भाण : संस्कृतीतील दशरूपकांपैकी-म्हणजे दहा नाटयप्रकारांपैकीएक. भरताने ह्या नाटयप्रकाराच्या केलेल्या व्याख्येप्रमाणे भाण ही एकांकी नाटयरचना असून ती एकहार्य (एकाच पात्राने सादर करावयाची) असते. हे पात्र म्हणजे धूर्त किंवा विट. हा एक तर स्वतःचे अनुभव कथन करतो किंवा इतरांच्या अनुभवांचे वर्णन करतो. भाण हा नाटयप्रकार एकहार्य असल्यामुळे त्यात संवाद नसतात एकभाषित असते. ह्या एकभषितात अनेक अवस्था, घटना, पात्रे ह्यांचे निर्देश येतात. ते करण्यासाठी विटाला ‘आकाशभाषित’- नामक नाट्योक्तीचा अवलंब करावा लागतो. म्हणजे असे, की ती ती पात्रे प्रेक्षकांना दिसत नसली, तरी कुठे तरी वर, आकाशात, उपस्थित आहेत असे मानून विट त्यांच्याशी बोलतो. तो त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यांची उत्तरे ऐकल्यासारखे करून किं ब्रवीषि (काय म्हणतोस ?) असे म्हणून ती उत्तरे प्रेक्षकांच्या सोयीसाठी बोलून दाखवतो. अशा प्रकारे प्रश्नोत्तरांची किंवा उक्ति-प्रयुक्तींची मालिका गुंफून आकाशभाषिताच्या तंत्राने संवादाचा भास उत्त्पन्न केला जातो. ह्या नाट्यप्रकारात बोलण्यावर भर असल्यामुळे आणि त्यात एकाच पात्राच्या उक्ति-प्रयुक्तींच्या रूपाने नाटय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचे असल्यामुळे त्याला भाण हे नाव देण्यात आलेले आहे. ‘भारती’ किंवा ‘वकतृत्वपूर्ण’ शैली ही भाणातली प्रमुख वृत्ती मानली जाते.
एकाच पात्राकडून विविध व्यक्ती, घटना किंवा प्रसंग समूर्त करावयाचे, तर भाणातील एकमेव पात्र विट हा समर्थ नट असला पाहिजे. कथन – वर्णन करताना योग्य आरोहावरोहाने साधलेला वाचिक अभिनय भाणात विशेष महत्त्वाचा आहे. तथापि आंगिक अभिनयातही तो निपुण हवाच कारण ‘भाण’ हे भाषण किंवा निवेदन नसून ‘नाट्य’ आहे. हे लक्षात घेतले, म्हणजे कथन-निवेदनाने सुचविलेले प्रसंग, व्यक्ती विटाने अभिनयाच्या अंगांनी प्रत्यक्षवत साकार करवयाचे असतात, हेही कळून येते.
धनंजयाने आपल्या दशरूपकात भाणाविषयी अधिक माहिती दिली आहे. भाणात धूर्तचरित असते (म्हणजे तरूण, सुखलोलुप, स्वच्छंद वृत्तीच्या, परंतु रसिक आणि प्रसंगोपात्त धाडसी अशा युवकाचे जीवन कवी कल्पित कथेच्या रूपाने भाणात दाखवीत असतो) शौर्य आणि सौभाग्य ह्यांच्या वर्णनाने वीर आणि शृंगार ह्या रसांची निर्मिती भाणात केली जाते, असे धनंजय म्हणतो. भाणाच्या रचनेत लास्यांगाचा समावेशही धनजयाने केलेला आहे. लास्यांग म्हणजे भाषेच्या व अभिनयाच्या साहाय्याने संवाद रंजक, काव्यमय व नाट्यमय करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती वा युक्ती.
नाटकलक्षणरत्नकोशाचा कर्ता सागरनंदी सुचवितो, की भाणातील एक पात्र स्त्रीही असू शकेल. भाणातील वर्णन-कथन अंगहारांनी, म्हणजे नृत्यतंत्राचा अवलंब करून, दाखवले जाण्याची शक्यता स्वीकारली, तर स्त्री-पात्राची योजनाही उचित म्हणता येईल. शिवाय सर्व नाट्यप्रयोग केवळ स्त्रीनटांनी सादर केल्याचे पुरावे संस्कृत नाट्य साहित्यात आहेतच.
रामचंद्र-गुणचंद्र ह्या लेखकद्वयाने (नाट्यदर्पण २-८१-८२) भाणात वीर आणि शृंगार हे प्रधान रस असल्याचे मान्य करून, शृंगाराचे अंग म्हणून हास्याचाही समावेश भाणात होतो, असे सुचविले आहे. विट आणि धूर्त (द्यूतकार वगैरे) ह्यांच्या अनुषंगाने शृंगाराच्या संदर्भात वेश्या, कुट्टनी इत्यादींचे वृत्त भाणात येऊ शकते राजपुत्रांच्या चातुर्याचे वृत्त कथन करताना धाडस, पराक्रम ह्यांच्या जोडीने फसगतीचे-फसवुकीचे प्रकारही येऊ शकतील. रंजन व बोध हा भाणांचा मुख्य हेतू. फसवुकीच्या वर्णनाने प्रेक्षकांची करमणूक तर होईलच परंतु आपण आपल्या जीवनात वंचनेला कसे तोंड द्यावे, हा धडाही प्रेक्षकांना मिळू शकेल. म्हणजे रंजन आणि बोध हे दोन्ही भाणामुळे साधतात, असे नाटयदर्पणकार सुचवितात. नाटयशास्त्रावरील विविध ग्रंथकर्त्यांनी भाणाच्या स्वरूपासंबंधी मांडलेले हे विचार प्रत्यक्ष रचनांवरूनच त्यांना सुचले असतील ह्यात शंका नाही. उपलब्ध भाणांमध्ये वंचना व प्रणयशृंगार आढळून येतोच. संस्कृत नाट्यसंकेताप्रमाणे विट हा संस्कृतभाषी आहे. तो सुविध, रंगेल, रसिक असतो. त्याच्या उक्तींत परिहास व नर्मविनोद दिसून येतो अवलोकनात मार्मिकपणाचा प्रत्यय येतो. समाजजीवनाचे एक दिलखुलास चित्र भाणामधून आकारास येते. आरंभीच्या भाणांचा वाङमयीन दर्जा चागंला असला, तरी पुढे मात्र त्यांतील परिहासात ग्राम्यता येऊ लागल्याचे दिसते. त्याचप्रमाणे एकमुखी भाषणाचे साधे रूप पालटून पांडित्य आणि अलंकरण ह्यांनी नटलेल्या एखाद्या प्रबंधाचे रूप त्याला येत गेले.
भट, गो. के.
“