे भूपृष्ठापर्यंत पोहोचवले जाई. स्तंभ व तुला एकसंध असत व जितक्या लांबीचे स्तंभ व तुला यांचे ठोकळे जवळच्या खाणीत मिळतील, त्यावर वास्तूच्या स्तंभांची संख्या व मांडणी ठरत असे. गुप्त व गुप्तोत्तर हिंदू-जैन मंदिरांत अशाच ठोकळ्यांची रचना करण्यात येई. वरच्या दगडाचा संपूर्ण भार तुला व स्तंभ आणि भिंती यांवरच पडत असल्याने दोन दगड एकत्र ठेवण्यात चुना व तत्सम बंधन यांची जरूरी नसे. गुरुत्वाकर्षणाने हे काम सिद्धीस जाई. थरातील दगड एक जागी ठेवण्यासाठी आडव्या-उभ्या दगडांचे बंध तयार करण्यात येत, किंवा लोखंडी आकडेही वापरीत. मंदिरादी वास्तूंच्या भिंती साधारणपणे तीन ते पाच फुटांपर्यंत (एक ते दीड मी.) रुंद असत. सगळ्यात बाहेरच्या बाजूला एकाच पोताचा दगड बसवून त्यावर मूर्तिकाम करण्यात येत असे. रंगकामाचा वापरही केलेला दिसतो. जेथे असा एकसंध, सलग दगड उपलब्ध नसेल, तेथे विटांच्या इमारती बांधण्यात येत. या इमारतीसाठी लाकूड तरी वापरीत, किंवा ज्याला ‘फसवी कमान’ (फॉल्स आर्च) म्हणतात त्या पद्धतीच्या कमानी व घुमट वापरीत. या तंत्रात वरची वीट खालच्या विटेच्या थोडी पुढे येईल अशी रचना करून दोन्ही कडेच्या भिंती पुढे सरकत सरकत एकमेकांना मिळतात. यातही वजन प्रत्यक्ष भूपृष्ठापर्यंत जाते. सिंध व बंगाल येथे अशा विटांच्या देवालयांच्या बाहेरच्या बाजूवर सजावटीसाठी साच्यातून काढलेल्या नक्षीदार विटा वापरीत. या बांधकामासाठी चुना वा माती वापरण्यात येई व सजावटीसाठी रंगकाम करीत.


इस्लामी वास्तुकारांनी भारतात प्रथमच ⇨ कमानी व  ⇨ घुमट यांचा सरसहा उपयोग करण्यास आरंभ केला. मेसोपोटेमियात सुमेरियन काळापासूनच कमानीचा वापर होत असे. या कामाला मोठ्या एकसंध दगडाची वा लाकडी तुलांची गरज नसे. छोटे दगड चुन्याने एकत्र बांधून आच्छादन तयार करण्यात येई. हे छोटे दगड एका बाजूला रुंद व दुसरीकडे निमुळते असे घडवून अर्धवर्तुळाकृती आकारात एकत्र बसवीत असत. हे दगड बसविताना तात्पुरत्या आधारासाठी लाकडी सांगाड्याची गरज असे. सर्वांत शेवटी बसविलेल्या चावीच्या दगडामुळे (की स्टोन) सर्व घटक आपापल्या जागेवर घट्ट बसत. अशा प्रकारे कमानीवरील भिंतीचे वजन दोन्ही बाजूंना विभागले जाई, तर घुमटाचे वजन त्याच्या सर्व बाजूंना विखुरले जाई. या तत्त्वाचा सर्रास उपयोग इस्लामी वास्तुशिल्पात करण्यात येऊ लागला. हीच पद्धती तत्त्कालीन व त्यानंतरच्या हिंदू वास्तूकलेतही उचलण्यात आली. इस्लामी वास्तूंमध्ये मूर्तिशिल्पाचा वापर होत नसे. त्याऐवजी भौमितिक आकृतिबंध वा फुले, पाने, वेली इ. वनस्पतिजन्य नक्षी यांचे उत्थित शिल्पांकन व रंगकाम यांची योजना केली जात असे. ताजमहालासारख्या काही वास्तूंत संगमरवरी दगडावर इतर रंगांच्या दगडांचे जडावकाम केलेले दिसते. दक्षिणेकडे विशेषतः गुलबर्गा, बीदर इ. ठिकाणी झिलईच्या रंगीत कौलांचा वापर वास्तुशोभनासाठी केलेला दिसतो.

वास्तुप्रकार : ज्यांची वर्णने, प्रतिकृती वा अवशेष उपलब्ध आहेत, अथवा ज्या वास्तू प्रत्यक्ष उभ्या आहेत, त्यांचे नागरी, संरक्षक व धार्मिक असे तीन वर्ग करण्यात येतात. यांपैकी नागरी या वर्गात ⇨ नगररचना, गृह व राजप्रसाद, रस्ते, पूल, पाणीपुरवठा, बगीचे इत्यादींचा समावेश होतो. संरक्षक वास्तूंत शहराभोवतालची ⇨ तटबंदी, ⇨ किल्ले वा दुर्ग आणि सुसंरक्षित राजवाडे किंवा गढ्या यांची गणना होते. धार्मिक वास्तूंत मंदिरे, समाध्या, चैत्य, मशिदी इत्यादींचा अंतर्भाव होतो. नागरी शिल्पाचा अभ्यास करणे, तसेच त्याविषयी निश्चितपणे काही सांगणे अत्यंत कठीण आहे. बहुतेक प्राचीन नगरे नष्ट तरी झाली आहेत, किंवा त्यांची रचना नंतरच्या काळात पूर्णपणे बदलून गेलेली आहे. उत्खननातून ⇨ तक्षशिलेसारख्या एखाद्या नगराचा स्थूलमानाने आराखडा समजून आला, तरी त्यावरून एकूण नगररचनेविषयी सर्वसामान्य विधाने करणे अवघड आहे. घरे व राजप्रसाद तसेच नागरी उपयोगाच्या वास्तूही लाकूड आणि विटा यांच्याच बांधीत. त्यांचे आयुष्य शंभर ते जास्तीत जास्त दोनशे वर्षांपर्यंतच मर्यादित असे. सतराव्या-अठराव्या शतकात बांधलेले काही प्रासाद बऱ्यावाईट अवस्थेत उभे असले, तरी गृहरचना या विषयाचे तपशीलवार वर्णन करण्याइतपत प्रत्यक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. जे हाती लागते त्यावरून सांगता येते, ते सर्वसाधारणपणे असे : इमारतीचा आराखडा ठरीव प्रकारचा असे. मोठ्या खुल्या चौकाभोवती ओवऱ्या आणि दालने यांची मांडणी करीत. असे चौक संख्येने कितीही असत. रचनेच्या कामात लाकडी स्तंभ व तुला यांची चौकट हा महत्वाचा घटक असे. वीटकामाच्या भिंतीवर मातीचा लेप लावून चित्रकाम करण्यात येई. लाकडी भागांवर अथवा दगडी स्तंभतुला असल्यास त्यांवर कोरीव काम करण्यात येत असे. हीच पद्धत प्राचीन काळीही उपयोगात असावी, असे तत्कालीन वाङ्‌मयावरून दिसते. दुसरा वर्ग जो संरक्षक वास्तुशिल्पाचा, त्याही बाबतीत हेच दिसून येते. दुर्गांचे उल्लेख वैदिक काळापासून मिळत असले, तरी त्यावर सर्वांत प्राचीन अशी सविस्तर चर्चा कौटिलीय अर्थशास्त्रात सापडते. यात दुर्गांचे भू, जल, वन असे प्रकार, तसेच तट, खंदक, बुरुज अशा भागांचे वर्णन आढळते. पण ते त्रोटकच आहे. उज्जैन, कौशाम्बी अशा नगरांभोवची मातीचे प्रचंड तट उत्खननातून मिळाले आहेत. तसेच राजगृह, नागार्जुनकोंडा अशा ठिकाणांभोवतालच्या तटबंद्यांचेही अवशेष नोंदण्यात आलेले आहेत. परंतु त्यावरून त्यामागचे शास्त्र वा संप्रदाय यांचा बोध होत नाही. गुप्त व गुप्तोत्तर काळातील दुर्गांचे अवशेष उल्लेखनीय नाहीत. नऊ ते बारा या शतकांत नगरांभोवती उभारण्यात आलेले कोट प्रचंड दगडांचे असत आणि त्यात चुन्याचा वापर नसे. चौकोनी बुरुज हे या शिल्पाचे वैशिष्ट्य होच. मोगल-राजपूत-मराठा काळातील काही किल्ले व गढ्या बऱ्या स्थितीत उभ्या आहेत. यातील दौलताबाद, परेंडा यांसारखे किल्ले संरक्षक वास्तुशिल्पाचे उत्तम नमुने मानले जातात. भारतीय वास्तुकलेच्या अभ्यासकाला भरपूर साधने वा पुरावा हाती येतो, तो धार्मिक वास्तुशिल्पाच्या क्षेत्रात. स्वाभाविकच याच विषयासंबंधी निश्चित आणि सुसंगत माहिती देणे शक्य आहे. 

शैलशिल्प : बांधलेल्या वास्तूंप्रमाणे डोंगराच्या कुशीतून खोदूनही काही वास्तू तयार करण्यात आल्या, त्यांना शैलशिल्पे वा लेणी अशी संज्ञा आहे. बिहारमध्ये सर्वांत प्राचीन अशा गुंफा आहेत, त्या सम्राट अशोकाचा नातू दशरथ याने खोदविल्या. ईजिप्त, इराण या देशांत या आधी कित्येक शतके ही प्रथा चालू होती. अशोकाच्या काळात इकडे आलेल्या इराणी कलाप्रवाहाबरोबरच ही कल्पना येथे आली असावी. आरंभीच्या सुदामा आणि लोमश ऋषी या गुंफा म्हणजे झोपड्यांच्याच प्रतिकृती आहेत. ही प्रवृत्ती अखेरपर्यंत टिकून होती. लाकूड व वीट यांनी बांधलेल्या इमारतींची नक्कल दगडात कोरून काढण्याचा अट्टाहासच कलाकार करीत राहिले. या बांधकामाचा सर्व रचनात्मक तपशील आणि सजावट शैलशिल्पांत प्रामाणिकपणे प्रतिबिंबित झालेली आहे. नव्या माध्यमाला त्याची कितपत जरुर वा उपयुक्तता आहे त्याचा फारसा विचार झालेला नाही. सातवाहन काळात निर्माण झालेल्या शैलशिल्पात ⇨ चैत्य व  ⇨ विहार हे दोन प्रकार दिसून येतात. या इमारतींचा दर्शनी भाग आणि आतला सर्व भाग बारकाईने कोरलेला आहे. बाकीच्या तीन बाजू आणि छप्पर यांना मात्र परिस्फुटता लाभलेली नाही. पाच शतके हेच काम कलाकार करीत राहिले. त्यानंतर त्यांना या प्रयोगाच्या अपूर्णतेची जाणीव झाली आणि इमारतीची सर्वांगपरिपूर्ण प्रतिकृती तयार करण्याचा हव्यास मनात धरून डोंगर तासण्यास सुरूवात झाली. आता इमारतीच्या केवळ आतच जाता येणार नव्हते, तर भोवतालीही फिरता येणार होते. ⇨ महाबलिपुर येथील ‘रथ’, ⇨ वेरूळ येथील ‘कैलास लेणे’ व ‘छोटा कैलास’ ही मंदिरे आणि कलुगुमलईचे द्राविड व मसरूर येथील नागर शैलीतील अपूर्ण देवालये ही या नव्या प्रयोगांची किंवा जाणिवेची उदाहरणे होत. एकाच डोंगरातून किंवा पाषाणातून सबंध मंदिर खोदून काढणे, ही या कलाप्रवाहची अंतिम पायरी होय. वेरूळचे ⇨ कैलास लेणे हा या परंपरेतील सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणता येईल. यापुढे फारशी सैद्धांतिक प्रगती झाली नाही आणि अकराव्या शतकापर्यंत शैलशिल्पे अस्तित्वात आली, तरीही त्यातला जोम नष्ट झाला होता, परंपरा चालू राहिली इतकेच.

वास्तुशास्त्र : वास्तुशास्त्र म्हणजे इमारती बांधण्याचे व सजविण्याचे शास्त्र. या संबंधीच्या नियमांचा आणि तत्त्वांचा पारमार्थिक अन्वयार्थ लावण्यावर काही ग्रंथांत भर असला, तरी मूलतः ते एक व्यावहारिक शास्त्र आहे. ही शास्त्रे केव्हा निर्माण झाली, याविषयी एकमत नाही. ही शास्त्रे साक्षात्कारजन्य, दैवी आहेत असे समजणाऱ्यांच्या मताप्रमाणे ती अनादी काळापासून अस्तित्वात आहेत. उलट ही शास्त्रे मानवाने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली आहेत असे मानणारांचा जो वर्ग आहे, त्याच्या दृष्टीने व्यवहार व तत्त्व यांत कालदृष्टया फारसा फरक असू शकत नाही. म्हणजेच सध्या ज्ञात असलेल्या वास्तुशास्त्राचा जन्म गुप्तकाळात, क्वचित थोडासा आधी झाला. स्वाभाविकच प्रमाणभूत झालेलेल शास्त्रग्रंथ यानंतर म्हणजे गुप्तकाळाच्या शेवटी शेवटी निर्माण झाले आणि सोळाव्या शतकापर्यंत असे ग्रंथ निर्माण होत गेले. स्थलकालानुसार त्यात फेरबदल होत गेले, तरी साधारणपणे विषयाची मांडणी व मथितार्थ प्राचीन परंपरेला धरूनच आहेत. वास्तुशास्त्रामध्ये परिमाण, नगरे वा गृहे यांसाठी योग्य जागेची निवड, नगररचना, नगरसंरक्षण, गृहरचना, मंदिररचना यांवर विवेचन व नियम पहावयास मिळतात. मानसार शिल्पशास्त्र, मयमत, समरांगणसूत्रधार, प्रासादमण्डन, कश्यपसंहिता इ. या शास्त्रावरील विशेष प्रसिद्ध ग्रंथ होत.


वास्तुसंप्रदाय किंवा शैली : वास्तुशास्त्रात मंदिरांचे अनेक वर्ग व प्रकार कल्पिलेले आहेत. यात ‘नागर’, ‘वेसर’ व ‘द्राविड’ ही सर्वांत महत्वाची वर्गवारी होय. द्राविड म्हणजे दक्षिणदेशीय व नागर म्हणजे उत्तरदेशीय मंदिरे, परंतु वेसर ही संज्ञा कोणत्या मंदिराप्रकाराची हे नक्की सांगता येत नाही. आधुनिक अभ्यासकांनी आज उभ्या असणाऱ्या मंदिरांच्या समीक्षणावरून जे वर्गीकरण केले आहे, ते असे : गुप्त शैली, पल्लव शैली, चालुक्य, कल्याणी-चालुक्य, प्रतिहार, होयसळ, पांड्य, विजयनगर इत्यादी. या प्रत्येकाचे वैशिष्टय पुढे त्या त्या कालखंडाच्या वर्णनात दिले आहे.

समस्या : वास्तुकलेच्या आधुनिक अभ्यासाला आरंभ होऊन शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. इतकी वर्षे परंपरात्मक दृष्टिकोनातून तसेच आधुनिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून सतत अभ्यास झाला आहे व त्यातून भारतीय वास्तुकलेसंबंधी (विशेषतः धार्मिक) काही समस्या उत्पन्न झाल्या आहेत : (१) नागर, वेसर, द्राविड व अशासारख्या ग्रंथधारित वर्गीकरणाचे स्पष्टीकरण. (२) वास्तुशास्त्र व वास्तुकला यांचा परस्परसंबंध नक्की कोणत्या प्रकारचा आहे? (३) मंदिर ही वास्तू केव्हा व कोठे निर्माण झाली ? (४) आज उभ्या असणाऱ्या मंदिरांचे जे दोन प्रमुख वर्ग, नागर आणि द्राविड यांची उत्पत्ती केव्हा व कशी झाली असावी ? हे एकाच परंपरेचे स्वतंत्रपणे प्रगत होत गेलेले भाग समजावयाचे, की आरंभपासूनच या स्वतंत्र व पृथक परंपरा आहेत ? – आतापर्यंतच्या प्रयत्नांवरून यातील कोणत्याही समस्येचा निर्णायक उलगडा झालेला नाही, हे खरे असले तरी अलीकडच्या काळात पुरातत्त्वविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनावरून असे दिसते, की मंदिर ही वास्तू आपल्याला परिचित असणाऱ्या स्वरूपात गुप्तकाळात अस्तित्वात आली आणि सुरुवातीच्या काळात नागर व द्राविड हे घाट आजच्या इतके पृथक नव्हते व एकाच परंपरेतून निर्माण झालेली ती दोन अंगे होत, असे समजण्यास हरकत नाही. आजमितीला याविषयीचा काहीसा निर्णायक पुरावा ⇨ बादामी,पट्टदकल, ऐहोळे येथील मंदिरसमूहांत सापडतो.

ऐतिहासिक आढावा : लेखाच्या प्रारंभी नमूद केलेल्या कालिक वर्गीकरणानुसार स्थूलमानाने भारतीय वास्तुकलेचा इतिहास पुढे दिला आहे मात्र विवेचनाच्या सोयींसाठी इस्लामी व ब्रिटिश प्रभावाचे कालखंड शेवटी दिले आहेत.

बौद्ध : (इ. स. पू. ५०० ते इ. स. १००. मौर्य, शुंग, कुशाण, सातवाहन इ. राजवंश). सम्राट चंद्रगुप्त याची पाटलिपुत्र राजधानी अत्यंत वैभवशाली आणि भव्य वास्तूंनी युक्त होती. नगराभोवती प्रचंड लाकडी कोट असून त्याला ५६० बुरुज व ६४ दरवाजे होते. येथील राजवाडा हा एकबॅटना येथील राजवाड्यापेक्षा विस्तीर्ण होता. रस्ते प्रशस्त व सरळ होते. उत्खननात कोटाचे अवशेष तसेच राजवाड्यातील प्रमुख राजसभेचे अवशेष मिळाले आहेत. सु. २२५ चौरस फुट (सु. २०.९० चौ. मी.) अशा या सभेच्या स्तंभाचे तळखडे व स्तंभशीर्षे इराणी नमुन्याची होती. अशोकाने कित्येक स्तूप बांधल्याची आख्यायिका असली, तरी प्रत्यक्षात सांची स्तूपाचा सर्वांत आतला गाभा व नेपाळमधील पिप्रवा येथील स्तूपाचे अवशेष यांखेरीज या काळातील काहीही शिल्लक नाही. शैलशिल्पाचे सर्वात प्राचीन नमुने म्हणजे बिहारमधील लोमश ऋषी व सुदामा या गुंफा. त्या अशोकाचा नातू दशरथ याने आजीवक साधूंसाठी खोदविल्या. या गुंफा केवळ आकार व आराखडा या दृष्टीनेच झोपड्यांच्या प्रतिकृती आहेत असे नाही, तर त्या पूर्णपणे तशा दिसाव्यात यासाठी बाहेरच्या भिंतीवर गवताचा भास व्हावा अशी खटपट केली आहे. कालदृष्टया यापुढची वास्तू म्हणजे ⇨ भाजे येथील चैत्यगृह (इ. स. पू. दुसरे शतक). हे एक मोठे चापाकार दालन आहे व त्याच्या गोलाकार बाजूस स्तूपाची मांडणी आहे. या मंडपाच्या दोहो बाजूंस चिंचोळ्या ओवऱ्या आहेत. चैत्यगृहाचे छप्पर अर्धवर्तुळाकृती (गजपृष्ठाकार) आहे. दर्शनी भागाचे खाली स्तंभ आणि वर हे अर्धवर्तुळाकृती तोरण किंवा कमान हे दोन मुख्य भाग होत. हे स्तंभ आत झुकलेले व कमान किंचित पसरट आहे. छताला आतून तुला व उपतुला बसविण्यात आल्या आहेत. बांधीव चैत्यगृहात चैत्यतोरणाची कमान अटकेत रहावी यासाठी स्तंभ आत झुकविण्याची पद्धत असे, ती जशीच्या तशी येथे वापरण्यात आली आहे. डोंगरात खोदलेली कमान बहिर्गती दाब उत्पन्न करू शकणार नाही, हा विचार केलेला नाही. या नंतर खोदण्यात आलेले ⇨ कार्ले येथील चैत्यगृह आकाराने मोठे व लाकडी नमुन्यापासून दूर जाऊन शिलारचनेला जवळ येत चाललेले असे वाटते. त्याच्या दर्शनी भागावर दिसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती महायात काळात कोरण्यात आल्या. याच सुमाराला बेडसे, ⇨ कान्हेरी, पितळखोरे, ⇨ अजिंठा, कराड, जुन्नर, नासिक येथे, तसेच सौराष्ट्रामध्येही गुंफा खोदविण्यात आल्या. वरील नमुन्याला चैत्यगृहांबरोबरच धर्मप्रसारकांच्या निवासासाठी या प्रत्येक ठिकाणी विहारही खोदविण्यात आले. मध्यभागी मोठा चौरस मंडप आणि त्याभोवती छोट्या अनेक खोल्या, अशी विहारांची रचना असे. भाजे येथील विहाराचे दरवाजे व त्यावरील तोरणे ही सुद्धा लाकडी कामाला अगदी जवळची आहेत. दर्शनी भाग उघड्या ओवऱ्यांचा असे. या गुंफांच्या भिंतीवर मातीचे विलेपन करून रंगकाम अथवा चित्रकाम करण्यात येई. चैत्यगृहात स्तूप आहेत, पण या काळातील हीनयान पंथीयांच्या मंदिरात बुद्धमूर्ती सापडणार नाही.

भारहूत, सांची या ठिकाणी याच काळात स्तूप बांधण्यात आले. अर्धवर्तुळाकृती घुमटावर हर्मिका व छत्र, भोवताली प्रदक्षिणापथ व त्याभोवती दगडी वेदिका व तोरणे असत. अमरावतीला घुमटाच्या खालच्या भागावर दगडी शिल्पपट्ट बसविण्यात आले. जग्गय्यापेटा, नागार्जुनकोंडा या भागांतही स्तूपांचे अवशेष आहेत. पैकी ⇨ नागार्जुकोंडा येथील स्तूपांच्या आराखड्याची बाह्यकृती वर्तुळाकारच असली तरी आत चक्र, स्वस्तिक आहेत व ते विशिष्ट धर्मपंथांचे निदर्शक आहेत, असे समजले जाते. गांधार देशात उभारण्यात आलेल्या स्तूपांचे चौथरे खूपच उंच झाले आमि त्या वर कोनाडे करून बुद्धाच्या मूर्तीही बसविण्यात येऊ लागल्या. घुमट मात्र आकाराने फारच लहान होत गेले. बोधगयेचे महाबोधी मंदिर याच सुमारस बांधण्यात आले. आज जे मंदिर दिसते तशाच स्वरूपाचे मंदिर या काळात असावे. गांधार देशात सर्वत्र (तख्त-इ-बाही) व सांची, सारनाथ, मथुरा इ. ठिकाणी वरील नमुन्याचे रचलेले स्तूप, विहार व इतर वास्तू अस्तित्वात होत्या, त्यांपैकी काहींचे अवशेष उत्खननातून मिळाले आहेत मात्र त्यावरून तत्कालीन स्थापत्यतंत्राची कल्पना येत असली, तरी वास्तुकलेची येत नाही. [⟶ गांधार शैली].

बौद्ध-उत्तरखंड व हिंदू – पूर्वखंड : (इ. स. १०० ते ७००, गुप्त, वाकाटक, बादामी – चालुक्य, पल्लव व राष्ट्रकूट राजवंश). या काळात पूर्वी खोदण्यात आलेली शैलगृहे तर वापरात आलीच पण शिवाय अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद इ. ठिकाणी पूर्वीपेक्षा विस्तृत अशी नवीन चैत्यगृहे व विहार खोदण्यात आले. चैत्य गवाक्षाचा आकार, बुद्धाच्या मूर्तीचा आढळ व शिलालेख यांवरून या नव्या महायान शैलगृहांचा काळ सांगता येतो. काही चैत्य पूर्वीच्याच नमुन्याचे कोरले, पण थोड्याच अवधीत त्यांच्या स्वरूपात आमूलाग्र क्रांती होऊन ती बुद्धमंदिरे झाली. नव्या प्रकाराची कल्पना अजिंठा येथील गुंफा क्र. १ वरून येते. जरूर तेवढे बदल केलेला हा विहारच आहे. समोरची दर्शनी ओवरी, मधला चौकोनी मंडप आणि त्या भोवतालच्या खोल्या पूर्वीसारख्याच आहेत. मागच्या भिंतीत ज्या खोल्या आहेत, त्यातील मधली खूपच मोठी खोदून त्यात बुद्धमूर्ती बसविलेली दिसते. सर्व भिंतीवर अर्थातच रंगकाम आहे. सामुदायिक प्रार्थनेपासून वैयक्तिक मूर्तिपूजेपर्यंतच बौद्ध धर्मीयांचा प्रवास त्यांच्या वास्तुकलेत अशा प्रकारे प्रतिबिंबित झालेला दिसतो. वेरूळ येथे दोन किंवा तीन मजल्यांचे आणि आकाराने फारच प्रशस्त विहार पहावयास सापडतात. पण बौद्ध शैलशिल्पाची ही अंतिम मर्यादा होय. या परंपरेची केवळ प्रयोगक्षमताच नव्हे, तर चैतन्यही आता संपुष्टात आल्याचे दिसून येते.


हिंदू शैलशिल्पाचा सर्वांत प्रसिद्ध नमुना म्हणजे वेरूळचे कैलास लेणे होय. बांधलेल्या मंदिराची डोंगरात कोरलेली अत्यंत प्रामाणिक प्रतिकृती हे त्याचे वास्तुकलादृष्टया मूल्यमापन होय. विहाराच्याच आराखड्यात थोडासा बदल करून एकेक खोली ही एकेका मूर्तीचे घर बनविण्यात दाखविलेली कल्पकता या दृष्टीने दशावतार गुंफा, रामेश्वर गुंफा ह्या लक्षणीय आहेत तर गुप्तकालीन मंदिराचा सोप्यात सोपा आविष्कार फार कल्पकतेने उपयोगात आणल्याबद्दल ‘सीता-की-नहाणी’ हे लेणे प्रेक्षणीय मानता येईल.

सांची, तिगोवा यांसारख्या ठिकाणी सापडलेली मंदिरे पाचव्या शतकातील असून, मंदिराच्या कमीत कमी गरजा व गुप्त शैलीचा उगम उत्तम तऱ्हेने दाखवितात. वास्तुकल्प सर्वसाधारणपणे असा मूर्ती ठेवण्यासाठी एक चौकोनी बंदिस्त खोली म्हणजे गाभारा व तिच्या दारासमोर आडोसा म्हणून एक उघडी वीथिका. समोरच्या बाजूला चार स्तंभ चौकटीच्या बाहेर दोहो बाजूंस जाणारी गणेशपट्टी, त्या खाली असणाऱ्या गंगा-यमुनांच्या मूर्ती. स्तंभांवर पूर्ण कलशासारखी, गुप्त शैलीचे खास वैशिष्ट्य मानली जाणारी रूपके येथे वापरण्यात आलेली आहेत. बादामी, ऐहोळे, आलमपूर अशा दूरदूरच्या ठिकाणांपर्यंत ती त्यांच्या मूळ स्वरूपात प्रसृत झाल्याचे दिसून येते. सांची मंदिरानंतर अल्पावधीतच देवगढचे मंदिर अस्तित्वात आले. मंदिर उंच जोत्यावर असून एकाऐवजी चारही बाजूंना वीथिका आहेत व दरवाजा वगळता इतर तिन्ही भिंतींत प्रेक्षणीय मूर्ती बसविलेल्या आहेत. शिखराच्या स्वरूपाची मात्र कल्पना येत नाही.

ह्याच सुमारास, शंभर ते दोनशे वर्षांच्या काळात कुंतल देश (उत्तर कर्नाटक), आंध्र, सौराष्ट्र, ओरिसा अशा अनेक ठिकाणी लहान-मोठी मंदिरे उभारण्यात आली. सौराष्ट्रात गोप, रोडा, वसई ओरिसात परशुरामेश्वर आंध्र प्रदेशात आलमपूर कर्नाटकात ऐहोळे, बादामी, पट्टदकल येथे ही मंदिरे दिसतात. ऐहोळे येथील दुर्गा मंदिर, लाडखान मंदिर व वसईचे मंदिर यांचे आराखडे निरनिराळ्या प्रकारचे आहेत. दुर्गा मंदिर चैत्यासारखे चापाकार आहे. वसईचे मंदिर चैत्यासारखेच लंबचौकोनी पण बाजू वर्तुळाकार नाही. लाडखान मंदिर राहत्या घरासारखे, चौकाभोवती रचलेले आहे. ह्या सर्व वास्तू प्रायोगिक याच सदरात घालाव्या लागतील. इ. स. सहाव्या शतकाच्या शेवटी एक निश्चित आराखडा सर्वमान्य झाल्याचे दिसते : चौकोनी गाभारा, त्यापुढे अरुंद अशी ओवरी (अंतराळ) आणि पुढे मंडप (चौरस). पूजाअर्चेचे निरनिराळे प्रकार अस्तित्वात येऊ लागले, तसतसे भोगमंडप, नृत्यमंडप असे मंडप बांधण्यास आरंभ झाला. गाभाऱ्यावर शिखर, अंतराळावर शुकनास आणि मंडपावर आरंभी सपाट व नंतर शंकूच्या आकाराचे अशी छपरे असत. गाभाऱ्याच्या भोवताली प्रदक्षिणापथ ठेवण्याची व तोही गाभाऱ्याच्या शिखराखालीच सामावून घेण्याचीही पद्धती हळूहळू रूढ झाली.

सातव्या शतकाच्या अखेरीस स्पष्टपणे वेगळे असे नागर व द्राविड हे प्रमुख शैलीभेद निर्माण झाले : 

(१) नागर : चौकोनी गाभारा, लंबचौकोनी अंतराळ, चौकोनी मंडप, भिंतीमध्ये आडव्या थरांबरोबर उभे रथ किंवा प्रक्षेप, शिखर निमुळते, एकाच रेषेत वर झेपावत जाणारे, बघणाराचे लक्ष जमिनीपासून ते कलशापर्यंत नेणाऱ्या झेपावणाऱ्या रेषा हे या पद्धतीचे वैशिष्टय. वास्तूचा रोख उंचीवर, उर्ध्वगामी.

 (२) द्राविड : चौकोनी गाभारा, लंबचौकोनी अंतराळ, लंबचौकोनी मंडप, भिंतीत आडवे थर व त्यात उभ्या मांडणीबरोबर अनेक अर्धस्तंभ घालून बाह्य भिंतीचे विभाग पाडून वा कोनाडे तयार केलेले. त्यामुळे सरळ वर जाणारी रेषा भंग पावते. छपराची (शिखराची) रचना मजल्यामजल्यांची, वरचा मजला खालच्यापेक्षा थोडा लहान पण प्रत्येक मजला स्वतंत्रपणे उठून दिसणारा. यात बघणाऱ्याची दृष्टी एकदम वर जाण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वर जाते आणि सबंध मंदिराकडे पाहिल्यावर उभ्याऐवजी आडव्या, पसरत जाणाऱ्या प्रवृत्तीचा जोर जाणवतो. स्तंभ, स्तंभशीर्ष, तुला, हस्त, छतपट्ट्या, गलथे, द्वारशाखा अशा काही घटकांच्या आकारांत व सजावटीत फरक असला, तरी नागर आणि द्राविड या शैलींतील महत्त्वाचा भेद वरीलप्रमाणे ‘दर्शना’त आहे. एकदा हे प्राथमिक किंवा मूल स्वरूप प्राप्त झाल्यावर हिंदू मंदिरांची प्रगती एकदोन विशिष्ट दिशांनीच झाली. 

जैन वास्तुकलेची सर्वोत्तम उदाहरणे याच काळाच्या शेवटी शेवटी पहावयास मिळतात. ती बव्हंशी हिंदू शैलीशी जुळणारी असल्याने त्यांचे स्वतंत्र वर्णन केलेले नाही. एखाद्या टेकडीवर एकमेकांशेजारी अनेक मंदिरे उभारून मंदिर-समूह किंवा ‘बस्ती’ तयार करणे, हे जैन कलेचे वैशिष्टय. उदा., ⇨ पालिताणा येथील शत्रुंजय, गिरनार येथील अबू पर्वतावरील ⇨ दिलवाडा. दिलवाडा मंदिरातील अप्रतिम कोरीव काम तत्कालीन भारतीय मूर्तिकलेच्या परंपरेतीलच होय. गुणवत्ता श्रेष्ठ असली, तरी परंपरा तीच दिसून येते.

हिंदू व जैन – मध्य व उत्तर कालखंड : (इ. स. ७०० ते १२०० व १२०० ते १६५० . कल्याणी-चालुक्य, प्रतिहार, पाल, चंदेल्ल, यादव, होयसळ, विजयनगर). या आधीच्या कालखंडातील साधारण रूपरेषा आता अधिकाधिक तपशील भरून समृद्ध करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. अस्तिवात असणाऱ्या भागांच्या आकारमानात बदल करून, नवीन अंगोपांगे निर्माण करून, सजावटीसाठी निरनिराळी रूपके वापरून वास्तूत वैविध्य व वैचित्र्य आणण्यात आले.

नागर : मंदिराची वास्तू साधारण पुरूषभर उंचीच्या चौथऱ्यावर उभारीत. या चौथऱ्याच्या बांधणीत विविध घाटांचे थर दिसून येतात. त्यांवर नर, गज, अश्व यांच्या मालिका खोदण्यात येत. या चौथऱ्यावर गेल्यावर मंदिराचे जोते, पायऱ्या चढून आत गेल्यावर तीन बाजूंनी उघडा मंडप, त्याच्या आत बंदिस्त मंडप, नंतर अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असे. आतल्या मंडपाला, तसेच प्रदक्षिणापथालाही प्रश्सत सज्जे काढण्यात येत. भिंतीत आडवे थर असतच, पण जास्त महत्व मिळाले ते उभ्या मोडणीला. साधारण मध्यावर-या भागाला ‘जंघा’ म्हणतात-स्त्रीपुरुष, यक्षपक्षी, व्याल इ. मूर्ती कोरलेल्या आढळतात. खजुराहो येथील मंदिरात एकावर एक अशा दोन मूर्तिमालिका दिसतात. भिंतीच्या माथ्यावर सुबक आकाराच्या छतपट्ट्या, गलथे हे संपूर्ण मंदिराभोवती एकाच पातळीवर, एकाच आकाराचे व सलग असत. त्यावर शिखर किंवा छप्पर असे. मंडप, अंतराळ, गाभारा यांना प्रत्येकी स्वतंत्र छप्पर असले, तरी सर्वांची मिळून अशी योजना असे की, दृष्टी पायऱ्या-पायऱ्यांनी वर-वर जात गाभाऱ्याच्या म्हणजे सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचावी. या शिखरांभोवती तशाच शिखरांच्या अर्धाकृती व छोट्या प्रतिकृती यांची मांडणी असे. या संपूर्ण रचनेचा सम्यक परिणाम वर वर्णिलेली उर्ध्ववृत्ती कायम राखण्याकडेच असतो. यादवकालीन मंदिरांच्या शिखरांवर छोट्या प्रतिकृतींची योजना थोड्या निराळ्या प्रकारे असली, तरी परिणाम तोच जाणवतो. ओऱिसाच्या प्रगत मंदिरांतील शिखरांचा तपशील काहीसा भिन्न असला, तरी त्यामागची कल्पना एकच आहे. खजुराहो येथील ‘कंदरिया महादेव’ आणि भुवनेश्वर येथील ‘मुक्तेश्वर मंदिर’ हे नागर शैलीचे सर्वोत्तम आविष्कार होत.


द्राविड : द्राविड मंदिररचना त्यापेक्षा जास्त विविध रीत्या प्रकट झाली. पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिर पाहिले तर, जमिनीला समांतर आडवी पसरत जाणारी एक भिंत व त्याच्या एकाच बाजूवर मजल्या-मजल्यांचे शिखर दिसते. वास्तूच्या बाह्यरेषेत फारसा तोल दिसत नाही. महाबलिपुरच्या सागरमंदिरात हा तोल साधण्यासाठी मंडपावर एक शिखर उभारलेले दिसते. शिवाय मजल्याची लांबी, रुंदी व उंची यांचे प्रमाण अशा रीतीने बसवण्यात आले आहे, की दृष्टी मधे न अडखळता थेट कळसापर्यंत पोहोचावी. तंजावरच्या राजराजेश्वर मंदिरात हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे. ही उदाहरणे सोडली तर द्राविड शैलीची सर्वसाधारण प्रवृत्ती आडवा ताण कायम ठेवण्याचीच आहे. मंदिराची उंची वाढविण्याचा हव्यास दिसत नाही, विस्तार मात्र वाढतो. भोवतालच्या विस्तीर्ण आवारभोवती प्राकार उभारण्यात आले व त्यांच्या प्रवेशद्वारावर उत्तुंग गोपुरे उठविण्यात आली. मदुराई किंवा श्रीरंगपट्टण येथील गोपुरे अत्यंत प्रेक्षणीय होत. एकावर एक चढत जाणाऱ्या मजल्यांच्या बाह्यरेषा सफाईने जुळविण्यात आल्या आहेत. मूर्तिकामाची खेचाखेच व भडक रंगकाम असूनही या इमारीचे एकरूपत्वे कमी होत नाही. प्राकाराच्या आत मंदिराच्या वास्तूपासून अलग असे मंडप बांधण्याची प्रथाही द्राविड शिल्पात दिसून येते.

हिंदू मंदिर हे आता नागर व द्राविड या दोन्ही शैलींत वास्तुकलेपेक्षा मूर्तिकलेचाच आविष्कार अधिक ठरते. वास्तुकार हा छायाप्रकाशाच्या खेळाने नटलेले एक शिल्प तयार करू लागला, ह्याची साक्ष उत्तर चालुक्य व विशेषतः होयसळ मंदिर-शिल्पे उत्तम रीत्या पटवितात, हळेबीड मंदिर या दृष्टीने पहावे, म्हणजे ह्याचा प्रत्यय येईल.

हिंदू-मराठा : (इ. स. १६५० ते १८५०. राजपूत-मालव-मराठा). इस्लामी राजसत्तेच्या ऐन अमदानीत नवी मंदिरे उभारणे ही गोष्ट तुंगभद्रेच्या उत्तरेला जवळपास अशक्यच होती. मोगल काळाच्या शेवटी-शेवटी राजस्थान, माळवा व महाराष्ट्र येथे अनुकूल स्थिती निर्माण झाली. पहिल्या दोन ठिकाणी आधीच प्रचलित असणाऱ्या नागर शैलीतच मंदिरे बांधण्यात आली. महाराष्ट्रात यादव-हेमाडपंती म्हणजे ‘भूमिज’ नमुन्यावर देवालये बांधण्यात आलीच, पण त्यास एक स्वतंत्र घाटही देण्यात आला. यात द्राविड पद्धतीच्या शिखरांचे अनुकरण, संस्करण केलेले दिसते. तसेच कमानी, सुरूचे खांब यांसारखी इस्लामी अंगेही उचलण्यात आली. माळव्यात महेश्वरला आणि महाराष्ट्रात पुणे, पंढरपूर, कोल्हापूर इ. ठिकाणी ह्या नव्या पद्धतीची मंदिरे पहावयास सापडतात. [⟶ मंदिर-वास्तुकला].

(भारताच्या इतिहासात जे वेगवेगळे राजवंश किंवा घराणी होऊन गेली, त्यांवर स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., गुप्तकाल कुशाण वंश चंदेल्ल घराणे चालुक्य घराणे चोल वंश पल्लव घराणे मौर्यकाल यादव घराणे राष्ट्रकूट घराणे वाकाटाक घराणे विजयनगर साम्राज्य शुंग घराणे सातवाहन घराणे होयसळ घराणे इत्यादी. त्या त्या वंशाच्या कारकीर्दीतील कलांचा स्थूल मानाने थोडक्यात आढावा त्या त्या नोंदीत दिलेला आहे).

माटे, म. श्री.

इस्लामी वास्तुशैली : साधारणतः बाराव्या शतकापासून इस्लामी शैलीच्या वास्तू भारतात विशेषत्वाने बांधल्या जाऊ लागल्या. दिल्ली व आसपासचा परिसर हेच त्याचे प्रामुख्याने काही काळ केंद्र होते. हिंदूंची मंदिरे पाडून त्या वास्तुसामग्रीमधून ⇨ मशिदी बांधण्यात आल्या. पुढे चौदाव्या शतकात फिरोझशाह तुघलक याने मशिदी, राजवाडे वगैरे वास्तू विपुल प्रमाणात बांधल्या. त्यावरून छज्जे, घुमट, कमान, स्तंभ या वास्तुघटकांचे बरेचसे भारतीयीकरण झाल्याचे प्रत्ययाला येते. काही काळानंतर भिन्न प्रदेशांत स्वतंत्र राज्ये झाली, त्यामुळे वास्तुनिर्मितीही भिन्नभिन्न मार्गांनी होऊ लागली. अर्थात त्याचे कार्यक्षेत्र मशिदी, राजवाडे, कबरी यांपुरतेच मर्यादित होते. दख्खन, बंगाल, उत्तर प्रदेशातील जोधपूर, मध्य प्रदेशातील मांडू, गुजरात इ. ठिकाणी पुढील दोन शतके इस्लामी शैलीची वास्तुनिर्मिती होत राहिली. त्यांपैकी विजापूर येथील ⇨ गोलघुमट, इब्राहीम रोझा, अहमदाबाद येथील जामी मशीद, रानी सिप्रीचा दर्गा, गुलबर्गा येथील जामी मशीद इ. वास्तू ह्या इस्लामी वास्तुशैलीचा नितांतसुंदर आविष्कार घडविणाऱ्या आहेत. [⟶ अहमदाबाद वास्तुशैली]. त्यांवरील इराण, अरबस्तान इ. पश्चिमी मुस्लीम राष्ट्रांचा प्रभाव हळूहळू कमी होत जात मोगल राजवटीपर्यंत ‘भारतीय-इस्लामी’ ही नवी संमिश्र शैली उदयास आली. त्या काळातील हिंदू राज्यकर्त्यांनीही भारतीय परंपरेतील वास्तुनिर्मिती चालू ठेवली. मानसिंह तोमर याने ग्वाल्हेर येथे ‘मानमंदिर’ हा राजवाडा सु. १५०७ मध्ये बांधला.

भारतीय-इस्लामी शैली : हुमायून या मोगल बादशहाने ही शैली अस्तित्वात आणली व पुढे ती विलक्षण वेगाने विकसित होत गेली. लाल वालुकाश्म, पत्थर आणि संगमरवर हे वास्तुसाहित्य या काळात प्रामुख्याने प्रचलित होते. हुमायूनची कबर ही त्यातील महत्वपूर्ण वास्तू होय. अकबराने आग्रा किल्ला बांधला व ⇨ फत्तेपुर सीक्री हे नवे शहर वसविले. येथील बुलंद दरवाजा, जामी मशीद ही या वास्तुशैलीची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात. याशिवाय पंचमहल, दिवाण-इ-आम, जोधाबाईचा प्रासाद वगैरे अनेक शैलीदार वास्तू येथे आहेत. स्तंभ-तुळई-रचनापद्धतीचा अवलंब हे या शैलीचे प्राणतत्व आहे. कमान-रचना येते अभावानेच आढळते. अकबराचा पुत्र जहांगीर याने आग्रा येथे बांधलेली इतमाद उद्दौला कबर इराणी धर्तीच्या भरीव कामाचा कलात्मक आविष्कार मानला जातो. मोगल शैलीचा अत्त्युच्च विकास शाहजहानच्या कारकीर्दीत झालेला आढळतो. दिल्लीचा लाल किल्ला, आग्र्याचा ताजमहाल, जामी मशीद, मोती मशीद वगैरे अप्रतिम वास्तू या काळात बांधण्यात आल्या. त्यांपैकी ⇨ ताजमहाल ही उत्कृष्ट वास्तू अनेक दृष्टिकोनांतून अभ्यसनीय ठरते. औरंगजेबाच्या राजवटीपासून या शैलीचा अस्त होत गेला. [⟶ इस्लामी वास्तुकला]. 


ब्रिटिश कालखंड : साधारणपणे सोळाव्या शतकापासून पाश्चात्या वास्तुशैलींचे प्रतिध्वनी भारतात उमटू लागले. पोर्तुगीजांनी गोवा येथे बांधलेल्या विविध प्रकारच्या वास्तू ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे होत. नंतर ब्रिटिश राजवटीत यूरोपातील नव-अभिजाततावादी शैलीवर आधारलेल्या अनेक शासकीय वास्तू भारतात बांधल्या गेल्या. उदा., कलकत्ता येथील ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल’ (१९०८-१२), मुंबईतील ‘व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन’ (१८८८), हायकोर्ट इत्यादी. गॉथिक, प्रबोधनकालीन, बरोक इ. पाश्चिमात्य शैलींच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या वास्तूंमध्ये भारतीय शैली-वैशिष्ट्यांचा तसा अभावच जाणवतो. 

यानंतर मात्र ब्रिटिशांनी शासकीय बांधकामे भारतीय घाटाची दिसावीत, असा प्रयत्न केलेला दिसतो. दिल्लीतील ‘राष्ट्रपति-भवन’,तसेच सचिवालय या वास्तुसमूहामध्ये (१९१३-३०) फतेपूर सीक्री व सांची स्तूपामधील वास्तुघटकांचा वापर दिसतो. मुंबईमधील ‘गेटवे ऑफ इंडिया’ संपूर्ण अहमदाबाद वास्तुशैलीत आहे तर ‘म्यूझियम’ व ‘जनरल पोस्ट ऑफिस’ या वास्तूंमध्ये विजापूर शैलीचा प्रभाव दिसून येतो. आधुनिक रचना-माध्यमातील भारतीय वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण म्हणजे मुंबईचे ‘बॉम्बे सेन्ट्रल स्टेशन’ हे होय. स्वातंत्र्योत्तर काळातील ⇨ चंडीगढ शहराची ल कॉर्ब्यूझ्येने आधुनिक शैलीमध्ये केलेली नगररचना (१९५०) ही एक महत्वपूर्ण घटना होय. सलोह काँक्रीट हे त्याचे प्रमुख माध्यम होते. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारतीय वास्तुकला प्रचारात आली, असे म्हणता येईल. [⟶ भारत : वास्तुकला].

दीक्षित, विजय

संदर्भ :

1. Acharya, Prasanna Kumar, Ed. An Encyclopaedia of Hindu Architecture : Manasara Series, Vol, VII, Bombay, 1946.

2. Bhattacharya, Tarapada, The Canons of   Indian Art or A Study of Vastuvidya, Calcutta., 1963.

3. Brown, Percy, Indian Architecture, 2 Vols., Bombay, 1959.

4. Dutt, B. B. Town planning in Ancient India, Delhi, 1929.

5. Fergusso, J. History of Indian and Eastern Architecture, 2 Vols, Delhi, 1967.

6. Gangoly, O. C. Indian Architecture, Bombay, 1946.

7. Govt. of India Publications Division, 5000 Years of Indian Architecture, Delhi, 1960.

8. Havell, E. B. Indian Architecture, New Delhi, 1972,

9. Havell, E. B. The Ancient and Medival Architecture of India : A Study of Indo-Aryan Civilisation, New Delhi, 1972.

10. Kramrisch, Stella, The Hindu Temple, 2 Vols., Delhi, 1980.

11. Nilsson, Sten, European Architecture in India, 1750-1850, London, 1968.

12. Rowland, B. Art and Architecture of India, Baltimore, 1959.

13. Soundara Rajan, K. V. Indian  Temple – Styles : The Personality of Hindu Architecture, New Delhi, 1972


‘रायटर्स बिल्डिंग्ज ’, कलकता (१७८०)-टॉमस लॉयन.

पाटलिपुत्र नगराभोवतीचा लाकडी कोट : उत्खननातील अवशेष, मौर्यकाल (इ.स.पू.३२१ १८५).
इतमाद उद्दौला कबर, आग्रा, इ.स.१६२६-१६२८. कोटा यथील ‘ सिटी पॅलेस ’चा अलंकृत दर्शनी भाग, १८ वे शतक.
नालंदा विघापीठ, ५ वे शतक. लोमश ऋषीची गुंफा, बराबर,ई.स.पू.सु.२५०.
भाजे यथील चैत्यगृह, इ.स.पू.सु.५०.