भद्रदंती : (चिनी एरंडी क. विलायती हरळू, सिमेअवडाला सं. बहद्दंती, ज्योतिष्क, विरेचनी, विषभद्र इं. कोरल प्लँट लॅ. जट्रोफा मल्टिफिडा कुल-यूफोर्बिएसी). ह्या सुंदर झुडपाचे किंवा लहान वृक्षाचे मूलस्थान दक्षिण अमेरिका असून हा भारतात व इतरत्र बागेत शोभेकरिता लावतात. याची उंची २-३ मी. असून खोडावर साधी वाटोळी, पण पंजासारखी विभागलेली व ७.५-१२.५ सेंमी. व्यासाची, लांब देठाची पाने असतात. पानाचे सु. ५-११ खंड अरूंद, भाल्यासारखे व लांबट टोकदार असतात उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली उपांगे) बारीक व विभागलेली फुलोरा उंच अक्षावर असलेली कुंठित व पसरट वल्लरी [⟶ पुष्पबंध] फुले एकलिंगी व एकाच झाडावर व पोवळ्यासारखी लाल नर-पुष्पातील बियांत पाच प्रपिंडे (ग्रंथी) संदले व प्रदले प्रत्येकी पाच स्त्री-पुष्पे मध्यवर्ती व त्यांतील कुंभाकृती [⟶ फूल]. फळ (बोंड) नरम व खाली निमुळते, वर रूंदट, मोठे (सु. २.५ सेंमी. लांब), त्रिखंडी व पिवळे बिया २-४, लंबगोल-आयात, सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या). इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ यूफोर्बिएसीत (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
जावा व फिलिपीन्समध्ये कुंपणाऱ्या कडेने ही झाडे लावतात. त्यांची मांसल मुळे भाजून खातात सर्व वनस्पती मत्स्यविष म्हणून वापरतात. इंडोचायनात सुक्या मुळांचा काढा अजीर्णावर देतात तो पौष्टिकही असतो. फळ विषारी असून ते वांतिकारक (ओकारी आणणारे) असते त्यामुळे पोटात तीव्र दाहयुक्त वेदना होतात. मेक्सिकोत पानांची भाजी करतात कोस्टा रीकात कोवळा पाला खातात. गियानात बिया रेचक व वांतिकारक म्हणून वापरतात. कांपूचियात पानांचा खरजेवर व कंडूवर उपयोग करतात. वनस्पतील चीक जखमांवर लावतात. बियांतील तेल गर्भपातक असते. खोडातील चिकांत ०.३% पिवळट हिरवे बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारे) तेल असते. त्याला कांद्याचा वास येतो व ते प्रथम थंड वाटते परंतु नेतर त्याची शिसारी येते. बियांतील स्थिर तेल (३०%) दिव्यांकरिता वापरतात. पानांत सॅपोनीन, टॅनीन व रेझीन ही द्रव्ये असतात.
संदर्भः Kirtikar, K. R. Basu, B. D. Indion Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“