भवभूति : श्रेष्ठ संस्कृत नाटककार, आपल्या नाटकाच्या प्रारंभकांतून त्याने काही आत्मचरित्रात्मक माहिती दिली आहे. ती अशीः त्तैत्तिरीय शाखेच्या कृष्णयजुर्वेदी ब्राम्हणकुलात त्याचा जन्म झाला. त्याचे घराणे अग्निहोत्री होते. त्याचे गोत्र काश्यप. त्याच्या पित्याचे नाव नीलकण्ठ आईचे जातुकर्णी.भट्टगोपाळ हे त्याच्या आजोबांचे नाव. भवभूतीच्या कुटुंबात सोमयाग केला जात असे आणि त्याच्या पाचव्या पूर्वजाने वाजपेय यज्ञ केला होता. भवभूतीला ‘श्रीकण्ठ’ ही उपाधी प्राप्त झालेली होती. ‘भवभूती’ हे त्याचे प्रचलित नाव म्हणजे त्याने मिळविलेली एक उपाधीच होय, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. उदुंबर हे भवभूतीचे आडनाव. पदमपूर येथेतो राहत असे. डॉ. वा. वि. मिराशी ह्यांच्या मते हे पदमपूर म्हणजे विदर्भातील भंडारा तालुक्यात असलेले पदमपूर होय. ज्ञाननिधी नावाच्या गुरुकडे भवभूतीने अध्ययन केले. वेद, उपनिषेदे, सांख्य आणि योग ह्यांचा अभ्यास त्याने केला. त्याचप्रमाणे व्याकरण, अलंकारशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांवरही प्रभुत्व मिळविले. त्याच्या ह्या व्यासंगाचा प्रत्यय त्याच्या नाट्यकृतींतून प्रत्ययास येतो. त्याने स्वतःच्या काळाविषयी मात्र कोणतेच विधान केलेले नाही. काश्मीरी कवी कल्हण ह्याने आपल्या राजतरंगिणीत भवभूतीचा तसेच गउडवहो ह्या प्रकृत काव्याचा कर्ता वाक्पतिराज ह्याचा उल्लेख केलेला असून हे दोघे कनौजच्या यशोवर्म्याच्या (ह्याच्या कारकीर्दींचा काळ निश्चितपणे ठाऊक नसला, तरी तो साधारणपणे ७०० ते ७४० असा मानला जातो.) आश्रयास होते, असे म्हटले आहे. गउडवहोत वाक्पतिराजाने भवभूतीची स्तुती केलेली आहे. गउडवहोत यशोवर्म्याच्या दिग्विजयाचे व त्या अनुषंगाने त्याने केलेल्या गोंडराजाच्या वधाचे वर्णन आले आहे. ह्या काव्याच्या रचना सु. ७२५ मध्ये झाली असावी. पुढे काश्मीरचा राजा मुक्तापीड ललितादित्य ह्याने ७३६ नंतर केव्हा तरी (बहुधा ७४० मध्ये) यशोवर्म्याचा पराभव केला. गउडवहोत भवभूतीचे जे उल्लेख आले आहेत, ते पाहता, भवभूतीने यशोवर्म्याचा हा पराभव पाहिलेला नसावा. पा. वा. काणे ह्यांनी ७०० ते ७३० हा भवभूतीच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा काळ मानला आहे, तर ए. बी. कीथच्या मते भवभूती ७०० च्या सुमारास केव्हा तरी होऊन गेला असावा. हे सर्व लक्षात घेता, सातव्या शतकाची अखेर ते सु. ७२५ ह्या कालखंडात भवभूतीची वाङमयीन कारकीर्द झाली असावी.
भवभूतीने तीन नाटके रचिली : महावीरचरित, ⇨ उत्तररामचरित आणि मालतीमाधव. त्यांपैकी पहिली दोन रामकथेवर आधालेली असून तिसरे सामाजिक आहे. कालप्रियनाथाच्या जत्रेत ह्या नाटकांचे प्रयोग केले जात. वा. वि. मिराशी ह्यांच्या मते, हा कालप्रियनाथ म्हणजे सूर्य असून कालप्रिय म्हणजे कनौजच्या दक्षिणेस, यमुनातीरावर वसलेली काल्पी होय कनौजचा राजा यशोवर्मा ह्याचा आश्रय मिळाल्यानंतर हा वैदर्भीय कवी माळव्यात गेला असावा.
भवभूतीच्या महावीरचरिताचे सात अंक असून त्यांत रामायणातील पहिल्या सहा कांडांतील कथाभाग (रामाचे विश्वामित्रांच्या आश्रमात आगमान झाल्यापासून तो अयोध्येस परत येईपर्यंतचा) आला आहे. हस्तलिखिते आणि संस्कृत टीकाकारांच्या पुराव्यांवरून भवभूतीने अंक ५ श्लोक ४६ पर्यंतचे नाटक लिहिले आणि पुढील सात अंकांपर्यतचा भाग अन्य कोणी लिहिला, असे मत मांडले जाते. उत्तररामचरिताच्या सात अंकांत रामकथेचा उत्तरार्घ भवभूतीने रंगविला आहे. ध्येयनिष्ठेच्या आहारी जाऊन रामाने केलेल्या सीतात्यागापासून रामसीतेच्या पुनर्मीलनापर्यंतची कथा त्यात नाट्यरूप घेते. मालतीमाधव ही एक प्रेमी युगुलाची दहा अंकांची ‘प्रकरणनाट्य’ कहाणी. अनेक संकटे पार केल्यानंतर त्यांचे मीलन कसे होते, हे त्यात दाखविले आहे.
कीर्ती आणि मानमान्यता प्राप्त करून घेण्यासाठी भवभूतीला त्याच्या आयुष्यात बरेच झगडावे लागले असावे, असे दिसते. ‘माझ्या प्रतिभेला न्याय देणारा सहृदय आत्मा कधी तरी, कोठे तरी भेटेलच काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे’, अशा आशयाचे उदगार त्याने काढलेले आहेत. बाणाप्रमाणेच अनुभवसमृद्ध जीवन तो जगला असावा. त्याचे अंतःकरण मूलतः कवीचे होते आणि त्याच्यातला कवी त्याच्या नाटकांतून प्रकर्षाने प्रकट झालेला आहे. भवभूतीची नाटके म्हणजे नाट्यात्म काव्येच होत, असेही म्हटले जाते. तो वेदान्ती पंडित होता परंतु त्याची नाटके पांडित्यजड झाली नाहीत. उलट वेदान्ती बैठकीवर जीवनाची व्यापक आणि सखोल जाणीव त्याने आपल्या नाटकांतून व्यक्त केली. आवर्त, बुदबुद, तरंग हे एकाच जलाचे केवळ विकार त्याप्रमाणे जीवनातले सारे रस म्हणजे एका करुण रसाचाच आविष्कार असे उत्तररामचरितात त्याने सुचविले आहे. राम-सीता, जनक-कौसल्या, मालती-माधव ह्यांसारख्या व्यत्त्किरेखांच्या उत्कट भावजीवनाचे दर्शन त्याच्या प्रतिभेने घडविलेच परंतु जीवनाचे आणि निसर्गाचे रौद्रभीषण रूपही त्याने दाखविलेल आहे. भवभूतीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय म्हणजे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत अगतिक झालेल्या स्त्रीजीवनावर भास-कालिदासादिकांनी पतिप्रेमाची शाल घातली भवभूतीने स्त्रीदुःखाला वाचा फोडली. तथापि कलात्मक अलिप्ततेचा काही वेळा जाणवणारा अभाव, कल्पनांची पुनरुक्ती, शब्दावडंबर असे भवभूतीच्या नाट्यलेखनातील काही दोषही समीक्षकांनी दाखवून दिलेले आहेत. त्याला विनोदाचे वावडे आहे, अशीही टीका त्याच्यावर केली जाते. ती पूर्णतः बरोबर नसली, तरी खेळकरपणापेक्षा गांभीर्याकडे त्याचा कल अधिक आहे, हे स्पष्ट दिसते.
भवभूतीच्या नाट्यकृतींची अन्य भाषांत भाषांतरे झालेली आहेत (महावीरचरित -इंग्रजी उत्तररामचरित -इंग्रजी, फ्रेंच मालती -माधव -फ्रेंच, जर्मन, इंग्रजी).
संदर्भ : 1. Bhat, G. K. Bhavabhuti, Delhi.
2. Dasgupta, S. N. De, S. K. A History of Sanskrit Literature, Classcal Period, Calcutta, 1962.
भट, गो. के.